Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

मैदानवीरांना करावे लक्ष्य

Advertisements

काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. कोणताही हासभास नसताना झालेल्या या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे देशाची संरक्षण यंत्रणा अहोरात्र कामाला लागली आहे. देशाच्या तिन्ही लष्करी दलांवर तर लक्ष केंद्रित करण्यात आले आहेच, पण युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली, तर देशभरातील नागरिकांचेही सहकार्य घेणे अत्यावश्यक आहे, हे लक्षात घेऊन नागरी संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी ऑपरेशान अभ्यास रंगीत तालीम म्हणजेच मॉक ड्रिल करण्याचे आदेश देण्यात आले. देशभरात विविध ठिकाणी ही रंगीत तालीम पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यात पाच ठिकाणी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात आले, अण्वस्त्रसज्ज असलेल्या भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील युद्ध टळावे, यासाठी जगभरातून प्रयत्न सुरू आहेत; पण परिस्थिती हाताबाहेर गेली तर नागरिकांनीही कोणत्या पद्धतीने सज्ज राहिले पाहिजे, याची माहिती देण्यासाठी हा युद्धसराव देशभरात करण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यांत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नागरी संरक्षण दलाचे जिल्हा उपनियंत्रक अशा प्रमुख अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल पार पडले, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक, मत्स्य विभाग, बंदरे, मेरीटाइम बोर्ड, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अशा विविध खात्यांच्या आणि संस्थांच्या सहकार्याने मॉक ड्रिल पार पडले, तणावाची परिस्थिती निवळत नाही, तोपर्यंत यापुढेही हा युद्धसराव सुरूच राहणार आहे. पार पडलेल्या मॉक ड्रिलमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जनजागृती घडविण्याचा प्रयत्न केला. प्रात्यक्षिके दाखवली. किती लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली, हा विषय अलाहिदा; पण आपण जागृत राहिले पाहिजे, असा संदेश तरी प्रत्येक घरापर्यंत पोहोचला असेलच.
जम्मू आणि काश्मीर राज्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तेथील पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. महाराष्ट्रातही पर्यटकांच्या बाबतीत अशीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण मुंबईसह कोकणही पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. याच हंगामात मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणात येत असतात. किनारपट्टीवर वसलेली अनेक शहरे पर्यटनाची केंद्रे आहेत.
हलकल्लोळच माजवायचा असेल तर ही सर्व केंद्रे म्हणजे पाकिस्तानचे लक्ष्य असू शकते. म्हणूनच तणावाची परिस्थिती आणि युद्धजन्य परिस्थिती यामध्ये सर्वसामान्य माणसे काय करू शकतात, त्यांनी काय टाळले पाहिजे, काय केले पाहिजे, कोणाशी संपर्क साधला पाहिजे, याबाबतची प्राथमिक माहिती किमान सर्व लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यादृष्टीने किनारपट्टीवरील नागरिकांना अधिक सतर्क राहणे जरूरीचे आहे. यासाठी प्रामुख्याने महाविद्यालयांची मदत घेतली जात आहे. त्याशिवाय ही जबाबदारी अनेक तरुण मंडळी पार पाडू शकतील. कोकणात स्थलांतराचा प्रश्न मोठा असला, तरी गावागावांमध्ये अजूनही तरुण आहेत, त्यांची मंडळे आहेत. गाव विरुद्ध गाव, वाडी विरुद्ध वाडी असे क्रिकेटचे सामने मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. अशी अनेक मंडळे नेहरू युवा केंद्रांतर्गत काम करतात. या केंद्राच्या कक्षेत नसलेली मंडळेही मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धा भरवत असतात. या स्पर्धांकरिता मोठमोठ्या रकमेची बक्षिसे दिली जातात. त्या निमित्ताने आणि क्रिकेट या खेळाच्या आवडीपोटी अनेक तरुण या स्पर्धांकडे आकर्षित होतात. त्यांच्या खिलाडू वृत्तीचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घेता येऊ शकेल. या तरुण मैदानवीरांना संघटित करायला हवे. त्यांना पुरेसे प्रशिक्षण द्यायला हवे. त्यांच्यामार्फत वाडी-वस्त्यांवरही जनजागरण होऊ शकते. प्रशासनाने याचा विचार करावा, मंडळांनीही पुढाकार घेऊन प्रशासनाशी संपर्क साधावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version