रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१४ ऑगस्ट) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करोनाचे १०१ नवे रुग्ण आढळले असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या २६८१ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १२ नवे रुग्ण सापडले असून, तेथेही तिघांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
आज (ता. १४) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणचे १२ रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या १७८१ झाली आहे; मात्र बरे झालेल्यांची टक्केवारी कालच्या तुलनेत आज घटली आहे. काल ती ६८.५ टक्के होती. आज ती दोन टक्क्यांनी घटून ६६.४ टक्के झाली आहे.
आज जिल्हा शासकीय रुग्णालयातून चार, कोव्हिड केअर सेंटर, घरडा येथून ६, तर संगमेश्वर आणि होम आयसोलेशनमधील प्रत्येकी एक असे १२ रुग्ण उपचार घेतल्यानंतर बरे झाले. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आज सायंकाळपर्यंत जिल्ह्यात अॅन्टीजेन चाचणीत ६०, तर आरटीपीसीआर चाचणीत ४१ असे एकूण १०१ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २६८१ झाली. आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी ४, कळंबणी १३, गुहागर १९, दापोली ४, मंडणगड १. ॲन्टीजेन टेस्ट – रत्नागिरी २७, कामथे २०, राजापूर ४, घरडा रुग्णालय ९.
आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तिघा करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील ७५ वर्षीय रुग्ण, कीर्तीनगर, रत्नागिरी येथील ५८ वर्षीय रुग्ण आणि मिरकरवाडा, रत्नागिरी येथील ५८ वर्षीय करोना रुग्ण या तिघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता ९४ झाली आहे. सध्या ८०६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण उपचारांखाली आहेत.
जिल्ह्यात २०२ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात ३४, दापोली १०, खेड ४७, लांजा ७, चिपळूण ८९, मंडणगड २, राजापूर तालुक्यात ८, संगमेश्वर १ आणि गुहागर तालुक्यात ४ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
सध्या १४३ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात असून त्यांची रुग्णालयनिहाय आकडेवारी अशी – जिल्हा रुग्णालय २७, समाजकल्याण, रत्नागिरी ६, उपजिल्हा रुग्णालय, कामथे ५०, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी २४, कोव्हिड केअर सेंटरस घरडा ३, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे ७, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली २०, गुहागर ५, पाचल १.
मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आल्याने व्यक्तींना होम क्वारंटाइन केले जाते. आजअखेर होम क्वारंटाइनखाली असणाऱ्यांची संख्या ५२ हजार ५१७ आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गातील एकूण रुग्णांची संख्या ५६८वर पोहोचली असून, मृत्यूंची संख्या ११वर पोहोचली आहे. ३९९ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या १५८ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. सध्या जिल्ह्यात ५५ कंटेन्मेंट झोन आहेत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
