देवरुखवासीयांच्या दसऱ्याच्या उत्साहावर मुसळधार पावसाचे पाणी

देवरुख : करोना, लॉकडाउन आणि अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना नियम पाळून का होईना, पण दसरा उत्साहाने साजरा करायचा होता; देवरुख (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील नागरिकांना मात्र ते शक्य झाले नाही. कारण आधीच लांबलेल्या पावसाने साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याचाही (२५ ऑक्टोबर) मुहूर्त चुकवला नाही. त्यामुळे नागरिकांच्या उत्साहावर मुसळधार पावसाचे पाणी पडले आणि सोने लुटणे सोडाच, पण पावसानेच जणू देवरुखवासीयांना लुटले, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली होती.

करोनामुळे नवरात्रौत्सव तर नेहमीप्रमाणे साजरा करता आलाच नाही. त्यात मंदिरेही बंद होती. नियम पाळून का होईना, पण दसरा तरी उत्साहाने साजरा करता येईल, अशी आशा नागरिकांनी बाळगली होती. मात्र ती फोल ठरली. करोनामुळे आर्थिक मंदी असल्याने नवीन दुकानांचा शुभारंभ झाला नाही, नवीन खरेदीही फारशी झाली नाही. दुचाकी, चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने-चांदी दागिने वा नवीन वास्तू यांची खरेदीही अत्यल्प झाली, किंबहुना झालीच नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे व्यापारी वर्ग हैराण झाला. आपट्याची पाने सोने म्हणून देण्यासाठीही कोणी कुणाच्या घरात गेले नाही. आता येणारी दिवाळी तरी सुखासमाधानाची जाईल, अशी आशा बाळगण्यापलीकडे लोकांच्या हातात काही नाही.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply