‘‘अजेय भारत’मधून वैभवशाली इतिहासाचे साक्षेपी लेखन’

पुणे : ‘आपल्या हजारो वर्षांच्या वैभवशाली इतिहासाच्या परंपरेत अनेक विविधता निर्माण झाल्या. त्या सगळ्या विविधतांचे एकतेत केलेले समन्वित, संवादी आणि समरस असे संकलन म्हणजे हिंदू समाज म्हणजेच आजचा भारत देश आहे. हा हिंदू समाज घडण्याची प्रक्रिया ज्या काळात पूर्णत्वाला गेली हा तो (पाचवे ते १२वे शतक) काळ आहे. हा आपला उज्ज्वल इतिहास जगाला सांगणे आवश्यक आहे. आपल्या प्रगतीसाठी तो जाणून घेणेदेखील तितकाच गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

सुधा रिसबूड लिखित व कॉन्टिनेन्टल प्रकाशित ‘अजेय भारत’ (पाचवे शतक ते १२ वे शतक – भारतीय इतिहासाचा देदीप्यमान कालखंड) या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते १३ ऑक्टोबर २०२० रोजी पुण्यात झाले. त्या वेळी ते बोलत होते.

नॅशनल मेरिटाइम हेरिटेज कॉम्प्लेक्सचे महासंचालक व ज्येष्ठ पुरातत्त्व संशोधक डॉ. वसंत शिंदे हे प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर लेखिका सुधा रिसबूड व कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या देवयानी अभ्यंकर यांची उपस्थिती होती. न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. करोनासंबंधाने असलेल्या सर्व नियमांच्या आधीन राहून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास रा. स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नानासाहेब जाधव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यावाह महेश करपे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे महेश आठवले आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

‘भारतात शासननिरपेक्ष स्वतंत्र अशी व्यवस्था आहे. ती मोडून काढल्याशिवाय या देशावर राज्य करणे सोपे नाही, ही गोष्ट ज्या वेळी ब्रिटिशांच्या लक्षात आली, त्या वेळी त्यांनी आपला गौरवशाली इतिहास मोडून सांगायला व शिकवायला सुरुवात केली. आपली वैभवशाली परंपरा, वस्तुस्थिती सांगणारे पुरावे दडपले. जे पुरावे उपलब्ध होते त्यांचे विकृत विश्लेषण केले गेले. विदेशींच्या मदतीने काही विद्वानांनी जाणीवपूर्वक बिघडवलेला हा दृष्टीकोन स्वातंत्र्यानंतर सुधारण्याची संधी होती; मात्र दुर्दैवाने ही सुधारणा होता कामा नये हे नियोजनपूर्वक पाहिले गेले,’ असे डॉ. भागवत म्हणाले.

‘आमच्या इथे इतिहासाची मांडणी करताना निष्कर्ष आधी मांडला जातो. त्यानुसार सोयीचे पुरावे, संदर्भ समोर ठेवले जातात; पण जे सत्य आहे, दिसत आहे अशी कोणतीही गोष्ट मान्य केली जात नाही. राखीगढीमध्ये हडप्पा संस्कृती संबंधाने झालेले संशोधन त्याचे एक चांगले उदाहरण म्हणून पाहता येईल,’ असे डॉ. भागवत यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. वसंत शिंदे यांनी आपल्याकडे इतिहास नव्या पिढीला सांगणे किती गरजेचे आहे हे सांगताना सुधा रिसबूड यांनी उपलब्ध सर्व साधनांचा उपयोग करून चौफेर संशोधन करून ‘अजेय भारत’ पुस्तकाच्या माध्यमातून इतिहासाची सर्वांगीण मांडणी केली असल्याचे सांगितले.

‘भारतावर अनेक आक्रमणे झाली, तरीही इथली संस्कृती आजही टिकून आहे. आज आपल्या संस्कृतीत असलेल्या अनेक गोष्टी या हडप्पा संस्कृतीच्या उत्खननावेळीदेखील आढळल्या. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर अफगाणिस्तानपासून बांग्लादेशपर्यंत आपणा सर्वांचा गेल्या दहा हजार वर्षांपासूनचा वंशज एकच आहे हे सर्व पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

या वेळी लेखिका सुधा रिसबूड म्हणाल्या, ‘पाचवे शतक ते १२वे शतक या भारत देशाच्या देदीप्यमान कालखंडातील इतिहास समोर येणे आवश्यक होते; पण ते मांडण्याचे धाडस कुणी केले नाही. त्याची गरज लक्षात घेऊन मी हा इतिहास लेखानाचा प्रयत्न केला आहे.’

देवयानी अभ्यंकर यांनी प्रकाशनामागची भूमिका मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडे यांन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

‘अजेय भारत’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत. (डावीकडून) लेखिका सुधा रिसबूड, डॉ. वसंत शिंदे व देवयानी अभ्यंकर.

(कार्यक्रमाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply