Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

मोठी मागणी लक्षात घेऊन आंबाप्रक्रिया उत्पादनांचा उद्योग

Advertisements

रत्नागिरी तालुक्यातील गावखडीतल्या सौ. तृप्ती योगेश कदम यांनी स्वतःचा टेलरिंगचा व्यवसाय सांभाळून आंबाप्रक्रिया उद्योगात लक्ष घालायला सुरवात केली. आता त्यांनी तयार केलेल्या मालाला सर्वत्र मागणी आहे.
पुण्यातील ग्रामोन्नती.नेट या संस्थेद्वारे रत्नागिरीत दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी बचत गटांमधील महिलांसाठी उत्सव उद्योजकतेचा, सन्मान उद्योजिकांचा, लघुउद्योगांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये सन्मान करण्यात आलेल्या या उद्योजिकेविषयी…

रत्नागिरी तालुक्यातील गावखडीतल्या सौ. तृप्ती योगेश कदम यांनी स्वतःचा टेलरिंगचा व्यवसाय सांभाळून, पतीचा आंबा व्यवसाय मोठा करण्याचं स्वप्न पाहिलं आणि आता त्या ते यशस्वीरीत्या पूर्ण करताना दिसत आहेत. सौ. तृप्ती कदम लक्ष्मी स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करतात. तसेच त्या पावसच्या संग्राम प्रभागसंघात CRP (Community Resource Person- समूह संसाधन व्यक्ती) म्हणून कार्यरत आहेत. (उर्वरित मजकूर जाहिरातीच्या खाली)

तृप्तीताईंच्या माहेरी आंबा व्यवसाय मध्यम स्वरूपाचा होता. पण लग्नानंतर २००८ साली त्यांच्या पतीने सुरू केलेल़्या व्यवसायाशी त्या कायमच्या जोडल्या गेल्या. त्यांच्याकडचा आंबा कॅनिंगला जात असे. तेव्हा चांगल्या प्रतीच्या आंब्यांला मागणी आणि भाव जास्त असे. थोड्या कमी प्रतीच्या आंब्याला म्हणावा तेवढा भाव मिळेना. म्हणून घरच्यांशी यावर विचारविनिमय करून त्यांनी ठरवलं की, आपल्याकडे असलेल्या कॅनिंगच्या आंब्यापासून आपणच काहीतरी उत्पादनं बनवली, तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. आंब्याच्या रसापासून आंबापोळी आणि रस बनविण्याचा विचार करून थोड्याच दिवसांत यावर अंमलबजावणीही सुरू झाली.

तृप्तीताईंनी सुरुवातीला आंबा रसाच़्या पंधरा-वीस बाटल्या तयार केल्या. त्यातल्या काही बाटल्या नातेवाईकांना देऊन विक्री केली. ज्यांनी या रसाच्या बाटल्या घेतल्या, त्यांच्याकडून त्यांना पुन्हा मोठी मागणी आली. पहिल्यात वर्षी सुमारे १०० बाटल्या तयार करून त्याची विक्रीही झाली. त्याचबरोबर आंबापोळीलाही मागणी येऊ लागली. हळूहळू ती वाढू लागली.

त्या म्हणतात की घरगुती पद्धतीने रस बनवल्यामुळे या रसाच्या बाटल्यांची मागणी आता वाढत आहे. आता दरवर्षी पाचशे ते आठशे बाटल्या विकल्या जातात. गेल्या वर्षी पन्नास बाटल्या शिल्लक राहिल्या. तेव्हा तृप्तीताईंना त्यापासून नवीन पदार्थ बनवायची कल्पना सुचली. त्या रसापासून त्यांनी मँगो रोल बनवले. नंतर मँगाो रोललाही भरपूर मागणी येऊ लागली आणि ते उत्पादन हातोहात संपू लागलं.

तृप्तीताईंकडच्या या मालाची मुंबई, पुणे, चिपळूण, गणपतीपुळे, रत्नागिरी, सातारा आणि गुजरातमध्येही विक्री होऊ लागली. उमेद अभियानाअंतर्गत कुठेही सरस किंवा इतर प्रदर्शनं असतील, तर त्यामध्ये तृप्तीताई स्वतः माल नेऊन विक्री करतात. शिवसागर आंबारस, संग्राम मँगोरोल, संग्राम आंबापोळी या नावांनी त्यांची उत्पादनं विकली जातात.
हा व्यवसाय करताना अनेक अडचणींना त्या सामोऱ्या गेल्या. कधी कधी मागवलेल्या बाटल्या येताना फुटल्या, कधी अवकाळी पावसाचा फटका बसला. तरीही मनात व्यवसाय पुढे नेण्याची तळमळ आणि जिद्द असल्याने त्या सर्व संकटांना तोंड देत पुढे चालत राहिल्या.

या व्यवसायात त्यांच्या बरोबर चार जण आणि एक उद्योजिका काम करते. या व्यवसायाची वार्षिक उलाढाल आता पन्नास हजारापेक्षा जास्त आहे. हा उद्योग करताना त्यांनी एका व्यावसायिकाचं मार्गदर्शन घेतलं होतं. या व्यवसायासाठी त्यांनी कर्जही घेतलं आहे आणि आता त्या ते कर्ज फेडत आहेत.

भविष्यात त्यांना या व्यवसायासाठी यंत्रसामग्री घ्यायची आहे. या सगळ्यात त्यांच्या पतीची त्यांना मोठी साथ आहे. तयार होणाऱ्या सगळ्या मालाची वाहतूक ते स्वतः करतात. याशिवाय त्यांचा मुलगाही त्यांना या उद्योगात मदत करतो.

या व्यवसायामध्ये पडल्यावर त्यांची ओळख वाढली. आर्थिक स्थैर्य आलं. आत्मविश्वास वाढला. वेगवेगळ्या ठिकाणी सरस प्रदर्शनासाठी जाता आलं. याचा त्यांना खूप आनंद आहे. अनेक अडचणींवर मात करत त्यांचा उद्योग आता वाढतोय, मोठा होतोय. त्याचा अजून विस्तार करायला त्या पूर्णपणे सक्षम आहेत.
तृप्ती योगेश कदम – ८०८०९५२९८३
(शब्दांकन : सौ. राधिका सचिन आठल्ये)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version