गावातील अशुद्ध पाण्यावर आता गावातील महिलांची नजर

सिंधुदुर्गनगरी : सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील प्रशिक्षित महिला आता आपापल्या गावात होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणार आहेत.

राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन अंतर्गत फिल्ड किट (FTK) द्वारे पाण्याची गुणवत्ता तपासण्याबाबत जलजीवन मिशनद्वारे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील प्रत्येकी पाच महिलांना जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाद्वारे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षित महिलाद्वारे आता गावातील अशुद्ध पाण्यावर नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी आणि स्वच्छता) विनायक ठाकूर यांनी दिली.

जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळजोडणी देण्याबरोबरच गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हा उद्देश आहे. राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन विभागाच्या सूचनेप्रमाणे जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रत्येकी पाच महिलांची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निवड करण्यात आली.

या महिलांना गेल्या २२ ते २९ डिसेंबर या कालावधीत १९ तुकड्यांमधून ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील महिलांना गावातील सार्वजनिक आणि खासगी जलस्रोतांची माहिती देण्यात आली. तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची निगा कशी राखावी, स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम, पाणी गुणवत्ताविषयक तपासणी, फिल्ड टेस्ट किटचा वापर कसा करावा, त्याचा वापर करून पाण्याची तपासणी कशी केली जाते, हे किट कसे हाताळावे, पाण्याची गुणवत्ता ढासळल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो, पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण कसे करावे, याबाबत माहिती देण्यात आली.

या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सुमारे दोन हजार महिलांनी सहभाग घेतला होता. हे प्रशिक्षण जिल्हा पाणी गुणवत्ता निरिक्षक नीलेश मठकर आणि सल्लागार नागेश तोरस्कर यांनी दिले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply