रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत ३७ नवे करोनाबाधित, तिघांचा मृत्यू

रत्नागिरी : जिल्ह्यात आज (२७ जुलै) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करोनाच्या नव्या ३७ रुग्णांची भर पडली. तिघांच्या मृत्यूची नोंद झाली, तर बरे वाटलेल्या ३४ रुग्णांना घरी पाठविण्यात आले. सिंधुदुर्गात १५ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ३२८ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण करोनाबाधितांची संख्या आता १५५७ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांपैकी रत्नागिरीतील ४, दापोलीतील ११, कामथे येथील २०, तर गुहागरमधील दोघे जण आहेत. दरम्यान, आज तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघे रत्नागिरीचे, तर एक रुग्ण राजापूरचा आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ५२ झाली आहे.

आज ३४ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९८७ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयातील आठ, कोव्हिड केअर सेंटर, वेळणेश्वर येथील ७, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी येथील ११, कोव्हिड केअर सेंटर घरडा, खेड येथील ८ रुग्ण आहेत. सध्या विविध रुग्णालयांमध्ये एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ५१८ आहेत.

जिल्ह्यात सध्या १४८ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात २६ गावांमध्ये, दापोलीमध्ये २ गावांमध्ये, खेडमध्ये ३५ गावांमध्ये, लांजा तालुक्यात ६, चिपळूण तालुक्यात ६५ गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात ३, गुहागर तालुक्यात ८ आणि राजापूर तालुक्यात ३ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२६ जुलै) सायंकाळपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार आणखी १५ व्यक्तींना करोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये कुडाळ तालुक्यातील २, कणकवली तालुक्यातील ६, सावंतवाडी तालुक्यातील ६ आणि देवगड तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या सध्या ३२८ झाली असून, आजपर्यंत करोनाबाधित २५६ रुग्णांना करोनामुक्त झाल्याने घरी पाठविण्यात आले आहे. सध्या ६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply