रत्नागिरी : करोनाच्या संकटाने महाराष्ट्रात रौद्र रूप धारण केलेले असतानाच, मुंबई आणि कोकण किनारपट्टीकडे येत्या दोन दिवसांत चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे या भागांत अति वेगाने वारे वाहतील, तसेच, काही ठिकाणी अति-मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने आज (३१ मे) रात्री सव्वाआठ वाजता जाहीर केलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला असून, ‘एनडीआरएफ’चे जवानही तैनात केले जात आहेत.
अरबी समुद्राच्या आग्नेय आणि मध्य-पूर्व भागात, तसेच लक्षद्वीप बेटांच्या परिसरात अत्यंत ठळक असा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. येत्या २४ तासांत अरबी समुद्राच्या पूर्व आणि मध्य भागात त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने आज (३१ मे) रात्री सव्वाआठ वाजता जाहीर केलेल्या ताज्या पत्रकाद्वारे जाहीर केला आहे. (अरबी समुद्रातील स्थितीचे उपग्रहाने टिपलेले ताजे छायाचित्र वर दिले आहे.)
हा कमी दाबाचा पट्टा दोन जूनला सकाळपर्यंत उत्तरेकडे सरकेल. त्यानंतर तीन जूनपर्यंत उत्तर-पूर्वेकडे सरकून उत्तर कोकण आणि दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीवर पोहोचेल, असे या अंदाजात म्हटले आहे. या चक्रीवादळाचे नामकरण निसर्ग असे करण्यात आले आहे.
या चक्रीवादळामुळे लक्षद्वीप, केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागांत एक जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडेल. दक्षिण कोकण आणि गोव्यात ३१ मे रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. त्यानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी आज (३१ मे) पाऊस कोसळलाही.
एक जून रोजी दक्षिण कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. दोन जूनला कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार किंवा अति-मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तीन जूनलाही दक्षिण कोकण आणि गोव्यात अशीच स्थिती असेल, असा अंदाज आहे.
तीन आणि चार जून रोजी उत्तर कोकण, तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार, तसेच काही ठिकाणी अति-मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तीन आणि चार जून रोजी अशीच स्थिती गुजरातचा दक्षिण भाग, दमण, दीव, दादरा, नगर हवेली आदी भागांत अपेक्षित आहे.
अरबी समुद्राच्या मध्य-पूर्वेकडील भागांत येत्या ४८ तासांत ताशी ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, त्यांचा वेग ६५ किलोमीटरपर्यंतही जाण्याची शक्यता आहे. दोन जूनच्या सकाळपासून कर्नाटक आणि दक्षिण कोकण किनारपट्टीवर ताशी ६५ ते ८५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर तीन जूनच्या सकाळपासून ताशी ९० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
मच्छिमारांना इशारा
या सर्व भागांत या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून, तीन ते चार जूनपर्यंत किंवा पुढील सूचना मिळेपर्यंत कर्नाटक, गोवा, कोकण, गुजरात या भागांतील मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
ओमान आणि येमेनकडे तयार झालेल्या दुसऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी होत असून, ते कमी वेगाने पश्चिम आणि नैर्ऋत्येकडे सरकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
‘एनडीआरएफ’चे जवान मुंबई, कोकणात सज्ज
दरम्यान, अरबी समुद्रात चक्रीवादळाला अनुकूल स्थिती निर्माण झाल्यामुळे पुण्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांच्या पाच बटालियनचे सहा चमू कोकणात तैनात करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पालघर जिल्ह्यात दोन आणि ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत प्रत्येकी एक चमू तैनात केला जात आहे. त्याशिवाय, मुंबईत तीन चमू आधीच तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती ‘एनडीआरएफ’कडून देण्यात आली.
हवामान खात्याचे चक्रीवादळाचे अंदाज बिनचूक
हवामान खात्याकडून वर्तवल्या जाणाऱ्या चक्रीवादळाच्या अंदाजात अधिक नेमकेपणा आहे. गेल्या अनेक चक्रीवादळांचे अंदाज हवामान खात्याने नेमके आणि वेळेआधी वर्तवल्यामुळे पुष्कळ जीवितहानी टाळणे शक्य झाले आहे. गेल्या वर्षीचे फणी चक्रीवादळ हे त्याचे चांगले उदाहरण आहे. बंगालच्या उपसागरात गेल्याच आठवड्यात आलेल्या अम्फान चक्रीवादळाचा अंदाजही हवामान खात्याने नेमकेपणाने वर्तवला होता. त्यामुळे जीवितहानी टाळण्यास मदत झाली.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे अधिक प्रमाणात तयार होत असली, तरी अरबी समुद्रात मात्र त्यांचे प्रमाण कमी असते. आताच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ मुंबई, कोकणाला धडकलेच, तर जूनमध्ये या भागांना चक्रीवादळ धडकण्याची घटना १८९१पासून प्रथमच घडेल, असे वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
(हवामान खात्याने ३१ मे रोजी रात्री सव्वाआठ वाजता जाहीर केलेले पत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
साप्ताहिक काेकण मीडीया वाचनीय आहे. मुद्देसूद व वेचक बातम्या, मजकूरातील नेमकेपणा, छान मुखपृष्ठ व छान अग्रलेख.
सर्वांत महत्वाचे म्हणजे अत्यंत माेजके परंतु पटकन लक्ष वेधून घेणारे blogs यामुळे पूर्ण अंक वाचावा असे वाटते.
एकंदरित एक दर्जेदार साप्ताहिक.