रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची, तर उपाध्यक्षपदी बाबाजी जाधव यांची आज (१ डिसेंबर) एकमताने निवड झाली.

जिल्हा बँकेतील संचालकांच्या २१ जागांपैकी डॉ. चोरगे यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे डॉ. तानाजीराव चोरगे, बाबाजीराव जाधव, आमदार शेखर निकम, सुधीर कालेकर, जयवंत जालगावकर, रमेश दळवी, ॲड. दीपक पटवर्धन, महादेव सप्रे, मधुकर टिळेकर, अमजद बोरकर, राजेंद्र सुर्वे, रामचंद्र गराटे, सौ. नेहा माने आणि सौ. दिशा दाभोळकर हे सर्वपक्षीय १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले.
राहिलेल्या ७ जागांसाठी गेल्या १९ नोव्हेंबर रोजी थेट निवडणूक झाली. त्यातील ५ जागा सहकार पॅनेलला, तर दोन जागा विरोधी पॅनेलला मिळाल्या. जिल्हास्तरीय विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघातून सहकार पॅनेलचे सुरेश मारुती कांबळे, जिल्हास्तरीय मजूर संस्था मतदारसंघातून दिनकर गणपत मोहिते, जिल्हास्तरीय नागरी पतसंस्था मतदारसंघातून संजय राजाराम रेडीज, रत्नागिरी तालुका मतदारसंघातून गजानन कमलाकर पाटील आणि मुन्ना खामकर हे सहकार पॅनेलचे पाच जण, तर विऱोधी गटातून जिल्हास्तरीय दुग्धसंस्था मतदारसंघातून अजित रमेश यशवंतराव आणि लांजा तालुका मतदारसंघातून महेश रवींद्र खामकर हे दोघे जण निवडून आले.

बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत अध्यक्ष-उपाध्यक्षपदी कोण असावेत यावर चर्चा झाली. अध्यक्षपदासाठी डॉ. तानाजीराव चोरगे, तर उपाध्यक्षपदासाठी बाबाजी जाधव यांची नावे निश्चित करण्यात आली. दोघांच्याही नावांवर सर्व संचालकांचे एकमत झाले.
त्यानंतर जिल्हा सहकार उपनिबंधक सोपान शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. अध्यक्षपदी डॉ. चोरगे तर उपाध्यक्षपदी श्री. जाधव यांची निवड झाल्यानंतर सर्व संचालकांनी त्यांचे अभिनंदन केले. को-ऑप बॅंक्स एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी यांनी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.