ग्रामपंचायत निवडणुका कोणासाठी?

राज्यभराबरोबरच कोकणातही १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत. पंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायतींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावातील प्रत्येक मतदार या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचा असतो. लोकसभा आणि विधानसभेत खासदार आणि आमदारांना जितके महत्त्व असते, तितकेच महत्त्व ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सर्वसामान्य मतदाराला असते. कारण तो सहभाग घेत असलेल्या किंवा त्याने सहभाग घेतला पाहिजे अशी अपेक्षा असलेल्या ग्रामसभेवरच त्या त्या गावाचे व्यवहार अवलंबून असतात. पण तसे होताना दिसत नाही. विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकांकडे पाहिले जात असल्याचे सांगितले जाते. हे खरे तर गंभीर आहे.

आपल्याकडे ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत कोणत्याही निवडणुका आल्या की शब्दांचे खेळ सुरू होतात. मतदाराचा लगेच मतदारराजा होतो. भारतात निवडणूक कशासाठी होते आणि कोणासाठी होते, मतदान कोणत्या कारणासाठी होते, हे अभ्यासाचे विषय आहेत. निवडणुका ग्रामपंचायतीच्या असतात, पण वर्षानुवर्षे त्या त्याच त्या मुद्यांवर होतात. मतदारांची मानसिकता फारशी बदललेली नाही किंबहुना ती बदलू दिली गेलेली नाही. मतदाराला मत असते. तो दे कोणाला तरी देणार असतो, खासकरून अशा माणसाला जो समाजासाठी काही कार्य करणार असतो. निदान तशी अपेक्षा असते. कारण मतदारसुद्धा समाजाचा एक अविभाज्य भाग असतो. त्याचा त्याला विसर पडलेला असतो. क्षणिक आणि तात्कालिक विषयांसाठी तो मतदान करतो. त्याला योग्य मार्गदर्शन करण्याऐवजी ग्रामविकासाच्या मूळ मुद्द्याकडे त्याचे सोयीस्कर दुर्लक्ष कसे होईल, यासाठीच प्रयत्न केला जातो. ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नाहीत. तसा संकेत आहे. मात्र प्रत्यक्षात तसे घडत नाही. आपल्या विचारसरणीचे उमेदवार निवडून आले पाहिजेत, यासाठी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते प्रयत्न करत असतात. फक्त दिसायला पक्षविरहित, पण प्रत्य़क्षात त्याआडून पक्षच निवडणूक लढवत असतात. त्यामुळे मग निवडणूक कोणासाठी हा प्रश्न पडतो.

गावाचे असे अनेक विषय असतात. रस्ते, गटारे, दिवाबत्ती ही नियमित कामे ग्रामपंचायत करत असते. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी येत असतो. पण तो निधी आपल्याच पक्षाच्या सरकारने कसा आणला, हे सांगण्याचा प्रयत्न प्रचारात होत असतो. एखाद्याच विचारसरणीचे लोक निवडून आले, की नंतर मात्र नेहमीप्रमाणेच त्यांना त्यांनी केलेल्या प्रचाराचा विसर पडतो. अर्थातच लोकही ते सारे विसरतात. म्हणूनच ती गंभीर बाब आहे. गावागावांमध्ये पसररेली भारतातील लोकशाही जगातील सर्वांत मोठी आणि प्रगल्भ लोकशाही आहे, असे सांगितले जाते. मात्र हे सांगताना मतदान करणारे मतदार खरेच प्रगल्भ आहेत का? भारतात मतदारांनी खरेच आपला हक्क म्हणून मतदान केले, आपल्या समाजाच्या आणि परिसराच्या विकासासाठी मतदान केले, तर खूप काही वेगळे घडू शकते. १९९३ साली झालेल्या घटनादुरुस्तीनंतर ग्रामपंचायतींना भरपूर अधिकार प्राप्त झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळतो. त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांचे अधिकार कमी झाल्याचे सांगितले जाते, इतके ग्रामपंचायतींचे महत्त्व वाढले आहे. म्हणूनच ग्रामपंचायतीसाठी मतदान करणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाचे महत्त्व आणि जबाबदारीही तितकीच वाढली आहे. ती त्याने चांगल्या पद्धतीने निभावायला हवी आहे. कोणी सांगितले म्हणून, विशिष्ट रंगाच्या झेंड्याचे महत्त्व वाढावे म्हणून किंवा कोणत्या एका नेत्याचे हात बळकट करण्यासाठी म्हणून ग्रामपंचायतींच्या मतदारांनी मतदान करून उपयोगी नाही. तसे झाले, तरच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना अर्थ आहे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १ जानेवारी २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा १ जानेवारीचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply