रत्नागिरी : प्रत्येक व्यक्तीने दैनंदिन जीवनात योगाचरण करून सुदृढ आणि सशक्त झाले पाहिजे, असे प्रतिपादन पतंजली सेवा समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्यासौ. रमाताई जोग यांनी केले.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित ‘गुरुवंदन’ कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, आपल्या भारतीय संस्कृतीच्या गुरुपरंपरेतील महर्षि पतंजलि यांनी योगशास्त्र अगदी सोप्या पद्धतीने ग्रंथांच्या द्वारे जनसामान्यांसमोर ठेवले. सध्या अनेक प्रकारच्या व्याधी अगदी लहान वयातच होताना दिसतात. त्यामुळे जीवन व्याधीमुक्त करण्याची ताकद योगामध्ये आहे. जागतिक स्तरावर भारताच्या योग विद्येला मान्यता मिळाली ही निश्चितच भारतासाठी कौतुकास्पद बाब आहे. मात्र योगसाधकांनी आता ग्रामीण आणि दुर्गम भागापर्यंत योग आणि त्याचे महत्त्व पोहोचवण्याचा निर्धार करावा.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि महर्षि व्यास, भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे, महाकवी कालिदास, सरस्वती यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून झाली. प्रास्ताविकात रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे म्हणाले की, सदाशिवापासून सुरू झालेल्या गुरुपरंपरेने भारतीय संस्कृतीला तत्त्वज्ञान, शास्त्रे यांचा संग्रह दिला. गुरु-शिष्याचे नाते आपण भारताच्या कानकोपऱ्यात पदोपदी बघतो. आजच्या युगात विविध क्षेत्रांत भारत विश्वाचे प्रतिनिधित्व करतो आहे. त्यामुळे एक प्रकारे भारतीय संस्कृतीतील गुरुपरंपरा जगासाठी प्रेरणादायक आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि महर्षि व्यास यांचा जन्मोत्सव, गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील योग क्षेत्रातील मान्यवरांना गुरुवंदन करून त्यांना शाल, श्रीफळ, पुष्प प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांमध्ये सौ. नीता साने, ज्योती गावंड, समृद्धी दळी, प्रा. डॉ. निधी पटवर्धन, विद्यानंद जोग, राजेश आयरे, विनय साने, प्रियांका एकावडे, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, डॉ. शशांक पाटील, अॅड. रुची महाजनी, श्रीकांत ढालकर प्रा. अविनाश चव्हाण, प्रा. कश्मिरा दळी, प्रा. सई ओक, स्वरूप काणे यांचा सन्मान करण्यात आला. बी दि चेंज फाऊंडडेशन (शिर्डी) यांच्याकडून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले रत्नागिरी उपकेंद्रातील प्रा. अक्षय माळी यांचा तसेचा ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. निधी पटवर्धन, सौ. नीता साने, समृद्धी दळी, डॉ. शशांक पाटील, सिद्धी कोळेकर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरूप काणे यांनी, तर आभार प्रदर्शन प्रा अविनाश चव्हाण यांनी केले.
रमाताई जोग यांचे संपूर्ण भाषण…
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

