यंदाच्या गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई अभंग गायन स्पर्धेची घोषणा; प्राथमिक फेरी ऑनलाइन

रत्नागिरी : प. पू. गगनगिरी महाराज भक्तमंडळ आणि स्वराभिषेक-रत्नागिरी यांच्यातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई स्मृती संतरचित अभंग गायन स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष आहे. या वर्षी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून या वर्षी प्राथमिक फेरी ऑनलाइन पद्धतीने होईल. यातून निवडलेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी १९ डिसेंबरला प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे घेण्यात येणार आहे.

प्रसिद्ध गायक, संगीतकार, नाट्यअभिनेते गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई यांचे संगीतक्षेत्रात फार मोठे योगदान आहे. अनेक नवीन नाटकांमधील गीते त्यांनी संगीतबद्ध केली. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले. त्यांच्या योगदानाप्रति कृतज्ञता म्हणून ‘स्वराभिषेक-रत्नागिरी’तर्फे ही स्पर्धा दर वर्षी आयोजित केली जाते. गेल्या वर्षी महाराष्ट्राबरोबरच देश-परदेशातून सुमारे अडीचशे स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

या वर्षी स्पर्धा सर्व वयोगटांकरिता खुली असून, या स्पर्धेत फक्त संतरचित अभंगांचं सादरीकरण करायचं आहे. प्राथमिक फेरीसाठी ५ डिसेंबरपर्यंत अभंगाचे व्हिडिओ पाठवायचे असून, व्हिडिओच्या सुरुवातीला स्पर्धकाने व्हिडिओ केल्याची तारीख, नाव आणि पत्ता सांगायचा आहे. व्हिडिओ एडिट किंवा स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करू नये. संगीतसाथीला तबला, पखवाज, तानपुरा, हार्मोनियम व टाळाचा वापर करता येईल.

प्राथमिक फेरीतून निवडलेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी १९ डिसेंबरला रत्नागिरीतील थिबा पॅलेजवळील प. पू. गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक, प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देण्यात येईल. तसेच अंतिम स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेकरिता १०० रुपये प्रवेशशुल्क असून, ते 9604002120 (स्वरा अमित भागवत) या क्रमांकावर गुगल पेद्वारे पाठवावेत. व्हिडिओ पाठवताना गुगल पेद्वारे पैसे पाठवल्याची पावती सोबत पाठवावी. व्हिडिओ आदित्य पंडित (९६९९३०६५२२), चैतन्य परब (९४२२८५१६६७) किंवा मंगेश मोरे (७७९८५४९००६) यांच्याकडे पाठवायचे आहेत.

या स्पर्धेत जास्तीत स्पर्धकांनी सहभागी होण्याचे, तसेच अंतिम फेरीसाठी संगीतरसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply