रत्नागिरीतील फाटक प्रशालेचे निवृत्त उपमुख्याध्यापक श्रीराम रायकर यांचे निधन

रत्नागिरी : येथील फाटक प्रशालेचे निवृत्त उपमुख्याध्यापक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, राष्ट्रीय सेवा समितीचे माजी अध्यक्ष श्रीराम पांडुरंग तथा शामराव रायकर (वय ७४) यांचे २९ सप्टेंबर २०२० रोजी पहाटे कोल्हापूर येथे निधन झाले.

रायकर यांनी राष्ट्रीय सेवा समितीचे अध्यक्षपद दहा वर्षे भूषवले. या काळात नवनवीन कामे केली. समितीतर्फे मुलींचे वसतिगृह चालवण्यात येत होते. गोळवली (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील प. पू. गोळवलकर गुरुजी स्मारकामध्ये नवनवीन उपक्रम, कार्यक्रम रायकर यांनी सुरू केले. कोणत्याही उपक्रमासाठी रायकर सर निधी संकलनाची जबाबदारी घेत आणि ती पूर्ण करत.

रत्नागिरीतील वैद्य रघुवीर भिडे यांच्या निधनानंतर थोड्याच दिवसांत त्यांनी रत्नागिरीतून कोल्हापूरला मुलीकडे जाण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरमध्ये राहायला गेल्यानंतरही रायकर सरांचा रत्नागिरीशी सतत संपर्क सुरू असायचा. पंधरा दिवसांपूर्वी करोनाची लागण झाल्यामुळे रायकर सरांना कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत होती. ऑक्सिजनची पातळीही ९५पर्यंत वाढली होती. परंतु आज (२९ सप्टेंबर) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

कोदवली (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हे (कै.) रायकर यांचे मूळ गाव; मात्र त्यांचा जन्म रत्नागिरीत झाला. फाटक प्रशालेतून ते उपमुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. शाळेच्या व्यवस्थापनात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी निभावली. शाळेच्या सर्वांगीण उन्नतीकरिता त्यांचे मोठे योगदान होते. लहानपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये स्वयंसेवक व कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. संघाचे रत्नागिरी विभाग कार्यवाह, राष्ट्रीय सेवा समितीचे अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषवली. सध्या ते कार्यकारी मंडळाचे सदस्य होते. त्यांच्या निधनाने हायस्कूल आणि संघ परिवारातील सदस्यांनी दुःख व्यक्त केले.

रायकर यांच्या पश्चात पत्नी, तीन कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

निस्सीम मैत्री, दुर्दैवी योगायोग!
रायकर सर जेव्हा राष्ट्रीय सेवा समितीचे अध्यक्षपद भूषवत होते, तेव्हा त्यांच्या सोबत उपाध्यक्ष म्हणून रत्नागिरीतील प्रख्यात वैद्य रघुवीर भिडे काम करत होते. त्यानंतर त्या दोघांचे चांगलेच सख्य निर्माण झाले. ते अखेरपर्यंत टिकलेच; पण मरणोत्तरही रायकर सरांना वैद्य भिडे यांचा विरह सहन झाला नसावा, असा दुर्दैवी योग जुळून आला. दोन महिन्यांपूर्वी वैद्य भिडे यांचे करोनामुळे निधन झाले. त्यानंतर रायकर सरांनी ‘आमची कवचकुंडले गळून पडली’ अशा शब्दांत वैद्य भिडे यांच्याविषयीच्या आपल्या भावना साप्ताहिक कोकण मीडियाच्या वैद्य भिडे यांच्याविषयीच्या विशेषांकात लेखाद्वारे व्यक्त केल्या होत्या. वैद्य भिडे यांच्या विरहामुळेच जणू त्यांनी रत्नागिरीतून कोल्हापूरला जाणे पसंत केले. तेथेच त्यांचे निधन झाले. वैद्य भिडे यांच्याप्रमाणेच रायकर सर यांचेही करोनामुळेच निधन झाले, हा आणखी एक दुर्दैवी योग!

(वैद्य रघुवीर भिडे यांच्या निधनानंतर साप्ताहिक कोकण मीडियाने प्रसिद्ध केलेल्या विशेषांकात रायकर सरांनी वैद्य भिडे यांच्याबद्दल लिहिलेला लेख सोबत देत आहोत. तो संपूर्ण विशेषांक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply