रत्नागिरीत २७ जानेवारीला तिसरी शाश्वत पर्यटन परिषद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढण्यासाठी सलग तिसऱ्या वर्षी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे पर्यटन परिषद आयोजित केली आहे. येत्या २७ जानेवारीला अंबर मंगल कार्यालयात ही परिषद होईल, अशी माहिती रत्नागिरी पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली.

हेरिटेज टुरिझम – डेस्टिनेशन रत्नागिरी जिल्हा (क्षमता, आव्हाने, संधी, विकास आणि नियोजन) हा यावर्षीच्या पर्यटन परिषदेचा विषय आहे. अंबर मंगल कार्यालयात २७ जानेवारील सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत ही परिषद होईल. परिषदेला पर्यटनमंत्री, जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, पर्यटन महामंडळाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी, बांधकाम अधिकारी उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पर्यटन विषयक तज्ज्ञ यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. ही पर्यटन परिषद सशुल्क असून प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य अशा स्वरूपाची असेल. प्रवेश मर्यादित असेल. परिषदेच्या दिवशी त्याच ठिकाणी नोंदणी केली जाणार आहे.

जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला, विकासाला नवी, शाश्वत दिशा देण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. जिल्ह्याची पर्यटन क्षमता, आव्हाने, संधी, विकास आणि नियोजन या दिशेने योग्य आराखडा तयार करण्याच्या हेतूने तिसरी पर्यटन परिषद आयोजित केली आहे. परिषदेत हेरिटेज टुरिझम, दुसर्याण सत्रात शाश्वरत पर्यटन क्षमता आणि आव्हाने या विषयावर चर्चासत्र होईल. त्यामध्ये हॉटेल्स असोसिएशन, टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, सामाजिक आणि पर्यटन संस्था, लोकप्रतिनिधी, पर्यटन प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, सागरी महामार्ग, नवे पूल, रेल्वेचे दुपदरीकरण, जहाज वाहतूक, लवकरच होणारी प्रवासी विमान वाहतूक यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ते लक्षात घेऊन पर्यटक गोव्याऐवजी रत्नागिरीत राहिला पाहिजे, त्यातून जिल्ह्याचा विकास होऊ शकतो आणि तरुणांना रोजगारही मिळू शकतो, याकरिता परिषद आयोजित केली आहे. शेतकरी, आंबा बागायतदार, तरुण बेरोजगार, हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी, समुद्रकिनारी जमीन असणारे शेतकरी, पडीक जमिनींचे मालक, पर्यटन व्यावसायिक यांनी परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विविध सेवा, वस्तू स्टॉल, शुभेच्छा बॅनर, देणगी अशा स्वरूपात आर्थिक मदत अपेक्षित असून त्याकरिता राजू भाटलेकर (९१३०३८३६६६) किंवा सुहास ठाकुरदेसाई (९८२२२९०८५९) यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply