रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात २० मे रोजी सुरू झालेल्या पूर्वमोसमी पावसाच्या पाठीला पाठ लावून मान्सून लगबगीने वेळेआधीच दाखल झाल्यामुळे ऐन मे महिन्यात सलग आठवडाभर पाऊस कोसळतो आहे. पाच-सहा दिवसांपूर्वी असलेली पाणीटंचाईची स्थिती बदलून आता पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीच्या पाणीपातळीने काल (२६ मे) इशारा पातळी ओलांडली होती. आज (२७ मे) सकाळच्या अहवालानुसार पाणीपातळी इशारा पातळीपेक्षा कमी झाली आहे; मात्र आज सकाळपासून दुपारपर्यंतच्या कालावधीत जगबुडी आणि चिपळूणमधील वाशिष्ठी या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
आज सकाळी आठ वाजता भरणे पूल येथे जगबुडी नदीची पाणीपातळी ४.२० मीटर्स होती. दुपारी दोन वाजताच्या अहवालानुसार, या नदीची पाणीपातळी ४.४५ मीटर्सवर पोहोचली आहे. या नदीची इशारा पातळी पाच मीटर्स असून, धोका पातळी सात मीटर्स आहे. सकाळी आठ वाजता चिपळूणच्या वाशिष्ठी नदीची पाणीपातळी बाजारपूल येथे १.९० मीटर्स होती. दुपारी दोन वाजताच्या स्थितीनुसार ती २.५६ मीटर्सवर पोहोचली आहे. या नदीचीही इशारा पातळी पाच मीटर्स असून, धोका पातळी सात मीटर्स आहे. याचाच अर्थ असा, की या दोन्ही नद्यांची पाणीपातळी सहा तासांत बऱ्यापैकी वाढली आहे. जिल्ह्यातील अन्य नद्यांची पाणीपातळी मात्र स्थिर आहे. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
गेला आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात एनडीआरएफची एक तुकडी आज सकाळी (२७ मे) दाखल झाली आहे. एक कमांडर आणि एक कनिष्ठ अधिकारी यांच्यासह एकूण २५ जवानांचा या तुकडीत समावेश आहे. गेली सलग तीन वर्षं एनडीआरएफची टीम चिपळुणात येत असून, जूनपासून संपूर्ण पावसाळ्याच्या काळात ती मदतकार्यात सहभागी होते. यंदा मात्र २० मे रोजीपासून सलग सुरू असलेला पाऊस, त्यानंतर मान्सूनची त्याला मिळालेली जोड यांमुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर, एनडीआरएफची तुकडी लवकरच चिपळुणात दाखल झाली आहे.

पावसाची संततधार आजही सुरूच असून, आज (२७ मे) सकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये मंडणगडमध्ये सर्वाधिक १५७ मिलिमीटर पाऊस पडला. दापोलीत १४१.७१ मिलिमीटर, गुहागरमध्ये १२३ मिमी, रत्नागिरीत ९८.७७ मिमी, चिपळूणमध्ये ८१.११ मिमी, खेडमध्ये ७७.८५ मिमी, राजापूरमध्ये ७३.३७ मिमी, लांज्यात ६७.२० मिमी, तर संगमेश्वरमध्ये ५२.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, हवामान विभागाने कोकणाला रेड अॅलर्ट दिला आहे.


