माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक १३ (आचरे केंद्रशाळेतील प्रभू बाई)

श्रीमती प्रभू बाई

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील १३वा लेख आहे विद्यानंद परब यांचा… आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील बा. ना. बिडये विद्यालय केंद्रशाळेतील शिक्षिका श्रीमती शैलजा गणेश प्रभू यांच्याविषयीचा…
………
शालेय जीवनाच्या सुरुवातीपासून आता ३८व्या वर्षापर्यंतचा प्रवास डोळ्यांसमोर येतो आहे. तो दिवस आठवू लागला ‘केंद्रशाळा आचरे नंबर एक’मधील प्रवेशाचा. वडिलांनी शाळेमध्ये सोडले आणि शालेय जीवनाला सुरुवात झाली. आठवड्याभरानंतर चांगली ओळख झाली ती माझ्या आयुष्यातल्या पहिल्या गुरू सौ. प्रभू बाई यांच्याशी. माझ्या प्राथमिक शाळेत सर्व गुरूंनी मला घडवलं. आजही आम्हाला घडवत आहेत ते श्री. कांबळी व ठाकूर गुरुजी. त्या सर्व गुरूंचा मी आयुष्यभर ऋणी असणारच आहे.

… पण आज मला लिहावं लागेल त्या माझ्या आवडत्या शिक्षिका सौ. प्रभू बाईंविषयी. शाळेत जायला नाखूष असणाऱ्यांना रात्री गजराचे घड्याळ लावून सर्वांत पहिलं उपस्थित राहून दरवाजाला जास्वंद, रानफुलांची माळ बनवून लावण्याची आवड लावली ती प्रभू बाईंनी. माझे बालमित्र-मैत्रिणीदेखील आवडीने शाळेत यायला लागल्या. ही किमया होती प्रेमळ स्वभावाची, आवाजातील गोडव्याची, प्रसंगी शिस्तप्रियता व कठोरतेचीदेखील. त्यांनी आमच्याकडून लिहून घेतलेली ‘अ आ इ… पासून क ख ग घ’पर्यंतची अक्षरे असोत, किंवा म्हणून घेतलेले पाढे असोत, हाताच्या बोटांना हस्ताक्षरांचं व जिभेला लावलेल्या स्वरांचं वळण हे आयुष्यभरासाठीच.

‘ण’ व ‘न’ या अक्षरांचा उच्चार, तसेच ऑक्टोम्बर म्हणायचे की ऑक्टोबर, पाढे, वजाबाकी, भागाकार हेसुद्धा त्यांनी सर्व मुलांना कळकळीने शिकवलं. ‘आपल्या शिष्याला समाजात वावरताना कोणी नाव ठेवू नये, तसेच तो आदर्श नागरिक बनला पाहिजे’ हेच आमच्या प्रभू बाईंना अभिप्रेत होतं.

जेव्हा माझ्या शालेय मंदिरासमोरून जातो, तेव्हा माझ्या सर्व गुरूंचे ध्वनी एकामागोमाग कानामध्ये गुंजतात! माझ्या प्रभू बाई, प्रभू गुरुजी, तसेच काही गुरू आज या जगात नाहीत; पण त्यांनी घडवलेले संस्कार आयुष्यभर सोबत आहेत. त्यांनी दिलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावरच समाजाचा आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न सतत करत राहीन.

हीच गुरूंना खरी श्रद्धांजली होईल!

 • विद्यानंद विनायक परब
  (शैक्षणिक, सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत)
  पत्ता : मु. पो. आचरा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग
  मोबाइल : ९४२११ ४४३७६
  ई-मेल : vidyanandparab1902@gmail.com
  …..
  (पुढचा लेख शीतल पोकळे यांचा)
  (या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply