रत्नागिरीची आकांक्षा साळवी नृत्यस्पर्धेत देशात प्रथम

रत्नागिरी : रोटरी क्लब चाणक्य, रोटरी डिस्ट्रिक्ट ३२५० आयोजित रोटरी मल्टी डिस्ट्रिक्ट सोलो डान्स कॉम्पिटिशन या देशपातळीवरील स्पर्धेत रत्नागिरीच्या आकांक्षा हिराकांत साळवी हिने देशात प्रथम येण्याचा मान पटकावला. ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमामालिनी, तसेच बिहार येथील प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना सुदीपा घोष यांच्या उपस्थितीत अंतिम स्पर्धा पार पडली. आकांक्षा ही कथ्थक नृत्यगुरू सोनम जाधव यांची शिष्या आहे.

देशातील १६ रोटरी डिस्ट्रिक्टकरिता रोटरी कुटुंबीय व विशेष वर्गवारीतील मुलांची रोटरी मल्टी डिस्ट्रिक्ट सोलो डान्स कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये देशभरातून ५६० स्पर्धक सहभागी झाले होते. आकांक्षाने स्पर्धेकरिता शिवपंचाक्षरीचा व्हिडिओ पाठवला होता. त्यातून तिची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरीसाठी तिने देवी स्तुती सादर केली होती. या नृत्याचे हेमामालिनी व सुदीपा घोष यांनी कौतुक केले. या वेळी रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट शेखर मेहता उपस्थित होते.

रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाउनचे खजिनदार हिराकांत गोपीचंद साळवी व सौ. सायली हिराकांत साळवी यांची आकांक्षा ही कन्या. गेली आठ वर्षे ती नटराज नृत्यवर्गात सौ. सोनम जाधव यांच्याकडे कथ्थक नृत्याचे धडे घेत असून आता विशारदच्या अंतिम वर्षाला आहे. तिच्या यशामुळे रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना तिच्या वडिलांनी व्यक्त केली.

स्पर्धेकरिता गौरी साबळे, ईशा साळवी, व्हिडिओग्राफर नीलेश कोळंबेकर, हृषीकेश लांजेकर, श्री मिनी हॉलचे संचालक सुदेश शेट्ये, रत्नागिरी मिडटाउनचे प्रेसिडेंट प्रसाद खेडेकर यांचे सहकार्य लाभले. प्रचंड मेहनत, सातत्य आणि नृत्यातील एकाग्रता हे आकांक्षाच्या यशाचे गमक आहे. नटराज कथ्थकनृत्य वर्गाबरोबरच आपल्या रत्नागिरीचे नाव उज्ज्वल केले आहे, मला तिचा अभिमान वाटतो, असे कौतुकोद्गार तिच्या नृत्य गुरू सोनम जाधव यांनी काढले.

लहानपणापासून मी नृत्य शिकत आहे. त्याकरिता आईवडिलांसह सोनमताईंचे कष्ट आहेत. या स्पर्धेमुळे सुदीपा घोष आणि हेमामालिनी यांच्यासारख्या ज्येष्ठ नृत्यगुरूंसोबत थेट बोलता आले. त्यांच्यासमोर कला सादर करता आली, याचे खूप समाधान आहे. या यशामुळे शास्त्रीय नृत्याचे महत्त्व अधोरेखित होण्यास मदत होईल, असे मत आकांक्षाने व्यक्त केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply