विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीसाठी संस्कार, शिस्त आणि नियोजनाचा करावा अंगीकार : जिल्हा न्यायाधीश डॉ. नेवसे

चिपळूण : गुरुपौर्णिमेच्या औचित्याने रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये कायदेविषयक जागरूकता शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. चिपळूण तालुका विधी समिती आणि परांजपे मोतीवाला हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. गुरुपौर्णिमेचं आणि अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरुजनांचं महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं. पौराणिक काळापासून चालत आलेल्या गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान करणारा हा पवित्र दिवस असून, विद्यार्थ्याचे गुरू हेच खरे मार्गदर्शक आणि मित्र असतात, तेच विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देतात आणि त्यांचं भविष्य घडवतात, असं त्या म्हणाल्या.

‘कोणत्याही यशस्वी व्यक्तिमत्त्वाच्या जीवनात शालेय संस्कार आणि गुरुजनांचा सिंहाचा वाटा असतो. त्यांचं अभ्यासपूर्ण मार्गदर्शन म्हणजे ज्ञानरूपी आशीर्वादच असतो. विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीसाठी संस्कार, शिस्त आणि नियोजनाचा अंगीकार करायला हवा,’ असं प्रतिपादन डॉ. नेवसे यांनी केलं. विद्यार्थ्यांशी संबंधित कायद्यांच्या तरतुदीही त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचं काम, तसंच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडून त्यांना यशस्वी करण्याचं काम गुरुजन करतात. जीवनाच्या प्रत्येक वळणावर, प्रगतीच्या टप्प्यांवर संस्कार आणि नीतिमूल्यांचा प्रभाव पडत असतो. दिवसेंदिवस शैक्षणिक क्रांती घडत आहे. तंत्रज्ञानाचा वापर शालेय शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात होत आहे. विद्यार्थ्यांनी मोबाइल आणि सोशल मीडियाचा वापर विघातक गोष्टींसाठी न करता बौद्धिक विकासासाठी केला पाहिजे. अन्यथा मोबाइलच्या अतिवापराने आजही शालेय जीवनातच काही विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जात आहेत. त्यांचं भवितव्य धोक्यात येत आहे. लैंगिक अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध करण्याकरिता व विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून शालेय व्यवस्थापनाने जागरूक राहणं ही आज काळाची गरज आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक आहेत. त्यामुळे सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणं आवश्यक आहे,’ असं प्रतिपादन डॉ. नेवसे यांनी केलं.

वकील संघटनेच्या उपाध्यक्षा अ‍ॅड. नयना पवार यांनी मुलांचे कायदेविषयक हक्क, अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम, सायबर क्राइम, मोबाइलचा योग्य वापर आणि इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केलं.

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक किरण कांबळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपूजन आणि दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली मुंजेकर आणि सिद्धी रेडीज या विद्यार्थिनींनी केले. शाळेचा प्रगती अहवाल आणि मराठी संस्कृतीचे जतन यावरील चित्रफीतही या वेळी दाखवण्यात आली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply