रत्नागिरी : हातखंबा (ता. जि. रत्नागिरी) येथे आज (२८ सप्टेंबर २०२५) दुपारी दोनच्या सुमारास ह्युंडाई ग्रँड आय टेन कारचा अपघात झाला आणि ती जळून खाक झाली. गाडीतून प्रवास करत असलेले वडील आणि मुलगी बचावले आहेत; मात्र काही न्यूज पोर्टल्स आणि ग्रुप्स यांनी पोलिसांकडून शहानिशा न करता ब्रेकिंग न्यूज देण्याच्या नादात चुकीच्या तपशीलासह बातम्या प्रसारित केल्या आहेत. त्यामुळे गैरसमज दूर करण्यासाठी ही बातमी देत आहोत. ही कार कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांचे जावई डॉक्टर मिहिर प्रभुदेसाई यांची आहे. चुकीच्या बातम्या प्रसारित झाल्यामुळे गैरसमज होऊ नये यासाठी योग्य तपशीलासह बातमी येथे देत आहोत. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिली आहे.)
मोटार जळून खाक झाली ही वस्तुस्थिती आहे; मात्र चुकीच्या बातमीमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मोटारीमध्ये चार माणसे नव्हतीच. मोटारीत केवळ दोन माणसे होती. सावंतवाडीतील (जि. सिंधुदुर्ग) कोलगाव येथील डॉ. मिहिर मुरलीधर प्रभुदेसाई (वय ४० वर्षे) आणि श्रीशा मिहिर प्रभुदेसाई (वय दहा वर्षे) असे दोनच प्रवासी मोटारीतून प्रवास करत होते. मोटारीत आठ महिन्यांचे बालक असल्याचा उल्लेख चुकीच्या बातमीत आहे; मात्र वर उल्लेख केलेल्या दोन व्यक्तींव्यतिरिक्त मोटारीत कोणीही नव्हते. ब्रेकिंग न्यूजच्या आजच्या जमान्यात घाईघाईने, कोणतीही खात्री न करता बातमी प्रसिद्ध केली गेल्यामुळे चुकीचा तपशील प्रसिद्ध झाला आहे. पोलिसांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती कोणालाही अद्याप दिलेली नाही. कारण त्या संदर्भातील पोलीस स्थानकातील प्रक्रिया अद्याप (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) सुरूच आहे. तरीही चुकीची बातमी प्रसारित झाल्यामुळे जखमींना सावरण्याआधी चौकशीसाठी कॉल करणाऱ्यांचे गैरसमज दूर करण्यात वेळ द्यावा लागतो आहे. म्हणूनच हे स्पष्टीकरण प्रसारित केले आहे. ऑनलाइन प्रसारित झालेल्या बातम्या नंतर तातडीने एडिट करता येतात; मात्र तोपर्यंत ज्यांच्यापर्यंत त्या पोहोचतात, त्यांना चुकीची माहिती मिळते आणि त्यातून गैरसमज वाढतात.
महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वर्षानुवर्षे रखडलेले असल्याने अनेक अपघात होत आहेत. आताच्या अपघातातील कार देवगडवरून रत्नागिरीच्या दिशेने येत होती. दुपारी दोनच्या सुमारास हातखंबा पोलीस चेकपोस्टनंतर थोड्या अंतरावर हा अपघात घडला. डायव्हर्जन असल्याचा बोर्ड पुरेशा अंतरावर आधी लावलेला नसल्याने आणि डायव्हर्जनच्या ठिकाणी रस्त्यावर खडी असल्याने ब्रेक मारल्यानंतर गाडी उलटली. त्यातून सुदैवाने दोन्ही प्रवाशांना बाहेर पडता आले. त्यानंतर गाडीने पेट घेतला; स्थानिक नागरिक, तसेच रस्त्यावरील अन्य वाहनचालकांनीही तातडीने मदत केली. दोघेही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मुका मारही लागला आहे; मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. अपघातानंतर जवळपास अर्ध्या-पाऊण तासानंतर अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला. बंबाने आग विझवली; मात्र गाडीचा निव्वळ सांगाडा उरला आहे. गाडीने पेट घेतल्याने वाहतूक पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ थांबवली होती. त्यामुळे दोन्ही दिशांनी गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या; मात्र आग विझवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

