‘फलोद्यानाची कास धरली, तर कोकणवासीय श्रीमंत होतील’; डॉ. जी. डी. जोशींनी दिली विविध संधींची माहिती

राजापूर : भात आणि नाचणीच्या आतबट्ट्याच्या शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा कोकणातील शेतकऱ्यांनी फलोत्पादनाची कास धरली, तर कोकणवासीय श्रीमंत होतील, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. गोविंद जोशी यांनी केले.

मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघाच्या राजापूर शाखेच्या पुढाकाराने देवाचे गोठणे जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांकरिता ऑनलाइन मीटिंग नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. संघाचे सहसचिव भास्कर चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले, की करोनामुळे अनेक चाकरमानी गावी आले आहेत. त्यांनी शेती केली. अनेकांनी प्रथमच शेती केली. शेतीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तो आश्वासक आहे.

संघाचे तालुका शाखाध्यक्ष शिवाजी तेरवणकर यांनी ऑनलाइन मार्गदर्शन शिबिराच्या आयोजनाची माहिती दिली. ओबीसी समन्वयक चंद्रकांत बावकर म्हणाले, की इतर व्यवसाय बंद पडले. फक्त शेती व्यवसाय ठप्प झाला नाही. होणारही नाही. त्यामुळे करोना ही संधी समजून शेतकऱ्यांनी जमिनीशी संवाद साधला पाहिजे. हितगूज केले पाहिजे. हक्काची जमीन असावी. शेतीविषयक काही करता येऊ शकते का, गटशेती, सामूहिक शेतीचा विचार करता येतो का, या दृष्टीने विचार करावा. कारण मनुष्यबळ कमी झाले आहे. कोकणातील लोकांनी कोकणातच राहिले पाहिजे. शेतीचे प्रेम वाढावे.

डॉ. जोशी यांनी फलोद्यान, उत्पादन वाढवण्यासाठी काय केले पाहिजे, सामुदायिक फलोद्यानासाठी काय केले पाहिजे आणि फलोद्यानात कोणत्या संधी आहेत याविषयी मुद्देसूद मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की फलोद्यानाला पर्याय नाही. भात, नाचणीची शेती आतबट्ट्याची ठरते. त्याला फलोद्यानाची जोड द्यायला हवी. आपल्याकडे असलेल्या चांगल्या आणि वेगळ्या झाडाची नोंदणी केली, तरी त्यापासून उत्पन्न मिळू शकते. नोंदणीच्या अर्जाचा नमुना कोकण कृषी विद्यापीठाकडे मिळेल.
खेडच्या तालुक्यातील सरवटी भाताची नोंदणी या पद्धतीने एका शेतकऱ्याने केल्याची माहिती देऊन ते म्हणाले, की आपल्याकडच्या वेगळ्या चवीच्या आंब्याची किंवा कोणत्याही कृषी उत्पादनाची नोंदणी केली, तरी उत्पन्न मिळू शकते. अन्नाबरोबरच पोषणमूल्य मिळाले पाहिजे. त्यासाठी फलोद्यान आवश्यक आहे.

ते म्हणाले, की केवळ पावसाच्या पाण्यावर होणारी अनेक पिके कोकणात होतात. आंबा, काजू, चिकू, फणस, करवंद, कोकम ही पिके पावसावर चांगली येतात. याशिवाय भाज्या, कंदवर्गीय फळे, पाणी न देता येणारी पिके, दालचिनी, काळी मिरी अशी मसालापिके ही कोकणाची ताकद आहे. अशी पिके पोषणमूल्याच्या बाबतीतही उपयुक्त असतात. कारण ती आरोग्यपूर्ण आणि संरक्षक असतात. फलोद्यानापासून रोजगाराच्या संधीही भरपूर उपलब्ध होतात. आंबा, काजू एकाच वेळी येतात. दर मिळत नाही. दर पडतो. नुकसान होते. त्यामुळे प्रक्रिया उद्योगांची साथ घेतली पाहिजे. सामुदायिक फलोत्पादनाचाही विचार शेतकऱ्यांनी करावा.

फलोद्यानाची पंचसूत्री सांगताना डॉ. जोशी म्हणाले, की प्रत्येकाने हवामान आणि जमीन, पोत, पोषणमूल्य, जीवजंतू, जमिनीचा सामू यांची तपासणी सातत्याने करावी. कोकणात फलोद्यानासाठी हवामान उपयुक्त आहे. तरीही जमिनीचे आरोग्य दर वर्षी तपासावे. जमिनीनुसार पिकाची आणि जातीची, वाणाची निवड करावी. नारळ, कोकमाची झाडे लावावीत. विद्यापीठाला भेट द्यावी. तेथून माहिती घ्यावी. उत्पादन वाढविण्यासाठी आंब्याच्या बागेत सुरण, नारळबागेत अननस, केळी, सुरण अशी आंतरपिके घ्यावीत. नव्या लागवडीनंतर नियोजनबद्ध पद्धतीने मुख्य पीक येईपर्यंत उत्पन्न मिळण्यासाठी वर्षभर भाजीपाला करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

सघन लागवड, यांत्रिकीकरण, प्रक्रिया उद्योग, सह्याद्री पर्यटन, आंबा बाग पर्यटन, निर्यातक्षम उत्पादन, मधुमक्षिका पालन, कृषी उद्योग, कृषी पर्यटन, मत्सोद्योग इत्यादी विविध प्रकारांनी, तसेच मोठ्या सामाजिक स्तरावर मिशन म्हणून उपक्रम हाती घेतल्यास समृद्धी येऊ शकेल, असेही डॉ. जोशी यांनी सांगितले. ज्यांच्याकडे खूप कमी वेळ आहे, ज्यांच्याकडे मध्यम वेळ आहे आणि ज्यांच्याकडे शेतीसाठी पूर्ण वेळ आहे, त्यांच्यासाठी यशस्वी शेतीची विविध मॉडेल्स असल्याचेही ते म्हणाले.

मंडणगड येथील शेतीनिष्ठ शेतकरी सखाराम माळी यांनी आपली यशोगाथा या वेळी सांगितली. फलोत्पादनातून कोकण विकासाविषयी त्यांनी सामूहिक आणि गटशेतीची उपयुक्तता सांगितली. आंबा कोकणातून जातो. मुंबईत त्याचे लोणचे होते. आपल्याकडे लोणचे होईल का, याचा विचार आपण केला नाही. कोकणातील फळे विषमुक्त आहेत. त्यामुळे आपल्याकडच्या फळांना मागणी चांगली आहे. चॉकलेट कँडी, काजूगर पावडर, काजूच्या बोंडापासून रस, चोथ्यापासून पशुखाद्य तयार करता येते. त्याबाबतचे तसेच इतर पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण घ्यावे. त्याबाबत कृतिशील विचार व्हावा. उद्योजकता निर्माण करावी लागेल. सामुदायिक शेती आणि सहकार आवश्यक असून एकटा टिकत नाही. त्याचे नुकसान होते. फळप्रक्रिया उद्योगात एकटाच असेल आणि तो विक्रीसाठी गेला, तर खरेदीला कोणी नाही, तेथे गेला, तर प्रॉडक्शनला कोणी नाही, अशी स्थिती होते. त्यासाठीच गटशेती आणि सामुदायिक प्रक्रिया उद्योग आवश्यक आहे, असे श्री. माळी यांनी सांगितले.

प्रथमच आयोजित केलेल्या या ऑनलाइन परिषदेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply