दापोलीतील प्रख्यात डॉ. वसंत मोरेश्वर मेहेंदळे यांचे निधन

दापोली : येथील प्रख्यात डॉ. वसंत मोरेश्वर मेहेंदळे (वय ६७) यांचे आज (चार सप्टेंबर २०२०) पुणे येथे निधन झाले. विशेष म्हणजे, करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सुचविलेल्या उपायांकडे, तसेच खासगी डॉक्टरांची सेवा घेताना त्यांच्या सुरक्षेकडे शासनाकडून होणारे दुर्लक्ष होत असल्याने कंटाळून जाऊन गेल्या १ सप्टेंबर २०२० पासून त्यांनी आपले ४२ वर्षांचे रुग्णालय कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

डॉ. मेहेंदळे यांनी हर्णै (ता. दापोली) येथे वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. गेली ४२ वर्षे ते वैद्यकीय व्यवसाय करत होते. सुमारे ३७ वर्षे त्यांचे रुग्णालय दापोलीत सुरू होते. त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती. त्यामुळे काही काळ त्यांनी वकिलीही केली. रुग्णालयाच्या व्यापात त्यांना वकिली करणे शक्य नसले, तरी ते अनेकांना कायद्याचा सल्ला देत असत. अडेल त्याला मदत करण्यासाठी त्यांचा हात नेहमीच पुढे असायचा. गरीब रुग्णांकडून त्यांनी कधीच पैसे घेतले नाहीत. उलट त्याला मदत करण्याची त्यांची वृत्ती होती. म्हणूनच देवमाणूस म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यामुळेच त्यांनी रुग्णालय कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी आली, तेव्हा अनेकांना धक्का बसला. (ती बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वैद्यकीय व्यवसायाव्यतिरिक्त दापोली एज्युकेशन सोसायटीचे संचालक, दापोली अर्बन बँकेचे संचालक आणि अध्यक्ष, दापोली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अशी अनेक पदेही त्यांनी भूषविली. ते निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते होते. साहित्य, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचा लौकिक होता.

गणेशोत्सवापूर्वी प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाले होते. तेथेच त्यांचे आज दुपारी तीन वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. वर्षा, दोन कन्या, जावई असा परिवार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply