१५ ऑक्टोबरपासून देशातील चित्रपटगृहे सुरू होणार; केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

नवी दिल्ली : करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यातील पुढचे पाऊल आज उचलले गेले आहे. १५ ऑक्टोबरपासून देशातील चित्रपटगृहे सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. त्यासाठीची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) त्यांनी जाहीर केली.

आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाशी चर्चेनंतर एसओपी निश्चित करण्यात आली असून, गृहमंत्रालयाच्या निर्णयानुसार कन्टेन्मेंट झोनबाहेरील चित्रपटगृहे १५ ऑक्टोबर २०२०पासून खुली होणार आहेत.

यातील प्रमुख मार्गदर्शक तत्त्वे ही आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने दिलेल्या नियमानुसार आहेत. प्रवेश करणाऱ्या सर्वांची आणि कर्मचाऱ्यांचीही तापमान तपासणी, पुरेसे शारीरिक अंतर राखणे, मुखपट्टीने चेहरा झाकणे, सातत्याने हात धुणे, हँड सॅनिटायझरचा वापर, कर्मचाऱ्यांची सुरक्षा, बाहेर पडण्यासाठी ठराविक मार्ग इत्यादी गोष्टींचा त्यात समावेश आहे. एकूण क्षमतेच्या पन्नास टक्केच आसनक्षमता वापरली जाईल, याची व्यवस्था करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
‘मल्टिप्लेक्स’मध्ये चित्रपटाच्या खेळांच्या वेळा एकापाठी एक न ठेवता अंतर ठेवून असाव्यात. चित्रपटगृहातील तापमान २४ अंश सेल्सिअस ते ३० अंश सेल्सिअसदरम्यान असणे आवश्यक आहे.

चित्रपटगृहे सुरू करतानाच सर्व राज्ये व संबंधितांनी ह्या मार्गदर्शक सूचनांचा आणि ‘एसओपी’चा वापर करावा. चित्रपटगृहे सुरू करणे ही मोठी आर्थिक घटना असून आपल्या देशाच्या जीडीपीवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांनी त्याचा प्रसार होऊ नये म्हणून काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे प्रकाश जावडेकर म्हणाले.

१५ ऑक्टोबरपासून उघडली जाणार आहेत.
(सर्व मार्गदर्शक तत्त्वे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply