प्रसंगी पदरमोड करून चालविला टेलरिंगचा व्यवसाय

देवळे (ता. संगमेश्वर) गावी राहणाऱ्या सौ. स्वरा समीर आंब्रे यांनी मनाविरुद्ध सुरू केलेल्या टेलरिंग व्यवसायात आता चांगलाच जम बसवला आहे.
पुण्यातील ग्रामोन्नती.नेट या संस्थेद्वारे रत्नागिरीत दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी बचत गटांमधील महिलांसाठी उत्सव उद्योजकतेचा, सन्मान उद्योजिकांचा, लघुउद्योगांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये सन्मान करण्यात आलेल्या या उद्योजिकेविषयी…

सौ. स्वरा समीर आंब्रे यांना त्यांच्या स्वतःच्या टेलरिंग व्यवसायाची आवड नव्हती. स्वारस्यही नव्हतं. पण त्यांच्या आईपासूनच या व्यवसायाची प्रेरणा मिळाली. त्यांची आई ब्लाऊज शिवायची. त्यामुळे आईनेच स्वरा यांना शिवणक्लास करायला लावला. त्यांनी २००९ मध्ये हा क्लास केला. तरीही ब्लाऊज शिवणं म्हणजे त्यांना कंटाळवाणं वाटायचं. पण आईने जबरदस्तीने टेलरिंग काम करायला लावलं. मग हळूहळू वाडीतली कामं येऊ लागली. पण टेलरिंग हा व्यवसाय होऊ शकेल, उपजीविकेचं साधन होऊ शकेल, असं त्यांना वाटल नाही. त्यातच २०१३ साली त्यांचं लग्न झालं आणि तिथूनच त्यांच्या व्यवसायाची त्यांना नव्याने ओळख पटायला लागली. सौ. आंब्रे यांच्या पतीचं झेरॉक्स सेंटर आणि स्टुडिओ होता. त्यांनी सौ. स्वरा यांना त्यांच्याच दुकानात टेलरिंग काम करायला सांगितलं. (उर्वरित मजकूर जाहिरातीच्या खाली)

तेव्हा देवळे गावात त्या तशा नवीनच होत्या. पूर्वी कधीही टेलरिंगकडे व्यवसाय म्हणून पाहिलं नव्हतं. पण झेरॉक्सच्या दुकानात बसायला लागल्यानंतर हळूहळू त्यांनी गावात स्वतःची एक ओळख निर्माण केली. आईसारखाच पतीचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे प्रोत्साहन मिळत गेलं. पण घर आणि दुकान हे जमेल की नाही, ही भीती होतीच. पण कुटुंबाच्या आर्थिक गरजाही दिसत होत्या. स्वतःसाठी काही खरेदी करायचं म्हटलं, तरी नवऱ्याकडे पैसे मागावे लागत होते. ते पैसे देत होतेच. पण मागितल्यानंतर ते नेहमीच पैसे देतील का, असा प्रश्न पडायचा आणि सारखे पैसे मागणंही कसंतरीच वाटायचं. याच विचारातून शेवटी टेलरिंगचा व्यवसाय चालू केला.

कोणताही व्यवसाय म्हटलं की अडचणी असतातच. तशाच्या त्या टेलरिंगमध्येही होत्याच. कधी फायदा व्हायचा, तर काही वेळा उत्पन्नच मिळायचं नाही. मात्र त्या अडीअडयणींवर मात करून परत नव्याने, हसतमुखाने, आनंदाने त्या व्यवसायासाठी सज्ज राहायला हवं, हीच मोठी शिकवण मिळाली.

साधा ब्लाऊज शिवणाऱ्या सौ. स्वरा आंब्रे यांनी नंतर अनेक नव्या गोष्टी आत्मसात केल्या. आज डिझायनर ब्लाऊजही त्या सहजपणे शिवतात. कपडे परिधान करायच्या महिलांच्या सवयी बदलल्या, तरी साडी आणि ब्लाऊज हा पारंपरिक पेहराव अजूनही केला जातो. त्यासाठी ब्लाऊजला मागणी असतेच. लहान मुलींना आणि मोठ्या बायकांनाही नऊवारी साडी नेसावीशी वाटते. पण ते तंत्र जमत नाही. मग नऊवारी साड्याही शिवून द्यायला सुरुवात केली. साड्यांपासून ड्रेस शिवले. जे नवीन नवीन शिकता येईल असं सगळं काम करण्याचा मनापासून प्रयत्न केला.

काही वाईट अनुभवही सौ. आंब्रे यांना आलेच. त्यांच्याकडे एक डिझायनर साडी आली होती. ती शिवून दिल्यानंतर इस्त्रीवाल्या काकांकडे पाठवली. पण त्यांना इस्त्री व्यवस्थित करता आली नाही. त्यामुळे त्या साडीवरच्या सगळ्या टिकल्या आणि मणी पडून गेले. आता ग्राहकाला कसं तोंड द्यायचं, असा प्रश्न पडला. सगळीकडे तशीच साडी शोधायचा प्रयत्न केला. पण सापडलीच नाही. किमान पाच हजाराची तरी ती साडी होती. साडी मुंबईहून मागवली गेली होती. शेवटी सौ. आंब्रे यांनी स्वतःच ती साडी एकेक मणी हाताने शिवून पूर्ण केली. त्याला १५ दिवस लागले. त्यासाठी १५ हजाराचा खर्च आला. पण एकही रुपया न घेता ग्राहकाला ती साडी द्यावी लागली. पण त्यामुळेच ब्लाऊजला ‘आरीवर्क करायची कला सौ. आंब्रे यांनी शिकून घेतली. म्हणजे वाईटातून पण चांगलं घडतं, याचा अनुभव त्यांना आला. एक नक्की शिकता आलं. आज कोणतं काम बिघडलं तर तेच मी काम नीटही करून देता येतं, असा आत्मविश्वास निर्माण झाला. टेलर म्हटलं की चांगले कपडे शिवणं अपेक्षित असतंच, पण चांगल्या कपड्याची वाट लावली, तर त्यातून अजून एक छान कपडा तयार बनवणं हीसुद्धा टेलरची एक ओळख आहे, असं त्यांना वाटतं.

पतीच्या मदतीने सुरू केलेल्या या व्यवसायामुळे सौ. आंब्रे यांची परिसरातील महिलांशी चांगली ओळख झाली. त्यातून व्यवसाय वाढत केला. नंतर त्यांनी स्वतःचं दुकान सुरू केलं आहे. आता त्यांच्याकडे गावाबरोबरच गावाच्या बाहेरून, आजूबाजूच्या गावातून कपडे शिवण्यासाठी येतात.
आता त्या नुसती कपडेच शिवत नाहीत, तर जोडव्यवसाय म्हणून पार्लर, सणानिमित्त लागणाऱ्या वस्तू, टेलरिंग मटेरियलची विक्री, डिझायनर ब्लाऊजपीस, रेडिमेड कपडे, सुयांची विक्रीही करतात.

सौ. आंब्रे यांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी सगळ्यात मोठी साथ बचत गटातून मिळाली. सुरवातीला भागभागभांडवलाची गरज खूप होती. त्यावेळी बचत गटाचा उपयोग झाला. त्याशिवाय व्यवसायात वाढ झालीच नसती. तो आधार बचत गटाने दिला.

या व्यवसायामुळे स्वतःची ओळख निर्माण झाली. लग्नानंतर पतीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सौ. आंब्रे यांनी आता त्यांच्या स्वतःच्या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. स्वतःला काही हवं असेल तर ते त्या स्वतः खरेदी करू शकतात. त्या स्वावलंबी, आत्मनिर्भर झाल्या आहेत. बचत गटामुळे ही ओळख निर्माण झाली, असं त्यांना वाटतं. आता गावात ‘सान्वी टेलर्स’ या नावाचं त्यांचं दुकान आहे. नोकरी करून कुणाचा तरी नोकर होण्यापेक्षा आज एका दुकानाची, व्यवसायाची मालक असल्याचा सौ. आंब्रे यांना अभिमान वाटतो. त्यांच्यापेक्षाही त्यांच्या आईला त्याचा अधिक अभिमान वाटत असल्याचे त्या सांगतात. त्यामुळेच आपल्या भारी वाटत असल्याचे सौ. आंब्रे सांगतात.

आईने जसा आशेचा किरण दाखवला, साथ दिली, तशीच साथ आपण आपल्या मुलीला देईन, तिलाही नोकरी नाही तर व्यवसाय करायला उद्युक्त करीन, असा निर्धार सौ. आंब्रे यांनी केला आहे. याशिवाय कोणाला मार्गदर्शनाची आणि मदतीची गरज वाटली तर मी नक्की मदतीचा एक हात पुढे करू करेन, अशी ग्वाही सौ. आंब्रे यांनी दिली.
सौ. स्वरा आंब्रे – ८८८८३८७१३६
(शब्दांकन : सौ. राधिका सचिन आठल्ये)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply