वाचकांची संख्या वाढवण्यासाठी घराघरात ग्रंथ घेऊन जावे लागेल : प्रकाश देशपांडे

रत्नागिरी : ‘सध्याच्या काळात वाचन कमी होत चालले आहे. वाचकांची संख्याही कमी होत आहे. माणसे एकमेकांशी बोलण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. संवाद केवळ मोबाइलवरील संदेशाद्वारे होतो. ही परिस्थिती बदलायची असेल, तर घराघरात ग्रंथ घेऊन जावे लागेल. त्यांना ते मोफत वाचायला द्यावे लागतील आणि त्यामधून वाचनाची सवय वाढवावी लागेल,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी केले. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानाच्या अर्थसाह्याच्या विविध योजनांविषयीच्या विभागस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालय यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन समिती सदस्य किरण धांडोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी उप-जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे, ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे आदी उपस्थित होते.

‘आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेतून दर वर्षी विभागस्तरीय कार्यशाळेला सर्व ग्रंथपाल उपस्थित असतात. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या अर्थसाह्याच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषेचा अडसर येऊ न देता त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवा,’ असे आवाहनही प्रकाश देशपांडे यांनी केले.
कार्यशाळेतील विविध सत्रांचा लाभ घेताना आर्थिक बाबीच्या योजनांचाही लाभ घ्यावा, असे धांडोरे यांनी सांगितले. वाचन माणसाला समृद्ध बनवते असे सांगतानाच ‘पुस्तक वाचनामुळे मी घडलो आणि आजही पुस्तके वाचतो,’ असे गायकवाड यांनी सांगितले. श्री. साबणे, श्री. पाटील यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजा राममोहन रॉय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी दीपक झोडगे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले, तर हेमंत काळोखे यांनी आभारप्रदर्शन केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply