रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणे मत्स्यशेतीसाठी वार्षिक भाड्याने उपलब्ध

मुंबई : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणे माशांच्या शेतीसाठी वार्षिक भाड्याने उपलब्ध असून, येत्या आठ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असलेल्या या निविदा संधीचा लाभ कोकणातील उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन कोकणभूमी प्रतिष्ठानच्या कोकण बिझनेस फोरमतर्फे करण्यात आले आहे.

कोकणात शेकडो छोटी-मोठी धरणे शासनाने बांधली आहेत. या धरणांमध्ये माशांची शेती शक्य आहे. याच धरणांमध्ये पिंजरा पद्धतीने अत्याधुनिक माशांची शेती करणेही शक्य आहे. धरणे लिलाव पद्धतीने भाडेपट्टीने पाच वर्षांसाठी दिली जातात. कोकणातील तरुणांना या विषयाची माहिती नसल्यामुळे पुन्हा कोकणाबाहेरील लोक हे तलाव भाडेपट्टीने घेतात आणि तेथे मत्स्यशेती करतात. केंद्र शासनाने मत्स्यसंपदा विकासासाठी अनेक योजना आग्रहाने सुरू केल्या आहेत. मत्स्यशेतीसाठी ४० ते ६० टक्के अनुदान राज्य व केंद्र शासनाकडून एकत्रितपणे मिळते.

कोकणातील धरणे, बंधारे म्हणजे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे जलसाठे आहेत. त्यांचा उपयोग माशांच्या शेतीसाठी व्हावा, यासाठी सुनियोजित अभियान कोकण बिझनेस फोरमच्या माध्यमातून राबविले जात आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणांच्या निविदा सुरू झाल्या आहेत. ज्यांना भविष्यात माशांची शेती करायची आहे, त्यांनी या निविदा प्रक्रियेत भाग घेऊन आपल्या भागातील छोटी धरणे, तलाव यांच्या निविदा भराव्यात. सरकारी योजनांचा समन्वय, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण, एकत्रित मार्केटिंग समन्वय याकरिता कोकण बिझनेस फोरम काम करणार आहे.

बाहेरचे लोक कोकणात येऊन काम करतात, अशा चर्चा करण्यापेक्षा, कोकणातील धरणे कोकणातील तरुणांनी पुढाकार घेऊन व्यवसायासाठी उपलब्ध करून घ्यावीत. ई टेंडर येत्या आठ सप्टेंबरपर्यंत भरायचे आहे. महाराष्ट्र राज्याच्या फिशरीज विभागाच्या वेबसाइटवर ही टेंडर्स आणि त्याचे संभाव्य भाडे प्रत्यक्ष पाहता येईल. तातडीने या विषयात कोकणातील तरुणांनी आणि उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मुंबईत तारापोरवाला मत्स्यालयात असलेल्या राज्याच्या फिशरीज विभागाशी ०२२-२२८२१२३९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply