रत्नागिरी : प्रयोगशाळेमधील सरासरी दैनिक तपासणीच्या गतीत रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्याची नोंद राज्य पातळीवर घेण्यात आली आहे. गेल्या तीस दिवसांत दररोज सरासरी १७९ तपासण्यांचा दर असलेल्या रत्नागिरीच्या प्रयोगशाळेत गेल्या आठवडाभरात दररोज २४९ नमुन्यांची तपासणी झाली आहे. यासोबतच अँटीजेन तपासण्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. दरम्यान, माजी खासदार नीलेश नारायण राणे यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते सध्या सेल्फ क्वारंटाइन झाले असून, त्यांनी स्वतःच ट्विट करून ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
आज (ता. १६) सायंकाळपर्यंतच्या २४ तासांत रत्नागिरी प्रयोगशाळेतून केवळ सात रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून, अँटीजेन चाचण्यांमध्ये ९१ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्कर्ष आले आहेत. रुग्णांचे लवकर निदान करण्यास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गती प्राप्त झाली आहे.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ९८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८४५ झाली आहे. आजच्या पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी ७, ॲन्टीजेन टेस्ट – रत्नागिरी २९, कळंबणी ४, कामथे ४५, घरडा रुग्णालय १३.
आज जिल्हा रुग्णालयातून ३, तसेच होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असताना बरे झालेल्या २५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १८१६ झाली आहे. दरम्यान, शांतीनगर, रत्नागिरी येथील १५ ऑगस्ट रोजी सकाळी अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या ५२ वर्षीय करोना रुग्णाचा काल रात्री १२ वाजून ४५ वाजता मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता १०२ झाली आहे. सध्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९२७ आहे.
संस्थात्मक विलगीकरणात १६० जण असून, ते विविध रुग्णालयांमध्ये आहेत. त्याचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी ४३, समाजकल्याण भवन, रत्नागिरी ६, उपजिल्हा रुग्णालय, कामथे ४६, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी २७, कोव्हिड केअर सेंटर, घरडा ५, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे ७, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली २०, गुहागर ५, पाचल १.
मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले जाते. आजअखेर होम क्वारंटाइनखाली असणाऱ्यांची संख्या ५० हजार ९०४ इतकी आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
