नवी दिल्ली : उन्हामुळे जीवाची काहिली होऊ लागल्यावर सर्वांना वेध लागलेले असतात ते मान्सूनचे. यंदा मान्सूनचे आगमन लवकर झाले असून, आज (१३ मे २०२५) नैर्ऋत्य मान्सूनने बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राचा काही भाग व्यापला आहे, असे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले आहे. एवढेच नव्हे, तर मान्सून पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल असल्याचेही हवामान विभागाने म्हटले असून, येत्या तीन-चार दिवसांत तो दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव-कोमोरीन क्षेत्र, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील आणखी काही क्षेत्रे आणि बंगालच्या उपसागराच्या मध्याकडील काही भाग व्यापून टाकण्याची शक्यता आहे. २७ मे रोजी तो केरळात येण्याची शक्यता आहे.
गेले दोन दिवस निकोबार बेटांवर सर्वदूर पाऊस कोसळत आहे. गेल्या दोन दिवसांत या भागात पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेगही वाढला आहे. एकंदरीत ही सर्व लक्षणे मान्सूनचे आगमन झाल्याची निदर्शक आहेत, असे हवामान विभागाने म्हटले आहे. भारतीय हवामान विभागाने एप्रिलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्याच्या घटनेला एल निनो म्हणतात आणि त्यामुळे भारतीय उपखंडात मान्सूनचे प्रमाण घटते. यंदा मात्र एल निनोची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता हवामान विभागाने फेटाळून लावली आहे. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
सर्वसाधारणपणे मान्सून एक जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. यंदा तो २७ मे रोजीच केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. तसे झाले तर २००९नंतरचे हे मान्सूनचे केरळमधील पहिलेच लवकर झालेले आगमन ठरेल. २००९ साली मान्सून २३ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.
नैर्ऋत्य मान्सून सर्वसाधारणपणे एक जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि आठ जुलैपर्यंत सारा देश व्यापतो. १७ सप्टेंबर रोजी उत्तर भारतातून मान्सून परतण्याची प्रक्रिया सुरू होते आणि १५ ऑक्टोबरपर्यंत तो पूर्णपणे माघारी फिरतो.
Follow Kokan Media on Social Media



