‘माझी शाळा-माझे शिक्षक’; शिक्षक दिनानिमित्त ‘कोमसाप-मालवण’ शाखा लेखमालेतून जागविणार स्मृती

मालवण : पाच सप्टेंबर रोजी असलेल्या शिक्षक दिनानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यात कोमसाप-मालवण शाखेचे आजीव सदस्य असलेले विविध स्थानिक लेखक आपल्याला घडविणाऱ्या शाळेच्या आणि शिक्षकांच्या स्मृती जागवणारे लेख लिहिणार आहेत. ही लेखमाला पाच सप्टेंबरपासून २० दिवस चालणार असून, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते नुकतेच या उपक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन झाले. हे सर्व लेख ‘कोमसाप – मालवण’च्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून प्रकाशित होणार आहेत.

‘शिक्षण म्हटले की प्रत्येकाला आपण प्रथम शिकलो ती शाळा आठवते. ते गुरुजन आठवतात. कोकण मराठी साहित्य परिषदेने सुरू केलेल्या या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. त्यांच्या इतर दर्जेदार उपक्रमांप्रमाणेच हाही उपक्रम सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागास प्रेरणादायी ठरेल,’ असे उद्गार एकनाथ आंबोकर यांनी उद्घाटनप्रसंगी काढले.

या उपक्रमाला साप्ताहिक कोकण मीडियाचे सहकार्य लाभले आहे. पाच सप्टेंबर २०२०पासून kokanmedia.in या वेबसाइटवर दररोज एक लेख प्रसिद्ध होईल आणि लेखाची लिंक ‘कोमसाप-मालवण’च्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केली जाईल. त्यानंतर ते लेख जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, तसेच राज्याच्या अन्य भागांतही पाठविण्यात येणार आहेत.

असगणी येथील माधव गावकर पहिला लेख लिहिणार असून, तो लेख ‘असगणी नं. १’ या शाळेतील शिक्षक लक्ष्मण शिवाजी परब यांच्यावर असेल. समारोपाचा लेख रामचंद्र आंगणे लिहिणार असून, ते ‘ओसरगाव नं. १’ या शाळेतील आदर्श शिक्षिका सुनंदा गोविंद राणे यांच्यावर लिहिणार आहेत. मेघना जोशी, विजय चौकेकर, सुगंधा गुरव, सदानंद कांबळी, बाबू घाडीगावकर, अर्चना कोदे, कल्पना मलये, उज्ज्वला धानजी, योगेश मुणगेकर, वैजयंती करंदीकर, शिवराज सावंत, विद्यानंद परब, शीतल पोकळे, गुरुनाथ ताम्हणकर, श्रद्धा वाळके, मंदार सांबारी, विशाखा चौकेकर, भानू तळगावकर या लेखकांनी त्यांच्या शाळा आणि शिक्षकांबद्दल लिहिलेले लेख यात वाचायला मिळणार आहेत.

या उपक्रमामागचा आपला उद्देश व्यक्त करताना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर म्हणाले, ‘कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने अनेक साहित्यिक उपक्रम राबविले. ‘माझी शाळा! माझे शिक्षक!’ हा उपक्रम त्यातील सर्वांत महत्त्वाचा आहे. शिक्षण क्षेत्रात आज नेत्रदीपक प्रगती झाली आहे. करोना महामारीमुळे ऑनलाइन शिक्षण हा आता महत्त्वाचा पर्याय होणार आहे. या पार्श्वभूमीवर, सुसज्ज इमारत, ग्रंथालय, प्रयोगशाळा, वाचनालय आदी सुविधा नसताना पन्नास वर्षांपूर्वी ज्या शिक्षकांनी जी पिढी निर्माण केली, त्यांचे हे लेखनानुभव नवीन पिढीला मार्गदर्शक ठरतील.’

मंगेश म्हस्के (अध्यक्ष-कोमसाप सिंधुदुर्ग), रुजारिओ पिंटो (केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, कोमसाप) यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

पुढील लिंकवर नोंदणी करा : https://bit.ly/3hJSPIY व्हॉट्सअॅपवर संपर्कासाठी https://bit.ly/2NHmTr7 येथे क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply