राशीभविष्याचा व्यासमहर्षी… वसंत लाडोबा म्हापणकर (सिंधुसाहित्यसरिता – १९)

वसंत लाडोबा म्हापणकर (१३ ऑगस्ट १९०७ – १८ मार्च १९६९)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा १९वा लेख… होराभूषण वसंतराव म्हापणकर यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे उमेश कोदे यांनी…
………
ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वराचे कृपाछत्र लाभलेले व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महराजांच्या वास्तव्याने पुनित झालेले शहर म्हणजे मालवण. मालवण हे पूर्वी शिवकालात साळशी महाल या नावाने संबोधले जायचे. कालांतराने या भागात मिठागरे बनविण्यात आली. मीठाचा मोठा व्यवसाय या भागात चालू होता. म्हणून या भागाला मालवण असे नाव पडले असावे. लवण म्हणजे मीठ. मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही. तसेच मालवणी माणसाशिवाय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाला शोभा येत नाही. अनेक नामवंतांनी विविध क्षेत्रांत मालवणचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्याच पंगतीत आदराचे स्थान मिळविणारे मालवणचे प्रसिद्ध होराभूषण कै. वसंत लाडोबा म्हापणकर.

मालवण देऊळवाडा या अनेक देवदेवतांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या पुण्यभूमीत १३ ऑगस्ट १९०७ या दिनी लाडोबा म्हापणकर यांच्या पोटी पवित्र श्रावण महिन्यात एक वसंत फुलला, ज्याने आपली अलौकिक बुद्धिमत्ता व लेखनाच्या जोरावर आपले नाव संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यांतही सर्वदूर पसरविले. ते नाव होते होराभूषण ज्योतिषी वसंतराव लाडोबा म्हापणकर.

अवघा भारत देश इंग्रजांच्या अमलाखाली होता. गरिबी ही प्रत्येकाच्या पाचवीला पुजलेली होती. अशा वेळी गरीब लोकांना त्यांच्या जीवनात आशेचा मार्ग दाखविणारा एकमेव म्हणजे ज्योतिषी असायचा. मालवण देऊळवाडा येथे रामेश्वर मंदिरानजीक असलेले पुरोहित बाबा पुराणिक हे विद्वान व वेदसंपन्न होते. ते ज्योतिषीही होते. त्यांच्या घरी ज्योतिषशास्त्राची अनेक पुस्तके होती. त्याच्या आधारावर ते ज्योतिष सांगायचे. बालपणापासून बाबा पुराणिक यांच्या सान्निध्यात असल्यामुळे वसंतरावांना ज्योतिषाची आवड व आकर्षण निर्माण झाले. पुराणिकांकडील ज्योतिषशास्त्राचे ग्रंथ वाचून त्यांचे ते पारायण करू लागले.

एकदा पुराणिकांच्या गैरहजेरीत वसंतरावांनी एका गरीब बाईचे ज्योतिष सांगितले. त्याचा तिला प्रत्यय आला. दुसऱ्या दिवशी ती बाई पुराणिकांकडे येऊन म्हणाली, ‘बाबा, तुमचा मुलगा कोठे गेला. त्याने काल माझे सांगितलेले ज्योतिष तंतोतंत खरे ठरले.’ त्याच वेळी बाबा पुराणिकांनी मनाशी खूणगाठ बांधली, की वसंत हा भविष्यात मोठा ज्योतिषी होईल. त्यानंतर बाबांनी त्याला विश्वासात घेऊन ज्योतिषशास्त्राचे तंत्रमंत्र व बारकावे सांगितले. बाबा पुराणिक हेच वसंतरावांचे ज्योतिषशास्त्रातील पहिले गुरू होत.

वयाच्या १७व्या वर्षी वसंतरावांचे आई-वडिलांचे छत्र हरपले. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु वसंतराव अभ्यासू, जिद्दी, कष्टाळू होते. ते अजिबात डगमगले नाहीत. तीन भाऊ, एक बहीण यांच्या पालनपोषणाची जबाबदारी वसंतरावांवर पडली. त्यांनी ग्रंथाच्या आधारे ज्योतिषाचा शास्त्रोक्त व सखोल अभ्यास केला व आपण ज्योतिषी व्हायचे असा निश्चय केला. त्याच काळात त्यांनी संतवाङ्मयाचा व अध्यात्माचा अभ्यास करून, हनुमान हेच आपले शक्तिस्थान मानून त्याची उपासना चालू केली.

भविष्य हे असे शास्त्र आहे, की नवग्रह, सत्तावीस नक्षत्रे, बारा राशी, चार दिशा, वेळ व काळ यांच्या आधारे ते सांगितले जाते. या शास्त्रात सखोल अभ्यास, चिंतन, मनन करूनच परमेश्वराला साकडे घातले जाते. त्याच वेळी स्वतःचे व पूर्वजांचे पुण्याचे संचित लाभावे लागते. यातून जे तपश्चर्येचे फळ मिळते, तेच दिव्यत्व म्हणजे भविष्यवाणी होय. अशा प्रकारे वसंतरावांना भविष्यवाणी प्राप्त झाली. त्या वेळी त्यांनी हनुमंतासमोर अशी शपथ घेतली, की ‘भविष्यवाणीला जीवनात मी कधीही लोभवाणी ठरविणार नाही.’ असा निश्चय करून त्यांनी ज्योतिष सांगायला व लिहायला प्रारंभ केला.

१९३० साली वसंतरावांनी ‘मौज’ या साप्ताहिकामधून आठवड्याचे राशीभविष्य लिहिण्यास प्रारंभ केला. त्यापूर्वी त्यांनी ‘शुभसूचक’, ‘जागृती,’ ‘सिंध मराठा’ या मासिकांमधून राशीभविष्य लिहिण्याचा अनुभव घेतला होता. १९३४ साली ‘मौज’च्या संपादकांनी त्यांना दरमहा दहा रुपये मानधन देण्याचे निश्चित केले. अशा प्रकारे भविष्यलेखनामधून मिळणारी ही त्यांची पहिलीच कमाई होती. त्यानंतर मो. ग. रागंणेकर व अनंत काणेकर यांच्या ‘चित्र’ या मासिकातून त्यांनी भविष्य लिहिण्यास सुरुवात केली. राजापूर येथील रामकृष्ण प्रिंटिंग प्रेसचे मालक कृष्णाजी नारायण सापळे यांचे ‘महाराष्ट्र शारदा’ या नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे. त्यातही ते राशीभविष्य लिहायचे. २९ मार्च १९३७ रोजी सापळे यांनी वसंतरावांशी चर्चा करून ‘धनुर्धारी’ हे साप्ताहिक चालू करण्याचे ठरविले. या साप्ताहिकाचे नावही वसंतरावांनी सुचविले होते. ‘धनुर्धारी’मधून वसंतराव राशीभविष्य लिहून माणसाच्या भविष्याचा वेध घेऊ लागले. त्यांचे भविष्य हे माणसाला दैववाद शिकवणारे नसून, ध्येयवाद शिकविणारे होते. जीवनाचा मार्ग चुकलेल्या माणसाला ते राशीभविष्यातून योग्य मार्ग दाखवायचे. आपल्या राशीभविष्य लेखनात संतवचनांचा व नामवंत साहित्यिकांच्या उच्च विचारांचा दाखला ते द्यायचे. त्यामुळेच त्यांच्या राशीभविष्याला साहित्याची झालर असे. अशा लेखनामुळे ‘धनुर्धारी’च्या वाचकांचा उभ्या महाराष्ट्रात एक वेगळा वर्ग निर्माण झाला व ‘धनुर्धारी’ म्हणजेच मालवणचे वसंतराव म्हापणकर हे समीकरण तयार झाले. ‘धनुर्धारी’शी वसंतराव जीवनाच्या अंतापर्यंत निष्ठावंत राहिले.

गोरगरीब लोक वसंतरावांच्या घरी ज्योतिष पाहायला यायचे. त्यांचे ज्योतिष पाहून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, संतवाङ्मयाचे वाचन करा, त्यांची वचने पाळा, ध्येययवादी व्हा, प्रयत्नांती परमेश्वर अशी अनेक सद्बुद्धीची विचारधारा ते लोकासमोर मांडायचे. ‘धनुर्धारी’च्या दिवाळी अंकातून ते एक वर्षाचे राशीभविष्य लिहायचे, तेव्हा काही नतद्रष्ट लोक त्यांना हिणवायचे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी आपले लेखन चालू ठेवले.

पंधराव्या शतकात युरोप खंडातील फ्रान्स या देशात जन्मलेल्या नॉस्ट्रॅडॅमस या महान भविष्यकाराने पुढील पाचशे वर्षांपर्यंतची जागतिक भाकिते कविता रूपात व सांकेतिक भाषेत वर्तविली. ती भाकिते आज २१व्या शतकातही तंतोतंत खरी ठरत आहेत. पाश्चिमात्य देशांनी या महान भविष्यकाराच्या भविष्याचे महत्त्व जाणत ती इंग्रजी, जर्मन, इटॅलिक, रोमन, ग्रीक इत्यादी भाषांत नंतर प्रसिद्ध केली. ही सर्व भाकिते, ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊनच केली होती. या महान भविष्यकाराचा वारसा वसंतरावांनी काही अंशी चालविला होता. म्हणूनच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, स. का. पाटील, बॅ. रामराव आदिक, बाळासाहेब देसाई आदी महनीय नेते, पत्रकार व नाटककार प्र. के. अत्रे, अनंत काणेकर वसंतरावांचे चाहते बनले. प्र. के. अत्रे यांनी ‘लग्नाची बेडी’ या नाटकात वसंतरावांच्या भविष्यवाणीचा मुक्त कंठाने उल्लेख केला. एवढ्यावरच न थांबता अत्रे यांनी आपले नाव वसंतरावांच्या मुलाला ठेवण्याची विनंती केली. विनंतीस मान देऊन वसंतरावांनी आपल्या मुलाचे नाव ‘प्रल्हाद’ असे ठेवले. वि. स. खांडेकर, अनंत काणेकर, कवी अनिल आदी साहित्यिकाशी त्यांची मैत्री होती. स. का. पाटील यांना तर वसंतरावांनी गुरुतुल्य मानले होते.

१९५८ साली मालवण येथे भरविण्यात आलेल्या ४०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल होते. मालवणचे तत्कालीन नगराध्यक्ष गणेश उर्फ बाबी हडकर स्वागताध्यक्ष होते. त्यांनी ज्येष्ठ व श्रेष्ठ अशा वसंतरावांवर हे संमेलन यशस्वी करण्याची मोठी जबाबदारी दिली होती. ती त्यांनी सहकाऱ्यांच्या समावेत यशस्वीपणे पार पाडली. समारोपाच्या वेळी मान्यवरांच्या हस्ते वसंतरावांचा सन्मान करण्यात आला.

म्हापणकरांविषयी गौरवोद्गार काढताना अनंतराव काणेकर. त्यांच्यासोबत म्हापणकर, स. का. पाटील, रामराव आदिक आणि इतर मान्यवर

वसंतरावांच्या ६१व्या वर्षी मालवण नगरपालिकेने मालवणचे ज्येष्ठ साहित्यिक अनंत काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली खास समारंभात त्यांना सन्मानचिन्ह, मानपत्र व गौरवनिधी अर्पण केला. त्यानंतर मालवण नगरीतील वसंतरावांच्या चाहत्यांनी स. का. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खास समारंभ आखून त्यांचा गौरव केला. त्या वेळी अनंत काणेकर, स. का. पाटील, बॅ. रामराव आदिक आदी महनीय व्यक्ती आवर्जून उपस्थित होत्या.

सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती वसंतराव म्हापणकर, (डावीकडून) बसलेले स. का. पाटील, प्रा. अनंत काणेकर, सौ. सुलोचना म्हापणकर, तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई

१८ ऑगस्ट २००७ रोजी मालवणमध्ये वसंतरावांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध शालेय स्पर्धा, वसंतरावांवर आधारित परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. वसंतरावांना मालवणात आदराचे स्थान होते. एक काळ असा होता, की मालवण म्हणजेच वसंतराव म्हापणकर असे समीकरण होते. वसंतरावांनी केवळ मालवणचे नव्हे, तर अवघ्या कोकणाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात केले. केवळ भविष्यलेखनाच्या व ज्योतिषकथनाच्या आधारावरच वसंतरावांनी आपले स्थान जनसामान्यांच्या हृदयात निर्माण केले. हे भाग्य मिळविण्यासाठीसुद्धा दैवी शक्ती लाभावी लागते. विद्येची देवता सरस्वती देवीने तर वसंतरावांना विद्येचे वरदान बहाल केले. यामुळेच वसंतरावांनी सरस्वती देवीचे अधिष्ठान आपल्या देव्हाऱ्यात मांडले.

वसंतराव हे कुटुंबवत्सल होते. त्यांचे एक चिरंजीव अरविंद म्हापणकर हे उत्तम साहित्यिक असून, त्यांचे मालवणच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. इतर दोन चिरंजीवांना ज्योतिषशास्त्राचे चांगले ज्ञान आहे. त्यांच्या सधर्महचारिणी स्नेहलता यांचेही त्यांना सहकार्य असायचे.

ज्योतिर्मह आदिशंकराचार्यांनी वसंतरावांच्या भविष्यवाणीवर प्रभावित होऊन त्यांना ज्योतिषाचार्य ही पदवी बहाल केली. अनेक संस्थांनी वसंतरावाना होराभूषण, होरारत्न, अशा अनेक पदव्यांनी सन्मानित केले. अशा या थोर भविष्यवेत्त्या, साहित्य क्षेत्राशी जवळीक असलेल्या, होराभूषण वसंतरावांचे १८ मार्च १९६९ रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या शुभदिनी देहावसान झाले.

भविष्यवाणी ही केवळ मनुष्यवाणी नसून, ती ईश्वरवाणी आहे. अशी ईश्वरवाणी लाभलेल्या या आधुनिक व्यासमुनींच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना वाहिलेली ही शब्द पुष्पांजली. या पुष्पांजलीच्या अंती कवी बा. भ. बोरकर यांच्या एका काव्यपंक्तीचे स्मरण होते… दिव्यत्वाचि जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती!!

– उमेश दिनकर कोदे
(व्यापारी)
पत्ता : मु. पो. कांदळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग
मोबाइल : ९४२०८ ८१७६३
………..
सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांची आहे. अधिक माहितीसाठी, सूचनांसाठी, तसेच अभिप्रायासाठी त्यांच्याशी ९४२१२६३६६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
……
(‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply