रत्नागिरी : करोनाचे जगावर आलेले संकट दूर करण्याचे गाऱ्हाणे घालत आणि शासनाच्या नियमांचे शक्य तितके पालन करत आज (एक सप्टेंबर) रत्नागिरी जिल्ह्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यात आज दुपारीच विसर्जनाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील ३६ हजार ७३० घरगुती आणि ५१ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन आज करण्यात आले. आज कोणत्याही ठिकाणी विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या नाहीत. रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि दापोली येथे नगरपालिकांनी गणेशमूर्तींच्या संकलनाची केंद्रे सुरू केली होती; मात्र ग्रामीण भागात तलाव, नद्या आणि समुद्रावरच विसर्जन करण्यात आले. त्यासाठी पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली होती.
यंदाच्या गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करावा, असे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. या आदेशाचे पालन करत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अगदी साधेपणाने हा उत्सव साजरा केला. गणरायांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत शहर किंवा ग्रामीण भागात कोठेही उत्सवाचा जल्लोष नव्हता. शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा उत्सव साजरा केला जात होता. दर वर्षी सार्वजनिक मंडळांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

या वर्षी १०८ सार्वजनिक मंडळांनी गणपतींचे पूजन केले. त्यानंतर दर वर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशीचा जल्लोष काही वेगळाच असतो. सकाळी १० वाजता सुरू होणारी विसर्जनाची मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरूच असते. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा या वर्षी खंडित झाली. यंदा ढोलताशांच्या गजरात निघणाऱ्या मिरवणुकांचा पूर्णपणे अभाव होता. फटाक्यांची आतषबाजीही झाली नाही. काही नगरपालिकांनी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. निर्माल्य जमा करण्यासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आला होता.
विसर्जनादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी जीवन रक्षक तसेच अग्निशमन बंब तैनात ठेवण्यात आला होता. मात्र कोणताही अनुचित प्रकार सायंकाळपर्यंत नोंदविला गेला नव्हता.
