जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची रंगीत तालीम असे उघडपणे सांगितल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान शुक्रवारी होत आहे. ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. तो संकेत पाळला जात असला तरी या संकेतामागचा उद्देश मात्र कधीच कालबाह्य झाला आहे. सर्वच पक्ष आपल्या विचारसरणीचा
उमेदवार निवडून यावा यासाठी आटापिटा करत आहेत. म्हणजेच पक्षातीत निवडणुकीचा उद्घोष करत उघडपणे आपल्या पक्षाचा प्रचार करत आहेत. निवडणुकीनंतर विशिष्ट रंग विजय होणार असल्याचे छातीठोकपणे सांगितले जात आहे. त्याच्या विरोधातील रंग म्हणजे लोकांच्या तोंडाला काळे फासणारा आणि आपला रंग फक्त लोकांचे चेहरे उजळून टाकणारा असे प्रत्येक पक्षाकडून सांगितले जात आहे. त्यामुळेच स्थानिक पातळीवरच प्रश्न सोडविले जावेत, त्यांची चर्चा गावातच व्हावी, गावातील निर्णय गावकऱ्यांनी घ्यावेत, हा मूळ उद्देश साध्य होताना दिसत नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीच्या शेवटच्या आठवड्यात विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा आढावा घेतला. आपलाच पक्ष कसा विजयी होणार आहे, मतदार केवळ आपलाच विचार कसा करणार आहे, ते सांगण्याची अहमहमिका चालली होती. एकमेकांचे उमेदवार पळविल्याचे आरोप झाले. निवडणुकीच्या तोंडावर होणारे पक्षांतराचे नाटकही यथास्थित पार पडले. छोट्या-छोट्या गावातील कार्यकर्ते सकाळी एका पक्षात, संध्याकाळी दुसऱ्या पक्षाचे उपरणे खांद्यावर घेऊन आधुनिक प्रसारमाध्यमांमधून त्याची छायाचित्रे झळकवण्यात मग्न होते. आधीच्या पक्षाच्या नेत्याचा फोन आला तर आपण सहज म्हणून तो शेला खांद्यावर टाकला होता, असे बिनदिक्कत सांगत असल्याचे ऑडिओ-व्हिडीओही सर्वत्र प्रसारित होत होते. प्रचाराच्या या सार्या् रणधुमाळीत गावांच्या प्रश्नांबाबत कोणीही साधा उल्लेखही केला नाही. फक्त आपल्या विचाराच्या
कार्यकर्त्यांची गणना केली जात होती. गावांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची मोजदाद कोणीच करताना दिसत नव्हते.
स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन केले. राजकारणातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी या तरुणांनी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. एक आदर्श राजकीय व्यवस्था निर्माण व्हावी, या उद्देशाने त्यांनी हे आवाहन केले असले, तरी ते अमलात आणण्यासाठी कितीतरी प्रयत्न करावे लागतील. कारण राजकारण आता तळागाळात अगदी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले आहे. पंतप्रधानांना अपेक्षित असलेल्या घराणेशाहीपेक्षाही निदान ग्रामीण पातळीवर पक्षीय राजकारण संपुष्टात येण्याची गरज आहे. कारण तळागाळात पोहोचलेल्या राजकारणामुळे एका गावातील लोक सामंजस्याने वागण्याची शक्यता तर दूरच राहिली, पण एका घरातील दोन व्यक्तीसुद्धा विरुद्ध विचारसरणीच्या म्हणून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत असल्याची काही उदाहरणे आहेत. अशा स्थितीत अगदी ग्रामीण भागातील तरुणांनी राजकारणात यायचे ठरविले, तरी त्यांना कुठल्या तरी पक्षाच्या विशिष्ट विचारसरणीच्या दावणीला बांधून घेण्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही. गावाचा विकास वगैरे केवळ राजकीय पक्षच करू शकतात, अशीच मानसिकता निर्माण केली जात आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची, लढविणाऱ्यांची ही स्थिती, तर ज्यांच्यासाठी हा खेळ चालतो, तो सामान्य मतदार मात्र एका मतापुरताच राहतो. त्याच्या मताला काहीही किंमत नसते!
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १५ जानेवारी २०२१)
(साप्ताहिक कोकण मीडियाचा १५ जानेवारीचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडिया – १५ जानेवारी २०२१ चा अंक
या अंकात काय वाचाल?
मुखपृष्ठकथा : कलेला वाव देणारी रोजगारनिर्मिती – बांबूपासून उत्तम कला आणि रोजगारनिर्मिती केलेले, नाधवडे (ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील नंदकुमार सावंत यांची प्रेरक यशोगाथा – व्हिडिओ https://youtu.be/wCNleFzy1XM
संपादकीय : मतदार फक्त एका मतापुरता
https://kokanmedia.in/2021/01/15/skmeditorial15jan/
नाणार : उद्धवजी, समर्थक ‘सावत्र’ नाहीत! : मकरंद भागवत यांचा प्रासंगिक लेख
मालवणी खाजा : बाबू घाडीगावकर यांचा स्मरणरंजनपर लेख
करोना डायरी : कांदे-बटाटे आणि भाजी विकून कितीसा फायदा झाला? – किरण आचार्य यांचा लेख
बाळासाहेब माने : संघर्षातून तावून सुलाखून निघालेले नेतृत्व : ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा लेख
याशिवाय, बातम्या, वाचकविचार, कविता, इत्यादी

