कोकणात रेल्वेगाड्या सोडण्यासाठी कोकण रेल्वे समन्वयक समितीचे आता फडणवीसांना साकडे

ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गणपती गाड्या सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून त्याला यश आले नसल्याने कोकण रेल्वे समन्वयक समितीने आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.

याबाबत समितीने श्री. फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की कोकणातील सर्व प्रवासी संघटना णेशोत्सवासाठी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड येथे जाण्यासाठी चाकरमान्यांकरिता गेल्या दोन महिन्यांपासून राज्य सरकारकडे एसटी बस आणि कोकण रेल्वेची सनदशीर मार्गाने मागणी करीत आहोत; मात्र राज्य सरकारने एका बाजूला १४ दिवसांची होम क्वारंटाइनची भीती दाखवली. त्यामुळे हवालदिल झालेल्या चाकरमान्यांनी प्रसंगी दुसऱ्याकडून उसनवारी घेऊन नेहमीच्या प्रवासभाड्याच्या पाचपटही भाडे देऊन ते कोकणात आपल्या गावी गेले. सुमारे ८० टक्के चाकरमानी गावी पोहोचल्यानंतर राज्य सरकारने एसटी बसेस आणि कोकण रेल्वेची घोषणा केली. त्यातील बस सुरू झाल्या; मात्र कोकण रेल्वे सुरू झालेली नाही. मार्चमध्ये होळीच्या दरम्यान लॉकडाउन जाहीर झाल्यापासून आजपर्यंत कोकणात साधारण पाच लाख चाकरमानी पोहोचले आहेत; मात्र हे सर्व जण गणेशविसर्जनानंतर मुंबईत परतणार आहेत. कोकण रेल्वे सुरू केल्यास कमीत कमी खर्चामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून लोकांना मोठ्या संख्येने परत मुंबईत पोहोचणे शक्य होणार आहे. मात्र तसे झाले नाही, तर चाकरमान्यांची मोठी आर्थिक लूटमार होईल.

लॉकडाउनच्या काळात राज्य सरकार उत्तर भारतीयांना रेल्वेने मोफत त्यांच्या गावी सोडू शकते; मात्र राज्यातील भूमिपुत्रांसाठी सरकार काहीच करू शकत नाही. कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. तो सरकारकडे हात पसरणार नाही. हे लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर आरक्षित रेल्वे सुरू कराव्यात, अशी मागणी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विधानसभा, विधान परिषद, केंद्र आणि राज्य सरकारकडे या मागणीचा मागणीचा पाठपुरावा करावा आणि कोकणातील चाकरमान्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.

ठाण्यातील कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे सुजित लोंढे, वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे शांताराम नाईक, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे डी. के. सावंत, लालबाग येथील गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघटनेचे दीपक सावंत, कल्याण-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे सुनील उत्तेकर, बोरिवलीच्या कोकण रेल्वे जागरूक संघाचे नितीन गांधी, निसर्गरम्य संगमेश्वर आणि निसर्गरम्य चिपळूण संस्थेचे संदेश झिमण आणि नवी मुंबईतील रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाचे विजय सावंत यांच्या सहीचे हे निवेदन श्री. फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. तसेच पत्राची प्रत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार नारायण राणे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पाठविण्यात आली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply