रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविल्याबद्दल आभार

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत रत्नागिरी रिफायनरीसाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल कोकण जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे मुखमंत्र्यांना धन्यवाद देण्यात आले आहेत. कोकणाच्या जनतेला बेरोजगारीच्या विळख्यातून बाहेर काढून समृद्धीची पहाट दाखवण्यासाठी रिफायनरी प्रकल्पाची लवकरात लवकर अधिसूचना जारी करावी, असे आवाहन जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर आणि प्रवक्ते अविनाश महाजन यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात केले आहे.

मार्च २०१८ साली रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाली, तेव्हा कोकणातील जनतेची अस्वस्थता ध्यानात घेऊन प्रतिष्ठानने प्रकल्पातील स्थानिक जमीनधारकांना संमती देण्यासाठी आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रकल्पातील जमीनमालकांनी आठ हजार ५०० एकर जमिनीची संमती प्रतिष्ठानकडे जमा केली आहे. त्यानंतर २० जुलै २०१९ रोजी कोकण जनकल्याण प्रतिष्ठान आणि कोकण विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर रिफायनरी समर्थनसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यानंतर प्रतिष्ठानकडे एकत्रित झालेली जमीनधारकांची संमती व जनतेची रिफायनरी प्रकल्पाबाबतची स्वागताची भूमिका सरकारदरबारी पोहोचवण्यासाठी स्थानिक आमदार व खासदारांमार्फत अनेक प्रयत्न केले होते. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. या सर्व अडचणींवर मार्ग काढण्यासाठी गेल्या फेब्रुवारीमध्ये प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या मध्यवर्ती ठिकाणी राजापूर तालुक्यातील विल्ये गावात डोंगर तिठा येथे संमतीपत्रे प्रसारमाध्यमांसमोर ठेवून ती सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन प्रसारमाध्यमांना करण्यात आले. त्यानंतर मार्चमध्ये प्रकल्प विरोधकांच्या शंभर टक्के विरोध या पोकळ उक्तीला छेद देण्यासाठी प्रतिष्ठान आणि इतर प्रकल्प संघटनांनी एकत्रितपणे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या मध्यभागी विल्ये येथे समर्थकांचा मेळावा घेतला.

या सर्व प्रयत्नांनंतर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आहे. कोकणातील जनता उत्सुकतेने वाट पाहत असतानाच करोनाच्या महामारीने देशाबरोबर महाराष्ट्र आणि कोकणाला विळखा घातला. या महामारीत प्रचंड बेरोजगारीची कुऱ्हाड राज्यावर कोसळली आहे. लाखो बेरोजगार मुंबई-पुण्यासारख्या शहरातून आपला रोजगार गमावून कोकणात परतले आहेत. या पार्श्वभूमीवर अखंड कोकणातील जनता रिफायनरी प्रकल्पाकडे आशेने नजर लावून बसलेली असतानाच मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाबाबत सकारत्मक भूमिका घेतली आहे. त्यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठानकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहेत, असे पत्रकात म्हटले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply