केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सिंधुदुर्गात सांगता

वेंगुर्ले : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले येथे सांगता झाली. श्री. राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाल्यानंतर आता कोकणातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, उद्योगधंद्यांची अधिक संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने कोकणाच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.

जनआशीर्वाद यात्रेच्या सातव्या आणि अखेरच्या दिवसाची सुरुवात महात्मा गांधींचे अनुयायी स्व. अप्पासाहेब पटवर्धन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कणकवलीतील गोपुरी आश्रमाला भेट देऊन झाली. यावेळी श्री. राणे यांच्यासमवेत श्री. दरेकर आमदार रवींद्र चव्हाण, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, नीलेश राणे, राजन तेली यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत बांदा, आडाळी एमआयडीसी, दोडामार्ग येथे स्वागत करण्यात आले. जनआशीर्वाद यात्रा सासोली, हणखणे, हसापूर, चांदेल, कासारवंडे, धारगळ हायवे मार्गे सातार्डा अशी काढण्यात आली. सातार्डा, मळेवाड, शिरोडा, वेंगुर्ले येथे जनतेशी संवाद साधण्यात आला. नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या जनआशीर्वाद यात्रेची सुरवात झाली होती.

श्री. दरेकर म्हणाले, यात्रेचा साक्षीदार मी पहिल्या दिवसापासून आहे एक अभूतपूर्व आशीर्वाद केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मिळाला आहे. कोकणच्या सुपुत्रावर जनतेचे किती प्रेम आणि विश्वास आहे, हे या यात्रेच्या निमित्ताने दिसून आले. गेली ७ वर्षे देशाचे नेतृत्व करत असताना देशाला प्रगतीकडे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. परंतु महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत महाविकास आघाडी सरकार आल्यापासून येथे कोणत्याही प्रकराची ठोस विकासकाम झाले नसल्याची खंत दरेकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, नारायण राणे मुख्यमंत्रिपदी असताना राज्यात जी विकासाची गती होती, कोकण विकासाकडे जात होता, तो विकास आता थांबला आहे. आपल्या वर्षांच्या कालावधीत देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यासाठी अनेक योजना आणल्या, फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कोकणाला लाखोंचा निधी देण्यात आला, परंतु या मंजूर योजना पुढे नेण्याऐवजी त्या विकासकामांना कात्री लावण्याचे दुर्दैवी काम महाविकास आघाडी सरकारने केले. राणे यांना केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. आमचा रखडलेला विकास केवळ राणे पुढे नेऊ शकतील, याच विश्वासातून, प्रेमातून आज येथे प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

देशातील ८० टक्के उद्योग राणे यांच्या विभागाकडे आहेत. बेरोजगार तरुणांसाठी, व्यावसायिकांसाठी विविध प्रकारच्या योजना आहेत. तसेच ७ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेक योजना आणल्या. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे गेले, आयुष्मान योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना दिलासा देण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणली. उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून महिलांसाठी गॅस उपलब्ध करून देण्यात आले. बेरोजगारांसाठी मुद्रासारखी योजना पंतप्रधान मोदी यांनी आणली. त्यामुळे समाजातील सर्व घटकांसाठी, त्यांची उन्नती व्हावी या भावनेतून पंतप्रधानांनी अनेक योजना आणल्याचे श्री. दरेकर यांनी सांगितले.

दरेकर म्हणाले, आज येथील लोकांमध्ये उत्साह आहे, याच उत्साहातून आपल्याला रचनात्मक काम करायचे आहे. केवळ श्री. राणे यांना हार घालून, त्यांचा सन्मान करून आपली जबाबदारी संपणार नाही. या उत्साहाबरोबर त्यांना दिलेल्या खात्यातून आपल्याला सर्वसामान्य लोकांना काय देता येईल, या खात्याच्या माध्यमातून आपण तालुका आणि तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या रोजगाराचे नियोजन करत कोणते व्यवसाय आणू शकतो, हे समजून घेत कार्य करण्याची आवश्यकता आहे. भाजपची विचारधारा पुढे नेण्याचे काम आपण केले असून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी केवळ श्री. राणे यांच्यावर नसून ती जबाबदारी सर्वसामान्य कार्यकर्ते आणि माझी आहे, या भावनेतून आपण सारे काम करू, असेही दरेकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

कोकणात एमआयडीसी मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु आज ती दुरवस्थेत आहे. अनेक कारखाने बंद आहेत. अनेक विकासकामांसाठी भूमीसंपादन झाले, परंतु कारखाने आले नाहीत. त्यामुळे उद्योगांना संजीवनी देण्याचे काम राणे यांच्या माध्यमातून होईल, असा विश्वास स्थानिक लोकांमध्ये आहे. कोकणचा विकास तर होईल, परंतु जोपर्यंत आर्थिक विकास होत नाही, तोपर्यंत कोकणवासी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाहीत. कोकणवासीयांचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे, यासाठी राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येईल, असा विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग देशात श्रीमंत बनविणार ! – नारायण राणे

सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात नव्हे तर देशात श्रीमंत बनविणार. यासाठी केंद्र सरकारच्या योजना जिल्हात राबविण्यासाठी दोनशे कोटीचे प्रशिक्षण केंद्र उभारणार अशी घोषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या सांगता प्रसंगी वेंगुर्ले येथे केली. माझ्यावर प्रेम करणारा कोकणी जनतेला मी कधीही विसरू शकणार नाही, असे भावनिक उद्गार श्री. राणे यांनी यावेळी काढले.

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा मुंबईमधून १९ ऑगस्टला सुरू झाली. १९ ते २१ ऑगस्ट अशी तीन दिवस मुंबईमध्ये यात्रा झाल्यावर पुन्हा २३ ऑगस्टपासून ही यात्रा पनवेलमधू सुरू झाली. पण वादग्रस्त वक्तव्यावरून अटक आणि नंतर जामिनावर सुटका झाली. यानंतर २७ ऑगस्टपासून यात्रा रत्नागिरी शमधून सुरू झाली. त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आली. २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान यात्रा जिल्ह्यात होती. आज या वेंगुर्लेत या यात्रेची सांगता झाली. या यात्रे दरम्यान नारायण राणे यांनी यांनी आपल्या केंद्रीय मंत्रालयाच्या योजना सांगून इथल्या युवकांना पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली आणि उद्योगधंदे करण्याचे आवाहन केले.

यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेश चिटणीस प्रमोद जठार, नीलमताई राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे उल्हास परांजपे यांचे तंत्र. त्यांची पुस्तके ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी लिंक्स
‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ : shorturl.at/mrsM2
नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ : shorturl.at/dFR37

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply