कोयनेच्या पाण्याला कोकणाची दिशा

दररोज लक्षावधी लिटर वाहून जाणारे कोयनेचे अवजल हा वर्षानुवर्षे चघळला जाणारा विषय आहे. कित्येक वर्षे म्हणजेच कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या निर्मितीपासूनच हे पाणी वाया जात आहे. शिवसागर जलाशयात साठलेले पाणी वेगाने जनित्रांमध्ये सोडून विजेची निर्मिती केली जाते. हे पाणी वाशिष्ठी नदीमध्ये सोडले जाते. चिपळूण तालुक्यातून हे पाणी समुद्राला जाऊन मिळते. उन्हाळ्यात पाण्याचा साठा कमी झाल्यानंतर काही प्रमाणात ही नदी रोडावते, तो विषय वेगळा. पण इतर वेळी पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जाते.

कोकणात अनेक ठिकाणी फेब्रुवारी महिन्यापासूनच पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. अनेक मोठे प्रकल्प झाले, तरी जमिनीच्या विशिष्ट रचनेमुळे कोकणातील जमिनीत पाणी टिकून राहत नाही. काही अपवाद वगळता टंचाईची परिस्थिती दरवर्षी निर्माण होते. ती दूर करायला कोयनेचे अवजला उपयुक्त ठरू शकते, असे वेगवेगळ्या व्यासपीठावरून वर्षानुवर्षे मांडले गेले. कोयनेच्या पाण्याचा विनियोग कसा करावा, याचा अभ्यास करण्यासाठी जलसंपदा विभागाचे माजी मुख्य सचिव म. दि. पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्यासह इतर तज्ज्ञांचा समावेश असलेली विशेष समिती नेमली गेली. अहवाल तयार झाला. शासनाला सादर झाला. अहवालावर विधिमंडळात चर्चा झाली. पण अखेर तो अहवाल नेहमीप्रमाणे शासनाच्या बासनात बंदिस्त झाला. डॉ. कद्रेकर यांनी स्वतंत्रपणेही कोयनेचे अवजल कोकणासाठी किती उपयुक्त ठरू शकते, याबाबतचा अहवाल तयार केला. तोही शासनाला सादर करण्यात आला. त्याचेही पुढे काही झाले नाही. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून कोयनेचे अवजल दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळविण्याचा मुद्दा पुढे आला. काही काळाने हेच पाणी मुंबईला पुरविण्याच्या त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या. राज्यात सत्तारूढ असलेल्या मागच्या युतीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोयनेचे पाणी विदर्भात नेण्याची घोषणा केली. मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी हे पाणी कोकणालाच मिळाले पाहिजे, असा आग्रह धरला. त्यादृष्टीने अहवाल तयार केले गेले. मात्र तेही पुढे सरकू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मात्र कोयनेचे हे पाणी कोकणालाच मिळाले पाहिजे, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे कोयनेच्या पाण्याला कोकणाचीच दिशा मिळायला मदत होणार आहे.

असे असले तरी कोयनेच्या अवजलाचा कोकणाचा मार्ग कोकणातल्या डोंगर-दऱ्यांप्रमाणेच अडथळ्यांचा आणि अवघड आहे. कारण हे पाणी कोकणालाच देण्याचा शिवसेनेच्या नेतृत्वाखालील जिल्हा नियोजन मंडळाचा प्रस्ताव असला तरी राज्यात सत्तारूढ असलेल्या महाविकास आघाडीतील इतर दोन पक्ष तो ठराव मंजूर करण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याची शक्यता वाटत नाही. कारण कोयनेचे पाणी कोकणातून उचलून नेऊन ते दुष्काळग्रस्त भागाला पुरविण्याचा आग्रह धरणारे नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. ते सहजासहजी रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळाचा कोयनेचे अवजल कोकणात पुरविण्याचा ठराव मानण्याची शक्यता नाही. पण तो मानला गेला, तर मात्र तो खरोखरच ऐतिहासिक निर्णय ठरेल. कोकणाचे जल दारिद्र्य संपायला त्यामुळे मदतच होईल. ते तसे व्हावे याच सदिच्छा. जिल्हा नियोजन मंडळाच्या ठरावामुळे अवजलाला कोकणाची दिशा मात्र मिळालेली आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेची गुऱ्हाळे शिजतील, पण तसे न होता ठरावाची अंमलबजावणी व्हावी. शासनाची मंजुरी मिळावी आणि वाया जाणारे पाणी संपूर्ण कोकणाला मिळण्याचा मार्ग सुकर व्हावा.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २९ जानेवारी २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा २९ जानेवारीचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply