महाआवास अभियानाची उद्दिष्टपूर्ती रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आव्हानाची

रत्नागिरी : सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी महाआवास अभियान-ग्रामीण २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानात दिलेल्या मुदतीत लक्ष्य पूर्ण करावे आणि हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवावे, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी काल (२७ नोव्हेंबर) केल्या. नवी मुंबईतील कोकण भवनातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित महाआवास अभियानाच्या विभागीय कार्यशाळेत ते बोलत होते. याच वेळी सादर झालेल्या तपशिलावरून या शंभर दिवसांच्या महाआवास अभियानाची उद्दिष्टपूर्ती रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी आव्हानाची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले.

बैठकीत रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून निवासी उपजिल्हधिकारी दत्ता भडकवाड, प्रकल्प संचालक व जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, समाजकल्याण सहाय्यक संचालक श्री. चिकणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (संनियंत्रण) संतोष गमरे, माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. मिसाळ म्हणाले, उत्तम गुणवत्तेचे घरकुल उभारण्यासाठी प्रशिक्षित गवंडी आवश्यक आहेत. त्यांच्या प्रशिक्षणासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर संस्था नेमण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. डेमो हाऊस पंचायत समितीच्या आवारात अथवा रस्त्यावरील गावांच्या ठिकाणी, वर्दळ अधिक असेल अशा ठिकाणी तयार करावे. विविध योजनांमधील प्रलंबित कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घ्यावा. या योजनेत सामाजिक संस्थांचा सहभाग घ्यावा. अपूर्ण घरकुलांचा वेगळा आढावा घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी.

घरकुलांना मंजुरी, मंजूर घरांना पहिला हप्ता, घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे, प्रलंबित घरकुल पूर्ण करणे, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण, डेमो हाऊस उभारणे, आधार सीडिंग पूर्ण करणे आदी या अभियानातील कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना दिल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी यावेळी अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. महाआवास अभियानाची रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

जिल्हा प्रशासनातर्फे ग्वाही देण्यात आली असली, तरी ते मोठे आव्हानाचे आहे. कोकण विभागात गेल्या २०१६पासून ते येत्या २०२१च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत ५६ हजार ९७४ घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ४५ हजार ६४० घरांना मंजुरी मिळाली असून ११ हजार ३३४ घरांना येत्या पाच डिसेंबरपर्यंत मंजुरी द्यावयाची आहे. प्रधानमंत्री आवास योजना, राज्य पुरस्कृत आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना, आदिम आवास योजना, पारधी जमाती घरकुल योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या आठ योजनांखाली बेघरांना घरे बांधायला शासनातर्फे मदत केली जाणार आहे. येत्या २०२२पर्यंत सर्वांना घरे देण्याच्या केंद्र शासनाच्या योजनेला पूरक अशी ही योजना आहे.

गेल्या २० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ केला. येत्या २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ही घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. १५ डिसेंबर, ३१ डिसेंबर, १५ जानेवारी, ३१ जानेवारी आणि २५ फेब्रुवारी अशा पाच टप्प्यांमध्ये दहा टक्के ते शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती करावयाची आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आठ हजार १०० घरांचे उद्दिष्ट असून चार हजार ४४३ घरांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित घरांना मंजुरी द्यावयाची आहे. उद्दिष्टापैकी चार हजार २९६ घरे अपूर्ण आहेत. मंजूर घरांच्या तुलनेत ९७ टक्के तर एकूण उद्दिष्टाच्या ५३ टक्के घरे बांधून झालेली नाहीत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता चार हजार ९४७ घरांचे उद्दिष्ट असून दोन हजार ८९३ घरांना मंजुरी मिळाली आहे. एकूण उद्दिष्टापैकी दोन हजार ४३३ घरे अजून अपूर्ण असून, मंजुरी मिळालेल्या आकडेवारीपेक्षा ८४ टक्के तर एकूण उद्दिष्टापेक्षा ४९ टक्के घरे अद्याप अपूर्ण आहेत. घरांच्या बांधकामाकरिता पहिला हप्ता दिल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील २२५ तर सिंधुदुर्गातील १२८ घरे अपूर्ण राहिली असून, पहिल्या हप्त्यानंतर अठरा महिन्यांनंतर रत्नागिरीत अठरा तर सिंधुदुर्गात दहा घरे अपूर्ण राहिली आहेत.

गवंडी प्रशिक्षणाच्या कार्यक्रमातही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे मागे राहिले आहेत. रत्नागिरीत ७५ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ गवंड्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. रत्नागिरीतील एकाही गवंड्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. सिंधुदुर्गातील सर्व गवंड्यांना प्रशिक्षणासाठी मंजुरी मिळाली, तरी त्या सर्वांचे प्रशिक्षण अद्याप झालेले नाही. रत्नागिरीतील मंजूर गवंड्यांकरिता मंजुरी मिळविणे आणि सर्वांना १५ डिसेंबरपर्यंत गवंड्याचे प्रशिक्षण पूर्ण करणे असे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

विविध आवास योजनांमधील प्रतीक्षा यादीवरील लाभार्थींच्या आधार नोंदणीच्या कामात मात्र रत्नागिरी जिल्ह्यात कोकण विभागात सर्वांत आघाडीवर आहे जिल्ह्यातील केवळ ५९ जणांची आधार नोंदणी राहिली आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केवळ १३७ जणांची नोंदणी करावयाची असून ती ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply