मालवणचे मामा : नाट्यकार भार्गवराम विठ्ठल वरेरकर

उपेक्षितांच्या अंतरंगांना रंगभूमी देणारे नाट्यकार पूजनीय भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा आज (२७ एप्रिल) जन्मदिन. त्या निमित्ताने, आचरे (मालवण) येथील ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला, त्यांचे वेगवेगळे पैलू उलगडणारा हा लेख …
………………………
नाट्यरसिकहो, उपेक्षितांच्या अंतरंगांना रंगभूमी देणारे नाट्यकार पूजनीय भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा आज (२७ एप्रिल) जन्मदिन. ३७ नाटके, तीन नाटिका, अनेक कथा, कादंबऱ्या, रहस्यकथा आणि बंगाली वाङ्मयाचे मराठीत भाषांतर करून मामांनी मराठी साहित्यशारदेचे दालन समृद्ध केले. ते करत असताना ‘जयांना कोणी ना जगती, सदा जे अंतरी रडती’ अशा साऱ्या उपेक्षितांना मामांनी आपल्या कसदार लेखणीतून न्याय दिला. हे संतकार्य करत असतानाच त्यांनी आपल्या स्वभावातला मालवणीपणा मात्र अखेरपर्यंत जपला, अगदी देवघरातल्या लामणदिव्यासारखा… त्या लामणदिव्यात जळणारे तेल अस्सल मालवणी होते. मालवणी फटकळपणामुळे ती ज्योत अधिकच प्रकाशमान झाली. एक डिसेंबर १९५४ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मामांनी लिहिलेले पत्र प्रथम वाचा. यात आमचे मामा तुम्हाला सर्वांगाने समजून घेता येतील.

पंडितजी, आज माझे वय ७२ वर्षांचे आहे. गेली साठ वर्षे मी सतत रंगभूमीची सेवा करतो आहे. माझी लघुकथांची पाच पुस्तके प्रसिद्ध झाली. शरदचंद्र चटर्जी, बंकिमचंद्र चटर्जी यांच्या बंगाली भाषेतील सर्व १५०च्या वर पुस्तके आजपर्यंत प्रसिद्ध झाली आहेत. परंतु मिळकतीपेक्षा बुडिताची रक्कम जवळजवळ दुप्पट आहे. माझ्या आयुष्याचे आता थोडेच दिवस राहिलेत. म्हणूनच मला माझ्यासाठी आपणाकडे काहीही मागायचे नाही; पण मेल्यानंतर जाळण्यापुरती लाकडे मिळाली तरी पुष्कळ झाले.
………

मामांचा जन्म २७ एप्रिल १८८३ रोजी चिपळूणला झाला. त्यांची जडणघडण मुंबापुरीत झाली आणि त्यांच्या जीवनाची अखेर २३ सप्टेंबर १९६४ रोजी भारताच्या राजधानीत, दिल्लीत झाली. असे असले तरीही, मामा वरेरकरांना मालवणचे मामा वरेरकर म्हटले जाते. याला कारण मामांचे बालपण घडले ते मालवणात. नाटककार म्हणून मामांनी पहिले आठ पृष्ठांचे ‘रासक्रीडा’ हे नाटक लिहिले तेदेखील मालवणातच, आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करून.

ज्याला एकपात्री नाटक म्हणतात, ते कीर्तन-प्रवचन करायला मामांना रंगमंच मिळाला, तोही मालवण मेढामधील मुरलीधर मंदिराचाच आणि नाटकाची ओढ लागली, तीदेखील मालवणच्या त्या काळच्या सुप्रसिद्ध कृष्णाबाई प्रासादिक वाईरकर संगीत नाट्यमंडळाच्या तालमी पाहूनच! म्हणूनच नाट्यरसिक मामांना मालवणचे म्हणून ओळखतात असे नव्हे, तर मामांनी मालवणकरांचा स्पष्टवक्तेपणाचा, गप्पा मारण्याचा आणि माणसे जोडण्याचा त्रिगुण संपादित केला होता. म्हणूनच त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे उदाहरण ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर यांनी एका ठिकाणी नमूद केले आहे. त्यांनाही त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचा मालवणी तडाखा बसला होता. त्या वेळी खांडेकर ‘ज्ञानपीठ’विजेते झालेले नव्हते, तरी समर्थ लेखक होते. ते शिरोड्याच्या इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक होते. मामा वरेरकर त्या वेळी राम गणेश गडकरी यांच्यावरएक व्याख्यान देण्याकरिता सावंतवाडीत आले होते. त्याचे वृत्त खांडेकरांनी एका इंगजी दैनिकाला देताना वरेरकरांबद्दल असे लिहिले होते – Famous Marathi Dramatist Varerkar. मामा वरेरकर खांडेकरांना म्हणाले, ‘खांडेकर मी नाटककार (Dramatist) नाही, मी नाट्यकार (Playwright) आहे’ आणि त्या शब्दसृष्टीच्या ईश्वराला त्यांनी नाटककार आणि नाट्यकार याच्यातला फरक समजावून दिला. खांडेकर म्हणतात, ‘एका शाळा मास्तराची एका पोस्टमास्तरने घेतलेली ती मालवणी स्पष्टवक्तेपणाची शिकवणीच होती.’

नाट्यकार म्हणून मामांनी सामान्यांचे प्रश्न आपल्या नाटकांतून मांडले. कुंजविहारी (१९०८), हाच मुलाचा बाप (१९१८), संन्याशाचा संसार (१९२०), सत्तेचे गुलाम (१९२२), करीन ती पूर्व (१९२७), सोन्याचा कळस (१९३२), उडती पाखरे (१९४१), सारस्वत (१९४२), जीवा-शिवाजी भेट (१९५०), अ-अपूर्व बंगाल (१९५३), भूमिकन्या सीता (१९५४) आदी नाटकांतून सामान्यांचे प्रश्न रंगभूमीवर आणले. ‘हाच मुलांचा बाप’मधून हुंड्याचा प्रश्न, ‘संन्याशाचा संसार’मधून पतित परावर्तनाचा प्रश्न, असहकारितेच्या चळवळीवर आधारित ‘सत्तेचे गुलाम’, मजूर मालकांच्या गिरणगावच्या प्रश्नावर आधारित ‘सोन्याचा कळस,’ तर रामाने सीतेवर केलेल्या अत्याचाराला वाचा फोडण्याकरिता ‘भूमिकन्या सीता’ ही मामांची नाटके.

त्यांनी हाताळलेले प्रश्न अजूनही जिवंत असल्यामुळे त्यांची नाटके चिरंजीव आहेत. पूर्व बंगालातील अत्याचारांवर आधारित ‘अ-अपूर्व बंगाल’ हे मामांचे नाटक तर इतिहासाची साक्ष देणारे आहे. नाट्यलेखन करताना मामांनी रंगभूमीचा किर्लोस्करकालिनी चेहरामोहरा बदलला. दीर्घकालीन पौराणिक नाटके सर्वसामान्यांच्या प्रश्नांना भिडवून सुटसुटीत केली. दीर्घ स्वगतांना फाटा देऊन आणि अवाजवी संगीताचे स्तोम कमी करून मराठी रंगभूमीला नवीन आयाम दिला. ललित कलादर्श कंपनीचे ते कायमस्वरूपी घरचेच नाटककार होते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांना ते गुरुस्थानी मानत. त्यांच्यावर इब्लेन, मेलियर आदी पाश्चात्य नाटककारांचा प्रभाव होता.

बंगाली भाषेतील अनेक कादंबऱ्यांची भाषांतरे त्यांनी मराठीत केली. बंकिमचंद्र, शरच्चंद्र यांची ओळख मराठी रसिकांना त्यांनी करून दिली; पण त्याचबरोबर ‘एकविंशती’ या रवींद्रनाथ टागोरांच्या २१ कथांच्या भाषांतरित पुस्तकाने टागोरांचे व्यक्तिमत्त्व त्यांनी मराठी प्रांतात फुलविले. मामा वरेरकरांनी संसार की संन्यास (१९११) (सामाजिक प्रश्नांचे विचार), विधवा कुमारी (१९२८) (वैधव्य आलेल्या तरुण निश्चयी कर्तबगार मुलीची चिकाटी), धावता धोटा (१९३३), (गिरणगावातील पहिल्या राजकीय प्रश्नांना आवाज), फाटकी वाकल (ग्राम सुधारणेसाठी खेड्यात जाणाऱ्या तरुणांचे प्रश्न) आदी आपल्या कादंबऱ्यांतून अनेक प्रश्नांना वाचा फोडली. केवळ २० वर्षे पोस्टमास्तर म्हणून नोकरी करून त्यांनी नाट्यलेखनासाठी पोस्टातून निवृत्ती स्वीकारली.

अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता. लेखाच्या प्रारंभी वरेरकरांनी नेहरूंना लिहिलेल्या ज्या पत्राचा उल्लेख आहे, त्या पत्राची गुणग्राहक आणि रसिक नेहरूंनी तत्काळ दखल घेतली. तत्कालीन रत्नागिरीचे लोकसभा खासदार मोरोपंत जोशी यांच्याकडून मामांची सर्व माहिती घेतली आणि मामांना राज्यसभेत गुणवंत विद्वान आणि सामाजिक क्षेत्रांत भरीव कामगिरी केलेल्या व्यक्तींना जो मान दिला जातो, तो प्राप्त झाला. मामा १९५६ मध्ये मेंबर ऑफ पार्लमेन्ट (खासदार) झाले.

चिंतामण कोल्हटकर (मध्यभागी) यांच्यासह डावीकडे मामा वरेरकर… ३१ मार्च १९५७ रोजी नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार कोल्हटकरांना देण्यात आला. त्या कार्यक्रमातील फोटो (फोटो : विकिपीडिया)

पुणे येथे (१९३८) त्यांना मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविता आले, तर धुळे येथील (१९४४) अखिल भारतीय साहित्य संमेलनाचेही मामा अध्यक्ष झाले. १९५१मध्ये मुंबई आकाशवाणी केंद्राकडून आदर्श पुरस्कार जाहीर झाला. १९५९मध्ये राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते ‘पद्मभूषण’ ‘किताबाने त्यांना सन्मानित करण्यात आले. १९६२मध्ये उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीची फेलोशिपही त्यांना देण्यात आली. अशा अनेक पुरस्कारांनी, सन्मानांनी हे मालवणी व्यक्तिमत्त्व अधिकच वलयांकित झाले.

मालवण नगरीचे तीन भार्गवराम
आमच्या मालवण नगरीने मराठी रंगभूमीला तीन भार्गवराम भार्गवराम दिले. पैकी एक भार्गवराम विठ्ठल वरेरकर ऊर्फ मामा वरेरकर (नाट्यकार), भार्गवराम आचरेकर उर्फ मामा आचरेकर (संगीत नट), भार्गवराम पांगे उर्फ दादा पांगे (नाट्यनिर्माते). या त्रिमूर्तींनी मराठी रंगभूमीचा ध्वज नाट्य क्षेत्रात फडकवत ठेवला. मामा वरेरकर यांची स्मृती म्हणून अजूनही मालवणला त्यांच्या नावाचे नाट्यगृह त्यांच्या स्मृती जागवीत आहे.

आगळा नाटककार
मामांना जाऊन आज अर्धशतकाहून अधिक काळ लोटला असला, तरी त्यांच्या स्मृती अजूनही टवटवीत राहण्याचे कारण त्यांनी आपल्या नाटकात मांडलेल्या उपेक्षितांच्या अंतरंगाच्या वेदना. ‘हाच मुलाचा बाप’पासून ‘अ-अपूर्व बंगाल’पर्यंत जी विविध नाटके त्यांनी लिहिली, त्यातून त्यांनी त्या काळातील जीवनातले महत्त्वाचे विषय लीलया हाताळले. २३ सप्टेंबर १९६४ रोजी त्यांचे निधन झाले.

काळाबरोबर सतत धावण्याचे चापल्य आणि वर्तमानातले नाट्य अचूक हेरण्याची खुबी आणि ते सारे निवडून रंगभूमीवर साकारण्याचे कौशल्य प्राप्त झालेला मामा वरेरकरांसारखा अन्य नाटककार मराठीच्या मखमली पडद्यावर झाला नाही. म्हणून त्यांना ‘नमन नटवरा! विस्मयकारा!’

 • सुरेश श्यामराव ठाकूर
  पत्ता :
  १२८, आचरे-पारवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६१४
  मोबाइल : ९४२१२ ६३६६५
  ई-मेल : surshyam22@gmail.com
  (ललित लेखक, स्तंभलेखक; कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष; अ. भा. साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष)
 • (हा लेख सिंधुसाहित्यसरिता या पुस्तकातला आहे. हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी https://bit.ly/2IlFV7C येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply