करोनाच्या पार्श्वभूमीवर निवृत्त शिक्षिकेने रत्नागिरीत सुरू केले समुपदेशन केंद्र

रत्नागिरी : सध्याचा करोना काळ, वाढती महागाई, विभक्त कुटुंब, विसरभोळेपणाचा ज्येष्ठांना होणारा त्रास आणि मानसिकता सुधारण्यासाठी निवृत्त शिक्षिका सौ. तेजा मुळ्ये यांनी गरजूंचे समुपदेशन करण्यासाठी ‘सोबत’ या नावाने समुपदेशन केंद्र सुरू केले आहे.

आविष्कार या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतून निवृत्त झालेल्या शिक्षिका सौ. मुळ्ये सध्या दररोज रत्नागिरीतील अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये तीन तास कोविड रुग्णांशी संवाद साधतात. त्यांचे मनोबल, आत्मविश्वास वाढवतात. आता सायंकाळच्या वेळी गरजूंचे समुपदेशन करण्याचे काम त्या करू लागल्या आहेत. शाळेतील अनुभवामुळे दिव्यांग व्यक्तीला घरात कसे सांभाळावे, तसेच विस्मृती होणाऱ्या व्यक्तीला समजून घेऊन कुटुंबात सांभाळण्यासाठी काय करावे, याबाबत त्या समुपदेशन करणार आहेत.

करोनाप्रतिबंधक लॉकडाउनमुळे सात महिन्यांत अनेक जण तणावाखाली वावरत आहेत. शाळा बंद असल्याने मुलांच्या वर्तनाच्या समस्या, शैक्षणिक समस्या, अस्थिर वातावरणाने माणसांचा उडालेला गोंधळ, बंद पडलेले छोटेमोठे व्यवसाय, मनःशांतीसाठी जाण्याचे ठिकाण असलेली मंदिरेही बंद असल्याने गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा स्थितीत माझे आर्थिक नियोजन करताना घोळ होतो, पैसे कमावत असून त्याचे सुख अनुभवता येत नाही, माझा मुलगा हुशार आहे, पण अभ्यासापलीकडे फावला वेळ त्याने कसा काढावा, त्याच्याकडून काय करून घ्यावे, मला मित्र-मैत्रिणी नाहीत, मला माझ्या मनातील सांगावे, असे कोणी नाही, असे अनेक प्रश्न समाजाला पडत आहेत. करोनामुळे मानसिक स्थिती ढासळते. कुटुंबातील समस्या समोर येत आहेत. मनाप्रमाणे नोकरी मिळाली, पण अलीकडे कामात मन रमत नाही, नक्की काय चुकत कळत नाही, अशीही अवस्था होते. अशा वेळी या समस्येवर मात करण्यासाठी विचारांचे विविध पैलू लक्षात आणून देऊन, चर्चा करून ही समस्या सोडविण्यासाठी सौ. मुळ्ये काम करणार आहेत. असलेले विविध पर्याय लक्षात आणून देऊन संबंधित व्यक्तीची समस्या सोडवून तिला मार्ग दाखवावा, असे आपल्याला सुचल्याचे सौ. मुळ्ये यांनी सांगितले.

त्यांनी त्यासाठी त्यांच्या राहत्या घरात एक स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. समस्या असलेली व्यक्ती तेथे मोकळेपणे बोलू शकेल आणि समस्या निराकरण होईल. दररोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत ओम सदन, १/२८, समता हॉटेलजवळ, कुवारबाव, रत्नागिरी येथे समुपदेशन केले जाईल. त्यासाठी ८६६८७४१०८२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply