एसटीची १७.१७ टक्के भाडेवाढ; आज मध्यरात्रीपासून होणार लागू

मुंबई : इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच १७.१७ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून, ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. २५ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होणार असून, ती वाढ किमान पाच रुपये असेल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली, तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर ५ ते १० रुपयांनी कमी करून रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महामंडळाने दिलासा दिला आहे.

गेल्या तीन वर्षांत इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. इंधनाच्या वाढत्या दराचा बोजा झेलत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे. नव्या तिकीट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही, तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून, दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच सहा किलोमीटरनंतरच्या अंतराच्या तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयांच्या पटीत असून, २५ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून (२५ व २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री) लागू होणार आहे.

२५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून वा त्यानंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारित दराने तिकीट आकारणी केली जाणार आहे. तसेच ज्या प्रवाशाने आगाऊ आरक्षण केले आहे, अशा प्रवाशांकडून वाहक सुधारित तिकिटाच्या रक्कमेची आकारणी करतील, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. तथापि, रातराणी सेवा प्रकारांतर्गत रात्री धावणाऱ्या (जी सेवा सायंकाळी ७ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये कमीत कमी ६ तास धावते) साध्या बसेसचे तिकीट दिवसा धावणाऱ्या साध्या बसेसच्या तिकीट दराच्या तुलनेत १८ टक्के जास्त होते. हे अतिरिक्त दर आता रद्द करण्यात आले असून, दिवसा व रात्री धावणाऱ्या बसेसचा तिकीट दरसारखाच असणार आहे. त्यामुळे साध्या बसचा रातराणीचा प्रवास तुलनेने स्वस्त झाला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply