नवी दिल्ली : यंदा मान्सून अनेक विक्रम मोडीत काढत असून, काल (२५ मे) तळकोकणात दाखल झालेल्या मान्सूनने आज एका दिवसात मुंबई, पुणे, सोलापूरसह महाराष्ट्राचा ३० टक्के भाग व्यापला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण राज्य व्यापण्याच्या दृष्टीने वातावरण अनुकूल आहे. जवळपास ७५ वर्षांनी मान्सून मुंबईत इतक्या लवकर दाखल झाला आहे. मुंबईत या पावसाने आज दाणादाण उडवली आहे. (मान्सूनची प्रगती दाखवणारा व्हिडिओ पुढे दिला आहे.)
अतिवृष्टीमुळे रत्नागिरीत ३२ लाखांचे नुकसान
पावसाने ऐन मे महिन्यात घातलेल्या थैमानामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत अनेक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानाचे अंदाजे मूल्य तब्बल ३२ लाख रुपये एवढे आहे. जिल्हा प्रशासनाकडून आज याबद्दलची माहिती देण्यात आली. आठ पक्क्या घरांचे पूर्णतः नुकसान झाले असून, ५२ पक्क्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तसेच, चार गोठ्यांचे अंशतः, तर दोन गोठ्यांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. लांज्यात एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला. रत्नागिरी तालुक्यातल्या काजरघाटी इथे भिंत पडून तीन जण, तर गुहागर तालुक्यातल्या आबलोली इथं झाड पडून तीन जण जखमी झाले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू असून, रत्नागिरी जिल्ह्यात आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची आज (२६ मे) जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. देवेंदर सिंह यांनी पाहणी केली. धोकादायक ठिकाणं, घाट, पूल, रस्ते आदींची पाहणी करून त्यांनी संबंधित विभागांना सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपायांबाबत सूचना दिल्या. त्यांनी लांजा आणि राजापुरातल्या परिस्थितीचाही आढावा घेतला. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीला गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले आहे; मात्र त्यामुळे तयार झालेल्या अनुकूल वातावरणामुळे मान्सून चक्क १३-१४ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला. २५ मे २०२५ रोजी मान्सून तळकोकणात दाखल झाला. एरव्ही मान्सूनचे वारे एक जून रोजी केरळमध्ये, तर सात जून रोजी महाराष्ट्रात प्रवेश करतात. यंदा मात्र सारी रूढ गणिते मोडून काढत मान्सून चक्क मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सिंधुदुर्गात दाखल झाला. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे केरळमध्ये आगमन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. एरव्ही त्यासाठी सहा ते सात दिवस लागतात.
मे महिन्याच्या कडक उन्हाचा उत्तरार्ध शिल्लक असताना २० मेपासून रत्नागिरीसह कोकणात बहुतांश ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने अक्षरशः थैमान घातले. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे प्रचंड पाऊस पडला. त्या पावसाचा जोर ओसरेपर्यंत नैर्ऋत्य मान्सूनने आगेकूच केली आणि २४ मे रोजी नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला. सर्वसाधारणपणे तो एक जूनला केरळमध्ये येतो. यंदा मात्र तो आठवडाभर आधीच तिथे आला असून, तो पुढे येण्यासाठीही वातावरण अनुकूल असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते. दोन-तीन दिवसांत मान्सून गोवा आणि महाराष्ट्राचा काही भाग व्यापण्यास वातावरण अनुकूल आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. प्रत्यक्षात मात्र त्याने एका दिवसातच संपूर्ण गोवा राज्य, कर्नाटकचे काही भाग आणि महाराष्ट्राचा काही भाग व्यापला. आज (२५ मे) मान्सूनने पश्चिम-मध्य आणि पूर्व-मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत, तसेच बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य आणि उत्तरेकडच्या आणखी काही भागांत, तसेच ईशान्येकडच्या मिझोराम, मणिपूर आणि नागालँडच्या आणखी काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. येत्या तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात मुंबईपर्यंत, तसेच अन्य राज्यांच्याही आणखी काही भागांमध्ये मजल मारू शकतो. त्यासाठी वातावरण अनुकूल आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
पाऊस लवकर सुरू झाल्याने पाण्याची चिंता मिटली आहे, उष्णतेपासूनही दिलासा मिळाला; मात्र आंबा-कोकमासह कोकणी मेव्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, शेतीच्या पूर्वमशागतीची कामे करायलाही शेतकऱ्यांना वेळ मिळालेला नाही. त्याचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर होऊ शकतो. शिवाय, पावसाळी हंगाम लवकर सुरू झाल्याप्रमाणे समाप्तही लवकर झाला, तर सारीच गणिते बिघडणार असून, कदाचित पुढच्या वर्षी तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागू शकते, अशीही एक चिंता व्यक्त केली जात आहे.
यंदा १३ मे रोजी नैर्ऋत्य मान्सूनने बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राचा काही भाग व्यापला, असे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले होते. त्यापुढच्या त्या तीन-चार दिवसांत तो दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव-कोमोरीन क्षेत्र, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील आणखी काही क्षेत्रे आणि बंगालच्या उपसागराच्या मध्याकडील काही भाग व्यापून टाकण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि २७ मे रोजी तो केरळात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र मान्सून २४ मे रोजीच केरळमध्ये दाखल झाला.
भारतीय हवामान विभागाने एप्रिलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्याच्या घटनेला एल निनो म्हणतात आणि त्यामुळे भारतीय उपखंडात मान्सूनचे प्रमाण घटते. यंदा मात्र एल निनोची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता हवामान विभागाने फेटाळून लावली आहे.
सर्वसाधारणपणे मान्सून एक जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. यंदा तो २४ मे रोजीच केरळमध्ये पोहोचला. २००९नंतरचे हे मान्सूनचे केरळमधील पहिलेच लवकर झालेले आगमन ठरले. २००९ साली मान्सून २३ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.
नैर्ऋत्य मान्सून सर्वसाधारणपणे एक जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि आठ जुलैपर्यंत सारा देश व्यापतो. १७ सप्टेंबर रोजी उत्तर भारतातून मान्सून परतण्याची प्रक्रिया सुरू होते आणि १५ ऑक्टोबरपर्यंत तो पूर्णपणे माघारी फिरतो.
Follow Kokan Media on Social Media

