Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

जिद्दीने साकारलं हॉटेल व्यवसायाचं स्वप्न

Advertisements

राजापूर तालुक्यातील डोंगर गावात राहणाऱ्या मानसी विजय चव्हाण एकेक पायरी पुढे जात, आता हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवून तो उद्योग वाढीला लावून महिलांसाठी एक प्रेरणेचं उदाहरण बनत आहेत.
पुण्यातील ग्रामोन्नती.नेट या संस्थेद्वारे रत्नागिरीत दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी बचत गटांमधील महिलांसाठी उत्सव उद्योजकतेचा, सन्मान उद्योजिकांचा, लघुउद्योगांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये सन्मान करण्यात आलेल्या या उद्योजिकेविषयी…

सौ. मानसी विजय चव्हाण सावली स्वयंसहाय्यता समूह या बचत गटात काम करत होत्या. तेव्हा उमेद अभियानात काम करणाऱ्या महिला त्यांच्या गावात म्हणजे राजापूर तालुक्यातील डोंगर या गावी आल्या. महिलांनी स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं, हे त्या अभियानातून शिकल्या. तिथेच त्यांनी स्वतःच्या व्यवसायाचं स्वप्न पाहिलं. पण एकदम मोठी उडी घेण्यापेक्षा आधी छोट्या गोष्टीने सुरुवात करत,समूहातील महिलांना हाताशी घेऊन त्या लसूण चटणी तयार करून जवळच्या दुकानात विक्रीसाठी ठेवू लागल्या. त्यांच्या समूहाने तयार केलेली ती चटणी लोकांना आवडू लागली. त्यामुळे लसूण चटणीचं जास्तीचं उत्पादन घेऊन त्या अन्य दुकानातही विक्रीसाठी ठेवू लागल्या. पुढे दिवाळीचा फराळही करून विकायची योजना त्यांनी केली आणि बचत गटामार्फत ती सुरू केली. पण त्यांच्या समूहातील महिला माल विकायला बाहेर पडण्यासाठी तयारच होईनात. माल तयारही करण्याबरोबच तो विकण्याची जबाबदारीही मानसीताईंवर येत गेल्याने त्यांनी याच गोष्टी स्वतंत्रपणे विकायचं ठरवलं! आणि लसूण चटणी, दिवाळीचा फराळ वगैरे गोष्टी त्या बेकरी आणि इतर दुकानात विक्रीसाठी ठेवू लागल्या. सोबतच एका खानावळीत काम करू लागल्या अन् घरच्या घरी जेवणाचे डबेही बनवून देऊ लागल्या. यात त्यांना खूप फायदा तर झालाच, पण यातूनच त्यांना हॉटेल व्यवसायाची प्रेरणा मिळाली. सर्वांत आधी त्यांची कल्पना त्यांनी त्यांच्या पतीला ऐकवली. त्यांनाही ती खूप आवडली आणि त्यांनी लगेच होकारही दिला. (उर्वरित मजकूर जाहिरातीच्या खाली)

हॉटेल व्यवसायाला पहिला प्रश्न जागेचा असतो. त्यामुळे त्या लगेचच हॉटेलसाठी जागा बघू लागल्या.आणि काहीच दिवसांनी त्यांना डोंगर इथे छानशी जागा मिळाली. पण त्यांच्याकडे हॉटेलसाठी लागणारं सामान आणि भांडवलही नव्हतं. मग त्यांनी बँकेत कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. काही बँकांनी तर त्यांना सरळ नकार दिला. पण जिद्द न सोडता पतीला सांगून त्यांनी मंगळसूत्र गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. एका यशस्वी पुरुषामागे जशी स्त्री उभी असते, तशीच या यशस्वी स्त्रीमागे एक पुरुषही उभा राहिला. या सगळ्या आर्थिक संकटांवर मात करून त्यांनी हॉटेल व्यवसायाला प्रारंभ केला.

आठ मार्च २०२४ या महिलादिनाचं आणि त्यावर्षी आलेल्या महाशिवरात्री या दोन सुदिनांचं औचित्य साधून मानसीताईंनी हॉटेल सुरू केलं. तिथे चहा, नाश्ता, जेवण बनवण्याचं काम स्वतः जातीने करतात. त्यांच्या हॉटेलात चायनीज खाद्यपदार्थही मिळतात. ते बनवण्यासाठी त्यांच्याकडे मदतनीस आहे. हॉटेलचं सामान, भाज्या वगैरे आणून द्यायला मानसीताईंचे पती आणि मुलं त्यांना मदत करतात. त्यांचं हॉटेल सकाळी ते रात्री अकरापर्यंत चालू असतं. हॉटेल सुरू झाल्यापासून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळाला. हॉटेल नीट चालू लागल्यावर काही दिवसांनी बँकेचं कर्ज मंजूर झालं आणि सर्वांत आधी त्यांनी मंगळसूत्र सोडवलं.

व्यवसाय करतानाच मानसीताईंना बऱ्याच चांगल्या वाईट प्रसंगाना सामोरं जावं लागलं. एक स्त्री एकटी हॉटेल चालवते, येणाऱ्या ग्राहक पुरषाशी बोलते म्हणून निंदा करणाऱ्या लोकांनी त्यांच्यावर भरपूर चिखलफेक केली. पण त्यांनी कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही. आपण एखादी गोष्ट प्रामाणिकपणे करत असलो, तर त्यात असे अडथळे निर्माण व्हावेत म्हणून अनेकजण प्रयत्न करत असतात. कुणी कृती करतो, तर कुणी बोल लावतो. पण त्यातही न डगमगता उभं राहायचं असतं. आता मात्र लोक मानसीताईंना त्यांच्या नावाने ओळखतात याचा त्यांना आनंद आहे. त्याचबरोबर या व्यवसायामुळे स्वतःची टूव्हीलर खरेदी करण्याचं त्यांचं स्वप्न साकारलं. त्याचाही त्यांना आनंद आहे.

मानसीताई आता आर्थिकदृष्ट्या संपूर्णपणे स्वावलंबी जीवन जगत आहेत. आता त्यांच्यासमोर एकच जिद्द आहे, ती म्हणजे त्यांच अथर्व नावाचं छान चालत असलेलं हॉटेल खूप मोठं करायचं. त्यांची ही इच्छाही लवकरच पूर्ण होईल, यात शंका नाही.
मानसी विजय चव्हाण – ९३०९५१३६२६

(शब्दांकन : सौ. राधिका सचिन आठल्ये)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version