आंबडवे गावाचे आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल; ‘डिक्की’चा पुढाकार

आंबडवे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) या गावाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून, येत्या तीन महिन्यांत ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि उद्योग-व्यवसायांतून हे गाव स्वतःचा आदर्श उभा करील, असा विश्वास ‘डिक्की’चे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी आज (१८ सप्टेंबर २०२०) आंबडवे येथे व्यक्त केला. (व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसल्यानंतर या गावाला पुन्हा नव्याने स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ (डिक्की), खादी ग्रामोद्योग मंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटू) या संस्था एकत्र आल्या. हे गाव दत्तक घेत असल्याची घोषणा ‘डिक्की’चे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी १८ जून २०२० रोजी आंबडवे येथे केली होती. प्रत्येक घराला उद्योग, त्यासाठीचा कच्चा माल, निर्मितीचे प्रशिक्षण आणि पक्का माल खरेदीची हमी अशी सर्वांगीण योजना त्यासाठी तयार करण्यात आली आहे.

त्यानंतर बरोबर तीन महिन्यांनी आज, १८ सप्टेंबर रोजी डॉ. कांबळे आणि अन्य सहयोगी संस्थांचे अधिकारी यांची टीम पुढील कार्यवाही करण्यासाठी आंबडवे गावात आली होती. व्यवसाय उभे करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रात्यक्षिके खादी ग्रामोद्योगच्या वतीने या वेळी दाखविण्यात आली.

केंद्रीय खादी ग्रामोद्योग आयोगाचे उप कार्यकारी अधिकारी संजय हेवाड, राज्य खादी विभागाचे अधिकारी ए. एल. मीना., डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाचे समन्वयक प्रा. संजय खोब्रागडे, बँक ऑफ बडोदाच्या मंडणगड शाखेचे व्यवस्थापक अझरुद्दीन संदे, पंचायत समिती विस्तार अधिकारी राजेंद्र मोहिते, माजी सरपंच अल्पेश सपकाळ, आंबडवे प्रकल्प समन्वयक नितीन सपकाळ, तसेच अधिकारी व गावकरी महिला, युवक या वेळी उपस्थित होते. बँक ऑफ बडोदाचेही सहकार्य या प्रकल्पाला लाभणार आहे.

या वेळी डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले, की लवकरच आंबडवे गाव देशात एक आदर्श रोल मॉडेल ठरेल असा संकल्प आपण केला आहे. या गावात उदबत्ती निर्मिती, सोलर चरखा, रुमाल उद्योग यांसारखे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय सुरू केले जाणार असून, प्रत्येक घरी एक व्यवसाय सुरू केला जाणार आहे. या गावात उत्पादित झालेला माल अतिशय उच्च दर्जाचा असणार आहे. शिवाय भविष्यात या वस्तू निर्यात करण्याचाही संकल्प असल्याचे त्यांनी जाहीर केले.

असा असेल प्रकल्प
या उपक्रमात संपूर्ण गाव आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने नियोजन केले असून, गावातील प्रत्येक घरात लघुउद्योग राबवून स्वयंरोजगाराची संधी निर्माण केली जाणार आहे. अगरबत्ती तयार करणे, सौर हातमाग, रुमाल तयार करणे आदींपैकी एक प्रकल्प व यंत्र प्रत्येक घराला देण्यात येणार आहे. यासाठीचा कच्चा माल खादी ग्रामोद्योग मंडळ पुरवणार आहे. तसेच यासाठीचे तंत्रप्रशिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटू) देणार आहे. उत्पादित झालेल्या पक्क्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याची जबाबदारी या संस्थांनी घेतली आहे.

‘अशा पद्धतीने एखादे गाव दत्तक घेण्याचा महाराष्ट्रातील हा कदाचित पहिलाच प्रयोग असावा. यामधून गाव आत्मनिर्भर होणार असून, या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि देशात एक नवा आदर्श निर्माण होणार आहे,’ असे डॉ. कांबळे यांनी सांगितले. या गावामध्ये ३१ मागासवर्गीय कुटुंबे आणि ४९ सर्वसाधारण वर्गातील कुटुंबे अशी एकूण ८० कुटुंबे आहेत. या सर्वांना या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे.

माध्यमविषयक सेवांसह पुस्तके, इनहाउस जर्नल्स आदींसाठी संकलन, संपादन, प्रकाशन , ई-बुक निर्मिती आदी सेवा कोकण मीडियातर्फे पुरविल्या जातात. कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिकही चालवले जाते. पालघर ते सिंधुदुर्ग अशा संपूर्ण कोकणातील विषयांना साप्ताहिकात प्रसिद्धी दिली जाते.
साप्ताहिक कोकण मीडियाकरिता लेखन पाठवण्यासाठी,

तसेच जाहिरातींसाठी संपर्क : 9422382621
ई-मेल : kokanmedia@kokanmedia.in

…………….

स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे उल्हास परांजपे यांचे तंत्र. त्यांची पुस्तके ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी लिंक्स
‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ : shorturl.at/mrsM2
नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ : shorturl.at/dFR37

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply