रत्नागिरीत व्यापाऱ्यांचा जनता कर्फ्यूला विरोध; बाजारपेठ सुरू राहणार

रत्नागिरी : जिल्ह्यासह रत्नागिरी तालुक्यात करोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्या अनुषंगाने जनता कर्फ्यू सुरू करण्याचा प्रयत्न रत्नागिरी व्यापारी संघटनेने केला; मात्र त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केल्यामुळे बाजारपेठ सुरूच राहणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४८५५ झाली आहे. बाजारपेठेतही अनेक व्यावसायिक व कामगार करोनाबाधित आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उदय पेठे यांनी जनता कर्फ्यूची संकल्पना मांडली. त्या संदर्भात व्यापाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी आज (सहा सप्टेंबर) श्री राधाकृष्ण मंदिरात बैठक बोलावण्यात आली होती.

दुकाने बंद ठेवण्याच्या संकल्पनेला बैठकीत व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला. लॉकडाउनमुळे आधीच व्यापार तोट्यात आला आहे. आता दुकाने बंद ठेवली, तर मोठ्या नुकसानाला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे व्यापार बंद ठेवणे झेपणार नसल्याचे मत अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. ज्या कोणाला स्वेच्छेने दुकान बंद ठेवायचे आहे, त्याने ते ठेवावे. आम्ही ठेवणार नाही, असे रोखठोक मत व्यापाऱ्यांनी सभेत नोंदवले.

त्यामुळे आता रत्नागिरी शहरातील जनता कर्फ्यूच्या कल्पनेला तूर्तास पूर्णविराम मिळाला असून, आवश्यक खबरदारी घेत बाजारपेठ सुरू राहणार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply