रत्नागिरीत एसटीची शहरी वाहतूक सेवा सहा महिन्यांनी सुरू

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक लॉकडाउनमुळे सहा महिने बंद असलेली एसटीची रत्नागिरीतील शहर वाहतूक सेवा (सिटी बस) आज (२१ सप्टेंबर) सुरू झाली. आज पहिल्या दिवशी ६५ फेऱ्या सोडण्यात आल्या. परतीच्या प्रवासासह एकूण दीड हजार किलोमीटरचा प्रवास शहरी वाहतुकीच्या गाड्यांनी केल्याची माहिती आगारातून देण्यात आली.

शहरी बससेवा सुरू करण्याचे आदेश गेल्या १९ सप्टेंबरला मिळाले. त्यानुसार आजपासून सेवा सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी २६ चालक, वाहक व वाहतूक नियंत्रक, पर्यवेक्षक आदी कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली. शहरी वाहतुकीच्या एसटी बसस्थानकात सकाळपासून फेऱ्या सोडण्यास सुरवात झाली. स्थानकाची स्वच्छताही करण्यात येत होती. प्रवाशांना सॅनिटायझर, मास्कचा वापर करणे अत्यावश्यक आहे. यामुळे प्रवासी काळजी घेत आहेत की नाही, हे वाहक पाहत होते.

शहर परिसरात सुमारे १५ किलोमीटरच्या परिघातील गावांमध्ये शहरी एसटी सेवा चालू आहे. शहरात नोकरी, व्यवसायानिमित्त येणाऱ्यांना या शहरी बससेवेचा खूपच उपयोग होतो. सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेले व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला. मात्र प्रवाशांना चांगला फायदा झाला आहे. शहरी वाहतुकीअभावी आसपासच्या गावांतून अनेक जण खासगी वाहन, रिक्षाने प्रवास करत होते. बसचे १० रुपये तिकीट असलेल्या मार्गावर खासगी वाहतूकदार ३० रुपये आकारत होते. आता शहरी एसटी सुरू झाल्याने या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आजच्या फेऱ्यांना प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. उद्यापासून आणखी फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.
(वेळापत्रक खाली दिले आहे.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply