
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा दुसरा लेख… कवी, लेखक वसंत आपटे यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे उज्ज्वला धानजी यांनी…
………
कोल्हापुरातून येताना फोंडाघाटाच्या खिंडीतून अतिभव्य चित्रपट उलगडावा तशा दिसत असलेल्या तळकोकणातील फोंडा घाटातील वेडीवाकडी वळणे पार करताना लागणाऱ्या कारवीच्या जंगलात मिळणारा विलक्षण स्वादिष्ट मध! असा निसर्गाचा हा गोडवा जपणाऱ्या फोंडाघाट (ता. कणकवली) या छोट्याशा गावात १८ जून १९२६ रोजी कोकणच्या साहित्यविश्वात वसंत फुलवण्यासाठीच वसंत आत्माराम आपटे यांचा जन्म झाला असावा.
ज्ञानेश्वरी वाचनाची रोजची सवय. निदान एक अध्याय वाचल्याशिवाय कधीही बाहेर न पडण्याचा नेम. अशा सात्त्विक विचारांच्या परिपाकातूनच त्यांच्यात साहित्याची बीजे रोवली गेली. त्यातूनच त्यांनी साहित्याच्या उपासनेसाठी आपणही काही तरी करावे या उद्देशाने १९८० साली ‘साहित्य संस्कृती मंडळ, फोंडाघाट’ या संस्थेची स्थापना केली. स्थापना झाल्यानंतर दर वर्षी या मंडळातर्फे ते साहित्य मेळावे भरवत. खरे तर ही कोकण मराठी साहित्य परिषदेच्या जन्मापूर्वीची संस्था आहे.
मधासारखा गोडवा असलेल्या या साहित्यिकाने ‘गुण गुण गाणी’ हा बालगीत संग्रह लिहिला. कदाचित मधमाशांच्या गुणगुण करीत मध गोळा करण्याच्या आनंदलहरींतून प्रेरित होऊन आपल्या काव्यसंग्रहाला त्यांनी असे नाव दिले असावे की काय, असे वाटते.
हा संग्रह खूपच गाजला. नंतर या बालगीत संग्रहाला १९८०-८१चा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराने फोंडाघाटचे वातावरण चैतन्यदायी झाले. उगवाई नदीपासूनचा सारा फोंडा परिसर या सन्मानाने सुखावला.
‘उगवाई’ हेच आपल्या कवितासंग्रहाचे नाव ठेवणारे कवी डॉ. वसंत सावंत हेही फोंड्याचेच. ‘साहित्य संस्कृती मंडळ, फोंडाघाट’च्या या साहित्य मेळाव्याला कविवर्य डॉ. वसंत सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

समृद्ध साहित्याचा वारसा जपत असताना आपटे सरांकडून एकांकिकांचेही लेखन झाले. त्यांच्या ‘ऋतुचक्र’ आणि ‘रोहिडेश्वर शपथ’ या दोन्ही एकांकिका आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रक्षेपित झाल्या होत्या. आकाशवाणीवर एकांकिका प्रक्षेपित होणे हे फारच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद!
ऋतुचक्र तर अप्रतिम एकांकिका! ऑल इंडिया रेडिओने प्रसारित केलेली! केवढा मोठा हा मानसन्मान!
त्यानंतर त्यांनी लिहिलेली एकांकिका ‘मांत्रिक!’ या एकांकिकेच्या कणकवली येथील सुंदर सादरीकरणात अनेक बक्षिसांचा बहुमान!
१९८८ साली प्रकाशित झालेला ‘चांदणं’ हा काव्यसंग्रह. ह्या काव्यसंग्रहात प्रेमकविता, सामाजिक जाणिवेच्या कविता, गूढ, रम्य, भावगर्भ कवितांबरोबर निसर्गकविताही आहेत. वेगवेगळ्या अनुभूतींतून ज्या कल्पना कविमनाला जाणवल्या, तशाच त्या लेखणीतून उतरल्या. ही सारी प्रतिभेची किमया. आणि प्रतिभा म्हणजे तरी काय? परमेश्वरी प्रसादच! मग ‘परमेश्वर’ या विषयावरील कविता यात नसून कसे चालेल? त्याही हव्यातच! अशीच मला आवडलेली त्यांची एक कविता…
‘परीक्षानळीत परमेश्वर’
एक दिवस मी साहस केले
आणि
परमेश्वराला खडसावून विचारले,
‘तू जर मानवाला भीत नाहीस, तर
परीक्षानळीत का उतरत नाहीस?’
आणि शेवटी परमेश्वर उत्तरतो
‘मी केव्हाही
परीक्षानळीमध्ये हजर होईन
आणि माझं अस्तित्व सिद्ध करीन
मात्र…
शुद्ध निर्गुण आणि…
निराकार स्वरूपात.’
शास्त्रज्ञांच्या नजरेला एक वेगळे आव्हान देणारी ही कविता.
या काव्यसंग्रहाचे पुस्तक प्रकाशन कविवर्य कृ. ब. निकुंब यांच्या हस्ते झाले होते. त्यांनी आपल्या भाषणात ‘गौळण’ कवितेचे फार सुंदर रसग्रहण केले होते. कवी निकुंबांच्या भाषणाने जणू सुगंधाची बरसात झाली होती. आपटे सर म्हणतात, ‘या साऱ्या कवितांचा आस्वाद घेताना रसिक मनाला तो आपलाच अनुभव वाटून क्षणभर जरी या कवितेने त्याला गुंतवून ठेवले, तरी हे चांदणे त्याच्या मनाला प्रसन्नता देत असल्याचे समाधान मला मिळेल.’ केवढी ही आत्मीयता!
‘साहित्य संस्कृती मंडळ, फोंडाघाट’तर्फे अनेक वर्षे साहित्यावर मेळावे भरविले जात. त्यात प्रामुख्याने ह. मो. मराठे, डॉक्टर भा. वा. आठवले, ज्ञानेश्वर नाडकर्णी, डॉ. बाळ फोंडके, कमलाकर नाडकर्णी, रवींद्र पिंगे, मृणालिनी जोगळेकर, मधू मंगेश कर्णिक अशा अनेक मान्यवर साहित्यिकांनी हजेरी लावली होती.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेनंतर या साहित्य संस्कृती मंडळाचे त्यात विलीनीकरण करण्यात आले. आपल्या वयाच्या ७१व्या वर्षी त्यांनी स्वतःच्या घरगुती वाचनालयातील पुस्तके मालगुंडच्या केशवसुत स्मारकाला देऊन साहित्याचाही सन्मान केला.
आध्यात्मिकतेचा वारसा जपणाऱ्या आपटे सरांनी सुरू केलेला श्री राधाकृष्ण मंदिरातील हरिपाठ अजूनही चालू आहे, ही फार मोठी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे.

त्यांच्या लेखनाचे अनुभव घेताना मन भारावून जाते. आपटे सरांच्या कवितेचे स्वरूप सुगम व प्रासादिक असून, त्यांच्या कवितेत विषयांची विविधता आहे. भावनेचा परिपोष आहे. प्रसाद आणि माधुर्यच नव्हे, तर गेयता हीदेखील त्यांच्या काव्याचा गुणविशेष ठरणारी आहे. साध्या विषयांतूनदेखील मोठा आशय ते व्यक्त करतात. चैतन्य, सौंदर्य, मांगल्य, अध्यात्माचा स्पर्श या गुणांनीही त्यांची कविता अलंकृत झाली आहे.
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेवर सलग तीस वर्षे सेक्रेटरी म्हणून काम करत असताना त्यांची साहित्याशी जवळीक निर्माण झाली. त्याचप्रमाणे फोंडाघाट व्यापारी संघाचे अध्यक्ष म्हणून जवळजवळ वीस वर्षे त्यांनी जबाबदारी निभावली. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व २४ मे १९९७ रोजी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचे आचार-विचार आणि साहित्यसंपदा आजही कोकणच्या साहित्यविश्वात वसंतोत्सव साजरा करीत आहे.
- उज्ज्वला चंद्रशेखर धानजी
(बँक ऑफ महाराष्ट्र, तळेरे शाखा येथे कार्यरत; लेखिका, कवयित्री)
पत्ता : मु. पो. कलमठ, नाडकर्णीनगर, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग
मोबाइल : ८३८०९ ३७६८१
…..
सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांची आहे. अधिक माहितीसाठी, सूचनांसाठी, तसेच अभिप्रायासाठी त्यांच्याशी ९४२१२६३६६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
……
(‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
कोमसापच्या ‘सिंधुसाहित्यसरितेत’ कवी/लेखक वसंतराव आपटे-फोंडाघाट यांची साहित्यिक वाटचाल, लेखनसंपदा, व त्यांच्या अन्य उपक्रमांसह साहित्यसेवेवर प्रकाश टाकणारा ‘उज्ज्वला धानजी’ यांचा उत्तम लेख वाचला.
वसंतराव आपटे यांच्या दुकानदारी,प्रवचन, कवी/लेखक, साहित्यसांस्कृतिक उपक्रम इ. बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंची ओळख व त्यांच्या एकंदर सामाजिक कार्यासह तत्कालीन साहित्यिकांचा परिचयही लेखिकेने घडवला आहे.
वसंतराव आपटे यांच्या काव्यातली गूढभावगर्भता,सहजता,प्रासादिकता व सर्वसामान्यांच्या जीवनातल्या सामाजिक जाणिवा इ.त्यांच्या आध्यात्मिक संस्कारमूल्यांच्या जपणुकीतून उतरल्याचं लेखिकेने आवर्जून उल्लेखिलं आहे!धन्यवाद!👏👏
वसंतराव आपटे हे ‘अप्पा’ ह्या नावाने त्यांच्या वर्तुळात प्रसिद्ध होते. जनसंपर्क साधनं कमी असलेल्या काळात त्यानी केलेल्या साहित्यसेवेचा व त्यांच्या प्रतिभेचा उचित गौरव म्हणजेच त्यांच्या ‘गुणगण गाणी’ बालगीत संग्रहाला मिळालेला महाराष्ट्र शासन पुरस्कार होय.
‘सहजपणे गुणगुणावीत’ असं वाटणारी बालगीतं ती ‘गुणगुण गाणी’असं शीर्षकाबद्दल ते बोलत. त्यांचं वाचन बहुस्पर्शी होतं.त्या काळात शालेय अभ्यासक्रमात ‘पक्षांचा राजा मोर’ अशा शीर्षकाच्या लेखात मोराचं वर्णन ‘पक्षिराज’ म्हणून केलं होतं. अप्पानी त्यावर आक्षेप घेणा-या लेखनात ‘मृगाणांच मृगेंद्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्’..(गीता१०/३०) असे संदर्भ देऊन मोर हा पक्षिराज नसल्याचं स्पष्ट केलं. पुढे त्यावर चर्चा होऊन मंडळाने तो लेख अभ्यासक्रातून वगळला! अप्पानी आयुष्यात दुकानदारीसह शिंपीकाम,मूर्तिकाम,लेखन,प्रवचन इ.अनेक कला जोपासल्या; ‘ते ख-या अर्थानं ज्ञानेश्वरी जगले.’ स्पष्टवक्तेपणा, सत्यप्रियता ह्या मूल्यनिष्ठा असलेले अप्पा एक मृदूविनोदी व ‘मऊ मेणाहून विष्णुदास’ होते.👏
नमस्कार,
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत ह्या सदरातील उज्वला धानजी यांनी लिहिलेला दुसरा लेख कविवर्य वसंत आपटे प्रसिद्ध झाला.
अतिशय आनंद झाला. वसंत आपटे हे माझे वडील त्यांना आम्ही आप्पा म्हणयचो. लेख वाचल्या नंतर आप्पांचा साहित्य प्रवास नजरे समोर आला. फोंडाघाट सारख्या एका छोट्याशा गावात त्यांनी उभी केलेली साहित्य चळवळ आम्ही लहानपणी खुप जवळून पाहिली. पण तीचं मोठे पण त्या वयात आम्हाला कळत नव्हते. आज भूतकाळात डोकावून पहाताना आजच्या सारखे तंत्रज्ञान उपलब्ध नसतानांही त्यांनी फार मोठे काम त्या काळात केल्याचे प्रकर्षांने जाणवते.
उज्वला धानजी यांनी लेखात आप्पांचा साहित्य प्रवास अतिशय चांगल्या प्रकारे मांडला आहे. तो वाचत असतांना अनेक गत स्मृती जाग्या झाल्या. त्यावेळेचे प्रसंग नजरे समोर उभे राहिले. सोशल मीडियाच्या जमान्यात जून्या प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या साहित्यिकांच्या साहित्य रचनेचा आढावा पुढील पिढीसमोर उलगडण्याचा कोमसाप चा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.
कोमसाप मालवण शाखा श्री सुरेशजी ठाकूर, श्री मधुसूदन नानिवडेकर व उज्वला धानजी यांना आपटे कुटूंबियांन कडून धन्यवाद 🙏🙏
आपला – श्रीकांत आपटे फोंडाघाट