कर्जत (जि. रायगड) : कर्जत तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पाणी प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने जल माहिती केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्राचाच प्रारंभ येत्या मंगळवारी (दि. २३ नोव्हेंबर) माऊली सभागृह (शिवाजीनगर, दहिवली-कर्जत) येथे होणार आहे.
ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो. त्याकरिता विहिरी आणि कूपनलिकांचे पुनर्भरण आवश्यक असते. ते कसे करावे, याविषयीची माहिती अनेकांना नसते. त्याशिवाय शेती आणि बागायतीकरिता पाणी पुरविण्याचा प्रश्नही शेतकऱ्यांना सतावत असतो. शहरातील नागरिकांना जलसाठवणीचे महत्त्व पटलेले असते. मात्र पावसाचे पाणी कसे साठवयाचे आणि कसे वापरायचे, याची पुरेशी माहिती नसते. हे लक्षात घेऊन पावसाच्या पाण्याचे नियोजन करुन पाणी प्रश्न सोडवण्यासंदर्भातील मार्गदर्शन कर्जत येथील जल माहिती केंद्रात केले जाणार आहे. त्याचा प्रारंभ मंगळवारी दुपारी ३ वाजता होणार असून त्यावेळी जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी सिव्हिल इंजिनीअर, बांधकाम क्षेत्रातील व्यक्ती, शाळेत जलसुरक्षा शिकवणारे शिक्षक, प्लंबर तसेच पाणी साठवणे आणि वाचवणे ही बाब फार आवश्यक आहे असे मनापासून वाटणाऱ्या कोणाही व्यक्तीला यावेळी उपस्थित राहता येईल. अधिक माहितीसाठी जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या 9820788061 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जलवर्धिनीविषयी अधिक माहिती
कोकणात प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी काही प्रमाणात जरी साठवता आले, तरी कोकणातील काही गावांत मे महिन्याच्या अखेरीला जाणवत असलेली पाणीटंचाई दूर होऊ शकेल. याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी उल्हास मुकुंद परांजपे गेली १५ वर्षे झटत आहेत. स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ अशा पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे तंत्र त्यांनी अनुभवातून सिद्ध केले आहे. या तंत्रांची माहिती देणारी त्यांची पुस्तके आता ई-बुक स्वरूपात गुगल प्ले-बुक्सवर प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांचे संकलन, संपादन आणि निर्मिती ‘कोकण मीडिया’ने केली आहे. परांजपे यांच्या जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. (ई-बुक्स खरेदीच्या लिंक्स शेवटी दिल्या आहेत.)
‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ आणि ‘नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ अशी त्या दोन पुस्तकांची नावे आहेत. पूर्वी प्रकाशित झालेली ही पुस्तके आता ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर प्रकाशित करण्यात आली आहेत. या पुस्तकांची किंमत अनुक्रमे १०० आणि १२५ रुपये असून, ई-बुक्स अनुक्रमे ८० आणि १०० रुपयांत उपलब्ध आहेत. ही ई-बुक्स गुगल प्ले बुक्सवर असल्याने खरेदी केल्यावर वाचकांना मोबाइलवरच सहजपणे वाचता येतील. सध्या लॉकडाउनच्या काळात हळूहळू सर्व व्यवहार सुरू होऊ लागले असले, तरी पुस्तकांची दुकाने किंवा पुस्तके घरपोच मिळण्याची सोय अद्याप सुरळीत सुरू झालेली नाही. अशा स्थितीत ई-बुक्स हा वाचनाचा सोपा पर्याय आहे. (ई-बुक्स खरेदीच्या लिंक्स शेवटी दिल्या आहेत.)
‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ हे पुस्तक किफायतशीर फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या साह्याने कमी खर्चात पावसाचे पाणी साठवण्यासाठी टाक्या तयार करण्याच्या तंत्राची माहिती देते. तसेच, सिमेंटच्या जोडीला स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या नैसर्गिक धाग्यांचा वापर करून कमी खर्चात टाक्या तयार करण्याच्या तंत्रांची माहिती ‘नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ या पुस्तकात दिलेली आहे. ही दोन्ही पुस्तके मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत असून, दोन्ही पुस्तकांमध्ये भरपूर छायाचित्रांच्या साह्याने विषय सोपा करून समजावून सांगण्यात आला आहे.

पाणीवाले परांजपे यांच्याविषयी…
पावसाचं पाणी साठवण्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तन-मन-धनाने झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे उल्हास परांजपे. ज्येष्ठ नागरिक असूनही ते संपूर्ण कोकणात, तसेच इतरही अनेक ठिकाणी फिरून याबद्दल मार्गदर्शन करतात, किफायतशीर खर्चात आणि स्थानिक उपलब्ध साहित्यात पाण्याच्या टाक्या बनविण्याचं प्रशिक्षण देतात, आवश्यक तिथे स्वतःच्या खर्चाने टाक्या उभारूनही देतात. आतापर्यंत त्यांच्या प्रयत्नांनी काही लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता तयार झाली आहे. म्हणूनच त्यांना पाणीवाले परांजपे अशी ओळख मिळाली आहे. जलवर्धिनी प्रतिष्ठान या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून ते कार्य करतात.
पुस्तकांच्या खरेदीसाठी पुस्तकांच्या नावासमोरील लिंकवर क्लिक करावे.
‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ : shorturl.at/mrsM2
‘नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ : shorturl.at/dFR37
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Mediaमाध्यमविषयक सेवांसह पुस्तके, इनहाउस जर्नल्स आदींसाठी संकलन, संपादन, प्रकाशन , ई-बुक निर्मिती आदी सेवा कोकण मीडियातर्फे पुरविल्या जातात. कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिकही चालवले जाते. पालघर ते सिंधुदुर्ग अशा संपूर्ण कोकणातील विषयांना साप्ताहिकात प्रसिद्धी दिली जाते.
साप्ताहिक कोकण मीडियाकरिता लेखन पाठवण्यासाठी,
तसेच जाहिरातींसाठी संपर्क : 9422382621
ई-मेल : kokanmedia@kokanmedia.in