
कशेळीच्या साक्षी नाटेकर यांनी लहानपणापासून जपलेल्या स्वप्नाला सत्यात उतरवले. नुसतेच गृहिणी म्हणून न राहता काहीतरी उपजीविकेचे साधन असावे, म्हणून त्यांनी शुद्ध खोबरेल तेलाच्या उद्योगात उडी घेतली आणि आता तो उद्योग त्या समर्थपणे पेलत आहेत.
पुण्यातील ग्रामोन्नती.नेट या संस्थेद्वारे रत्नागिरीत दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी बचत गटांमधील महिलांसाठी उत्सव उद्योजकतेचा, सन्मान उद्योजिकांचा, लघुउद्योगांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये सन्मान करण्यात आलेल्या या उद्योजिकेविषयी.
निसर्गसंपन्न राजापूर तालुक्यातील कशेळी गावातल्या साक्षी संतोष नाटेकर यांनी उद्योगाचे आपले स्वप्न सत्यात उतरविले आहे. त्यांचे पती एसटी डेपोमध्ये मेकॅनिक म्हणून काम करतात. साक्षी नाटेकर चाळीस टक्के अल्पदृष्टी दिव्यांग आहेत. त्यामुळे त्यांना लहानपणापासून ते आत्ता सांसारिक गोष्टीपर्यंत खूप सोसावं लागलं. यातूनच स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इच्छा त्यांच्या मनात डोकावू लागली. त्या स्वप्नाची पहिली पायरी म्हणजे त्यांनी ‘उमेद’अंतर्गत बचतगटात काम सुरू केलं. मग या बचत गटामधे काम करत असताना त्यांना स्वबळावर काहीतरी उद्योग सुरू करून, उपजीविकेचं साधन शोधावं हा विचार खुणावू लागला आणि त्या दिशेने त्यांची पावलं पडू लागली. (उर्वरित मजकूर जाहिरातीच्या खाली)

कोकणाला निसर्गसंपन्नतेचं वरदान असल्याने इथे नारळउत्पादन जास्त घेतलं जातं. गावात बऱ्याच जणांच्या नारळाच्या बागा असल्याने साक्षी यांच्या लक्षात आलं की, गावात किंवा जवळपास कुठेही तेलाचा घाणा नाही. याउलट त्यांच्या माहेरी सिंधुदुर्गात मात्र बऱ्याच ठिकाणी तेलाचे घाणे, चकत्या आहेत. पण इथे तेल काढायचं असेल, तर लांजा किंवा कणकवलीत जावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे नारळाचं तेल हे शरीराला चांगलं आहेच. शिवाय त्याचा वापर हा रोजचा आहे. मग या खोबऱ्याचं तेल काढायचाच उद्योग उपयुक्त ठरू शकतो, असा विचार करून तोच उद्योग करण्याचा निर्धार त्यांनी केला. त्याप्रमाणे पुढची पावलं टाकायला त्यांनी सुरुवात केली.
कुठलाही उद्योग करायचा म्हटला की हितशत्रूही खूप असतातच. त्याचेही अनुभव नाटेकर यांना खूप आले. पण हितशत्रू आणि स्पर्धा असल्याशिवाय आपल्याला जिद्दीने काम करताही येत नसावं, याची खूणगाठ मनाशी बांधून त्यांनी उमेद अभियानाद्वारे पीएमएफएमपी (बीजभांडवल) योजनेअंतर्गत कर्ज काढून तेल काढण्याच्या मशिनरीज घेतल्या. त्यानंतर त्यांनी या मशिनरीज कशा चालवायच्या, याचं सिंधुदुर्ग जिल्ह्ययातील उद्योजक नाईक यांच्याकडे रीतसर प्रशिक्षणही घेतलं. ट्रेनिंग घेत असतानाच त्यांना थोडी भीती वाटली. कारण या मशिनरीजचा जसा फायदा तसा तोटाही असतो. थोडं लक्ष इकडचं तिकडे झालं, तरी काहीही होऊ शकतं. त्यामुळे त्यांच्या मनात थोडीशी धाकधूक होती. पण शेवटी आपल्या मनातला विचार पक्का आणि प्रामाणिक असेल, तर आपण कुठलीही गोष्ट सहज करू शकतो, यावर त्यांचा विश्वास होता आणि त्याबरोबरच कुटुंबाचाही त्यांच्यावर आणि या व्यवसायावर असलेला विश्वास असल्याने एक स्त्री म्हणून त्या अर्धी लढाई जिंकल्या!!
कुठलाही उद्योग-व्यवसाय करत असताना जेव्हा उद्योगकर्त्याच्या पाठी त्यांचे कुटुंबीय ठामपणे उभे असले ,तर तो माणूस मानसिकदृष्ट्या प्रबल आत्मविश्वासाने पुढे जातो. विशेषतः स्त्री असल्यास निश्चितच!!
उद्योग नुकताच सुरू झालेला असताना त्या एकदा मशीनवर काम करत होत्या. त्या खोबरं टाकायला वाकल्या असताना त्यांचा गाऊन मशीनमध्ये अडकला. पण त्यांचे मिस्टर तिथेच होते. त्यांनी प्रसंगावधान राखत लगेचच मशीनचा स्विच बंद केला. त्यामुळे पुढचा अपघात टळला. थोडक्यात म्हणजे कुठल्याही उद्योग-व्यवसायासाठी कुटुंबाची साथ असणं आवश्यक असतं. हीच आपली माणसं पडत्या काळात सावरतात, वेळप्रसंगी पाठीशी उभे राहतात. कारण एका गृहिणीसाठी असे अपघात झाल्यावर त्या भीतीतून वर येऊन उभं राहण्यासाठी पाठिंब्याची गरज असते, असं साक्षी मॅडम म्हणतात.
मशिनरी नीट हाताळता यायला लागल्यावर मग जाहिरात करून माल मिळवण्यावर साक्षी मॅडमनी भर द्यायला सुरुवात केली. त्यालाही उमेदतर्फे त्यांना मदत मिळाली आणि अखेरीस त्यांचा खोबरेल तेलाचा व्यवसाय सुरू झाला.
जशी ऑर्डर असेल, त्याप्रमाणे वेळेची आखणी करून नाटेकर मॅडम घर आणि व्यवसायाला पुरेसा वेळ द्यायला लागल्या.
आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँडची खोबरेल तेलं असताना त्यांच्या याच घरी सुरू केलेल्या व्यवसायात काय वेगळेपण असावं? त्या काढत असलेलं हे खोबरेल तेल शंभर टक्के शुद्ध असतं. अशुद्ध माल महिनोन् महिने टिकतो आणि शुद्ध मालाला ठरावीक दिवसांचीच गॅरंटी असते, असं नाटेकर मॅडम म्हणतात.
आपला उद्योग नावारूपाला आल्यावर व्यक्ती म्हणून त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले. स्वतःचं असं काही उत्पन्न सुरू झालं.
आता त्यांच्या उद्योगामधे हळूहळू वाढ होत असताना प्रतिस्पर्धी यायला सुरुवात झाली आहे. पण इथं प्रत्येकाला काहीना काही उद्योगधंदा करण्याची गरज आहेच. त्यामुळे आपल्याकडून आपण प्रामाणिक प्रयत्न करून, हा उद्योग वाढीला लावण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यासाठी त्या उद्योगवाढीचं प्रशिक्षण आणि मार्गदर्शनही घेण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या उद्योगासाठी त्यांना अहिल्यादेवी पुरस्कार मिळाला आहे.
यावर्षी पाऊस खूप पडल्याने त्यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. एरवी पावसात खोबरं वाळवणं वगैरे गोष्टी होत नसल्याने त्यांच्या या व्यवसायाला ते चार महिने सुटीच असते. जर कुणी ग्राहक समोरून खोबरं घेऊन आलं, तरच तेल काढून दिलं जातं. पण यावर्षी पावसाने आपला मुक्काम वाढवल्याने अशा प्रकारच्या उद्योगांवर त्याचा परिणाम झाला. पण तरीही अशा संकटांना घाबरून न जाता त्याला धीराने सामोरे जात, पुन्हा पुन्हा उभ्या राहून या खोबरेल तेलाच्या उद्योगामध्ये वाढ करण्याचं त्यांचं स्वप्न त्या नक्कीच पूर्ण करणार आहेत.
साक्षी संतोष नाटेकर – ९९२२२८६२२८
(शब्दांकन : सौ. राधिका सचिन आठल्ये)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

