सिंधुदुर्गात करोनाबाधितांसाठी दोन खासगी रुग्णालयांतही सेवा सुरू

सिंधुदुर्गनगरी : करोना विषाणूचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेला वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन अतिरिक्त उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील दोन खासगी रुग्णालयांतही कोविड-१९ रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ही माहिती दिली.

कणकवली येथील डॉ. विद्याधर तायशेटे यांचे संजीवनी सर्जिकल अँड ॲक्सिडेंटल हॉस्पिटल, तसेच मालवण येथील डॉ. विवेक रेडकर यांचे रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (नीलक्रांती संस्था) या दोन खासगी रुग्णालयांत कोविड-१९ रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

संजीवनी रुग्णालयामध्ये १२ खाटा, तर रेडकर रुग्णालयामध्ये १८ खाटा कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शासनाने मंजूर केलेले दर या रुग्णालयांमार्फत आकारण्यात येणार आहेत, असेही जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज (१६ सप्टेंबर २०२०) सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. ‘जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरवाव्यात,’ अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या वेळी आमदार वैभव नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. शेवाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर आदी उपस्थित होते. (वरील फोटो)

‘जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहांची दारे व खिडक्या तातडीने दुरुस्त कराव्यात, विशेषतः महिला वॉर्डमधील दुरुस्ती तातडीने करून घ्यावी. सर्व रुग्णांना आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध होण्याकरिता गीझर बसविण्यात यावेत, पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी थंड व गरम असे दोन्ही प्रकारचे पाण्याचे फिल्टर बसवावेत,’ अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोविड तक्रार नियंत्रण कक्ष
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोविड तक्रार नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. कोविडसंदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास किंवा आपल्याला काही माहिती द्यावयाची असल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply