Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

शेतीच्या सर्व समस्यांवर उपाय ठरेल अशा बांबूची लागवड कोकणात फायद्याची; लवकरच राज्याचे पहिले बांबू धोरण

Advertisements

रत्नागिरी : ‘बांबू हे शाश्वत पीक असून, त्याला फुलं-फळं नसल्याने इतर पिकांप्रमाणे हवामानबदलामुळे त्याचं नुकसान होत नाही. बांबूची एकदा लागवड केल्यानंतर थेट कापणीपर्यंत त्याची काळजी घ्यावी लागत नाही. त्यामुळे मजूरटंचाई असली, तरी हे पीक घेणं शक्य आहे. शिवाय, बांबूपासून फर्निचर, ज्वेलरी, कापड आदींसह अगदी इथेनॉलही तयार करता येतं. विविध योजनांद्वारे सरकारी अर्थसाह्यही या पिकाला मिळतं. त्यामुळे बांबू हा उत्पन्नाचा उत्तम स्रोत आहे. म्हणूनच कोकणातील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळायला हवं,’ असं प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी रत्नागिरीत केलं. ते आज (८ सप्टेंबर) जिल्हास्तरीय बांबू लागवड आणि विकास परिषदेत बोलत होते. उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्यामुळे राज्याला बांबू धोरण मिळालं असून, बांबू उद्योगाला देण्यासाठी आशियाई बँकेने ४३०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. तो निधी सात वर्षांपर्यंत मिळणार आहे. बांबूपासून हेक्टरी साडेपाच लाख रुपये उत्पन्न मिळू शकतं. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत हेक्टरी साडेसात लाख रुपये मिळू शकतात. बांबूपासून तयार होणाऱ्या इथेनॉलमध्ये फक्त पाच टक्के कार्बन डायॉक्साइड असतो, अशी माहितीही पाशा पटेल यांनी दिली. (फोटो बातमीच्या शेवटी)
या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, ‘बांबू हे फक्त पीक नाही, तर उत्पन्न वाढवण्याचा आणि उद्योग निर्माण करण्याचा क्रांतिकारी मार्ग आहे. येत्या १७ सप्टेंबरला महाराष्ट्राचं पहिलं बांबू धोरण राज्य सरकारतर्फे जाहीर होत आहे. योग्य नियोजनासह लागवड केल्यास बांबू लागवडीतून प्रत्येक शेतकऱ्याला दरमहा ३० ते ४० हजार रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्याची ताकद आहे. रत्नागिरी जिल्ह्यात किमान १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करण्याचा संकल्प केला आहे. बांबूपासून फर्निचर, ज्वेलरी, कापड, पादत्राणे, इथेनॉल आदी विविध उद्योग उभे राहू शकतात. रत्नागिरी विमानतळ टर्मिनल बिल्डिंगमध्ये ५० टक्के फर्निचर बांबूचे असेल. रत्नागिरीला महाराष्ट्रातला सर्वांत मोठा बांबू लागवड करणारा जिल्हा बनवण्याचा संकल्प करत आहे.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचं उपकेंद्र रत्नागिरीत
रायगड जिल्ह्यातल्या लोणेरे इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचं उपकेंद्र रत्नागिरीत स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज आढावा बैठकीनंतर दिली. रत्नागिरीतील संस्कृत उपकेंद्राला एक एकर जागा देण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित गुणपत्रिका तत्काळ देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या वेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version