
उमेद अभियानाअंतर्गत गांडूळखताच्या निर्मितीचं प्रशिक्षण घेत असताना बसणीच्या सौ. सोनाली कपिल शिवलकर यांनी सेंद्रिय शेतीद्वारे अन्नाच्या उत्पादनाची आणि त्यासाठी लागणाऱ्या गांडूळखताची माहिती मिळाली. त्याचं प्रात्यक्षिक करत असतानाच त्यांनी हाच उद्योग सुरू करायचा, यावर शिक्कामोर्तब करून टाकलं. पुण्यातील ग्रामोन्नती.नेट या संस्थेद्वारे रत्नागिरीत दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी बचत गटांमधील महिलांसाठी उत्सव उद्योजकतेचा, सन्मान उद्योजिकांचा, लघुउद्योगांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये सन्मान करण्यात आलेल्या या उद्योजिकेविषयी…
रत्नागिरी तालुक्यातील बसणी या छोट्याशा गावात राहत असलेल्या सोनाली कपिल शिवलकर यांनी २०२० मध्ये घरच्या घरीच गांडूळखत निर्मिती करून त्याची विक्री करण्याचा उद्योग सुरू केला. आजकाल सगळ्यात भेसळ चालत असलेल्या या वातावरणात त्यांना हा वेगळा व्यवसाय करावासा वाटला, याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं! मुळात आपण जे अन्न खातो, त्याचं पीक कुठल्या खतावर बनतं यावर ते पीक कसं येणार? त्याची वाढ कशी होणार आणि शरीराला ते पोषण देणार की नाही? या गोष्टी अवलंबून असतात.
सोनालीताई स्वतः उमेद या संस्थेत शिरगाव प्रभागात मास्टर सीआरपी म्हणून गेली पाच वर्षं कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अभियानाअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविका मिळवून देण्यासाठी व असलेल्या योजना बळकट करण्यासाठी विविध प्रकारचा निधी व्यवसायासाठी उपलब्ध करून दिला जातो. सोनाली शिवलकर याच अभियानाअंतर्गत काम करत असताना २०१८ साली ग्रामपंचायतीच्या कृषी विभागातर्फे गांडूळखत निर्मितीचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं. मनात स्वतःचा नावीन्यपूर्ण उद्योग सुरू करण्याचा विचार चालू असताना या प्रशिक्षणातून त्यांना सेंद्रिय शेतीद्वारे अन्नाच्या उत्पादनाची आणि त्यासाठी लागणाऱ्या गांडूळखताची माहिती देण्यात आली. या उपक्रमाचं प्रात्यक्षिक देत असताना त्यांनी आपण हाच उद्योग सुरू करायचा, यावर शिक्कामोर्तब करून टाकलं. याच प्रशिक्षणातून आपल्याला उद्योग करायला प्रेरणा मिळाली, असं सोनालीताई म्हणतात. (उर्वरित मजकूर जाहिरातीच्या खाली)
कुठला तरी उद्योग सुरू करायचं ठरवलं, तर त्यासाठी पहिला पाठिंबा लागतो तो घरच्यांचा! पण सोनालीताईंना लगेचच घरच्यांचा पाठिंबा तर मिळालाच, पण बरोबरच लागेल ती मदतही त्यांच्याकडून मिळू लागल्याने त्यांनी पुढची पावलं टाकायला दमदारपणे सुरुवात केली.
व्यवसाय म्हटलं की पहिला महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यासाठी लागणारं भांडवल. सोनालीताईंना सुरुवातीला त्यांच्या समूहातून पाच हजार रुपये कर्ज घेतलं आणि आधी छोट्या स्वरूपात घरच्या घरी उद्योग सुरू करायचं योजलं. या पैशातून त्यांनी या व्यवसायासाठी लागणारी साधनसामग्री गोळा करायला सुरुवात केली. त्यातून गांडूळ खताचा एक वाफा (बेड) तयार केला. तीन महिन्यांत गांडूळखताच्या त्या एका वाफ्यातून सातशे किलो गांडूळखत तयार झालं. मग सोनाली यांनी २० रुपये किलो या दराने स्थानिक पातळीवर गांडूळखताची विक्री सुरू केली. त्यातून चौदा हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं आणि खर्च वजा करुन त्यांना दहा हजार रुपये नफा झाला.ए वढ्या कमी खर्चात जास्त नफा असल्याने त्यांनी हाच व्यवसाय कायम ठेवून तो वाढवण्याचं ठरवून त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली.
असं म्हणतात की व्यवसायात उतरल्यावर तुम्ही तो किती निष्ठेने करता, त्यावर तुमची प्रगती ठरलेली असते. सोनालीताईंची व्यवसायवृद्धीची इच्छा प्रबळ असल्याने त्यांना तशीच साथ लाभायला सुरुवात झाली. ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी मनरेगा योजनेची माहिती त्यांना मिळाली आणि सोनालीताईंनी त्यामध्ये गांडूळखत योजनेसाठी त्यामध्ये अर्ज केला. तो अर्ज मंजूर होऊन त्या योजनेअंतर्गत गांडूळखत बेडचं चिऱ्याचं पक्कं बांधकामही पूर्ण झालं. सुमारे ५ बाय १२ फूट आकाराचा मोठा गांडूळखत वाफा तयार होऊन त्यात खत बनवायला सुरुवात झाली. सुमारे एक हजार किलो गांडूळखत तयार होऊ लागलं. या गांडूळखताचं वेगळेपण सांगताना सोनालीताई म्हणतात की या गांडूळखतात आम्ही ‘जीवामृत’ मिसळतो त्यातूनच मूल्यवर्धित खत तयार होतं.
आता मोठ्या प्रमाणावर गांडूळखत हाती असल्याने त्याच्या विक्रीचंही नियोजन तसं व्हायला हवं, म्हणून सोनालीताईंनी पतीच्या मदतीने गावातल्या आणि गावाबाहेरील बागायतदार शेतकऱ्यांना गांडूळखताची माहिती दिली. मार्केटिंगचं संपर्काचं हे तंत्र अवलंबून ग्राहक जोडण्याचं मोठं कामही सुरू केलं. त्यालाही चांगल यश मिळू लागलं आणि समूहातून घेतलेलं कर्ज त्यांनी फेडून टाकलं.
उद्योग म्हटला की यश अपयशाच्या खेळासोबत काही अडचणी यायला सुरुवात होते. उद्योगाची वाढ मार्गी लागत असतानाच उंदीर, घुशी, कीटक यांचा त्रास त्यांना जाणवू लागला, पण त्यांनी त्यावरही तातडीने उपाय करण्यास सुरुवात केली. गांडूळखताच्या वाफ्याभोवती संरक्षक जाळी बसवून त्यांनी त्याचा प्रतिबंध केला.
अनेक अडचणींवर मात करत आता सोनालीताईंचा हा गांडूळखताचा उद्योग खूप चांगला चालला आहे. सोनालीताईंसोबतच त्यांचे पतीही त्यांना या व्यवसायात बरोबरीने मदत करतात.
वर्षाला सुमारे तीन टन गांडूळखत बनवून त्याची विक्री चांगल्या प्रकारे होत आहे. या अभियानाअंतर्गत हा व्यवसाय कुणी करू इच्छित असतील तर त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम सोनालीताई करू इच्छितात. यशस्वीपणे उभ्या केलेल्या या उद्योगासाठी आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप शुभेच्छा.
सोनाली कपिल शिवलकर – ७५८८५४४९०६
(शब्दांकन : सौ. राधिका सचिन आठल्ये)


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

